घरमहाराष्ट्रनाशिकआमची अवस्था इकडे आड तिकडे विहीर

आमची अवस्था इकडे आड तिकडे विहीर

Subscribe

भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत रासप नेते महादेव जानकर यांनी भाजपवरच व्यक्त केली नाराजी

महायुतीत भाजप सगळयात बलवान आहे. मी नाराज असलो तरी आमची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी आहे. फक्त विकासाच्या मुद्यावर आम्ही महायुतीत आहोत. आमचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे. आम्हाला कोणतेही आश्वासन देण्यात आलेले नाही, असे सांगत राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी भाजपवरील आपली नाराजी जाहिररित्या व्यक्त केली.

नाशिक भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महायुतीत भाजपच सगळयात मोठा भाऊ आहे. राज्यात सर्वत्र प्रचारानिमित्त दौरे करत असताना युतीला चांगले वातावरण आहे, असे दिसून येते. ज्यांनी ७० वर्षांत काही केले नाही ते महायुतीच्या सरकारने केंद्रात आणि राज्यात पाच वर्षात करून दाखवले. विधानसभा निवडणुकीत शेती, पाणी, बरोजगारीच्या मुद्द्यावर आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहे. येणाऱ्या निवडणुकीतही राज्यात जनतेचा कौल महायुतीच्याच बाजुने राहील, असा मला विश्वास आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील यात कोणतीही शंका नाही. मी जरी नाराज असलो तरी, फक्त विकासाच्या मुद्द्यावर आम्ही महायुतीत आहोत, आमची परिस्थिती इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे. नाराजी जरी असली तरी रासप आणि भाजपतील भांडणे ही घरातली आहे. आमच्यातील भांडणे मिटली आहेत, असे जानकरांनी स्पष्ट करत मुख्यमंत्र्यांवर आमचा विश्वास असल्याचे ते म्हणाले. भाजपचे मित्र पक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्षाचे नेते केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनीही जागा वाटपाच्या मुद्द्यावरून भाजपविषयी नाराजी दर्शवली. मात्र केवळ सत्तेसाठी आपण भाजप सोबत असल्याचे सांगत आठवले यांनी आपली नाराजी जाहीररित्या व्यक्त केली. आता आठवलें पाठोपाठ जानकर यांनीही आपल्या मनातील खदखद थेट भाजपच्याच पत्रकार परिषदेत व्यक्त केल्याने युतीत सारेकाही आलबेल नाही, असेच यातून दिसून आले.

- Advertisement -

पवारांना हे शोभत नाही

लोकशाही आहे म्हणून विरोधकांनी काहीही बोलू नये. त्यांनी जबाबदारीने बोलावे. काही शंका असेल तर नक्कीच विचारावे आम्ही उत्तर देऊ. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे फक्त महाराष्ट्राचेच नाही तर देशाचेही नेते आहेत. त्यांनी कमरेखालची भाषा करणे योग्य नाही, असेही जानकर म्हणाले.काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं कोणालाही मोठं हेऊ दिले नाही. सगळं स्वतःच्या ताब्यात ठेवलं, असा आरोप जानकरांनी केला. ’महात्मा फुले’ यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे, या मागणीवर आम्ही ठाम आहोत. तशी केंद्राला शिफारस केलीय, अशी माहिती जानकरांनी दिली आहे. राज्यात अनेक ठिकाणी बंडखोरी झाली आहे. या बंडखोरांवर कारवाई केली जाईल, अशी भूमिका युतीच्या प्रमुख नेत्यांनी घेतली. या बंडखोरांमुळे महायुतीच्या उमेदवारांच्या विजयात काही अडसर येईल असे वाटत नाही असेही ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -