घरमहाराष्ट्रनाशिकमुक्त विद्यापीठात खुललंय उत्तर महाराष्ट्राचं कोकण

मुक्त विद्यापीठात खुललंय उत्तर महाराष्ट्राचं कोकण

Subscribe

नारळ-पोफळीसह लिची, काजू, फणसाच्या बागांतून पर्यटकांची आनंददायी सफर

नारळ-पोफळीच्या हिरव्यागार बागा, फांद्यांवरुन लोंबकळणारे लिचीचे लालजर्द घोस, फांद्यांपासून खोडापर्यंत लगडलेली फणसं, अवखळ वाऱ्याची सोबत आणि लांबवर जाणारी रानवाट… क्षणभर ही सारी कोकणातली सफर वाटावी, असं हे प्रतिकोकण उभं राहिलंय नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात. यानिमित्ताने पर्यटनाची अनुभूती घेतानाच नाशिककर अस्सल सेंद्रीय फळं चाखण्याचा आनंदही लुटत आहेत.

नाशिकपासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विस्तीर्ण जागेवर विविध शिक्षणक्रमांसाठी आवश्यक विभाग व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. त्यातील कृषी विज्ञान केंद्राने विद्यापीठातील जागेवर नारळ-पोफळीच्या बागा फुलवतानाच लिची आणि अव्हॅकॅडोसारखी परदेशी फळझाडंदेखील लावण्यात आलेली आहेत.

- Advertisement -

दोन किलोमीटरची रानवाट

या प्रतिकोकणालगत सुमारे दोन किलोमीटर लांब पायवाट आहे. त्यातून जाताना लहान-लहान नाले, पक्षांचा किलबिलाट, विविध रानफुलांची दुनिया बघण्याचा अवर्णनीय आनंद मिळतो. पर्यटनाच्या दृष्टीने विकास साधतानाच पाण्याच्या नैसर्गिक स्त्रोतांना कुठेही बाधा पोहोचणार नाही, याचीही काळजी घेण्यात आली आहे. किंबहुना, त्यांचा उत्तम उपयोग करुन घेण्यात आला आहे.

YCM_LIchi
मुक्त विद्यापीठातील प्रतिकोकणात लगडलेले लालजर्द लिचीचे घोस.

अल्पदरात रसायनमुक्त फळं खरेदीची संधी

या प्रतिकोकणामध्ये टरबूज, फणस, पेरू, काजू, आंबा, लिची, आवळा, अव्हॅकॅडो अशा विविध फळांचे उत्पादन घेतले जाते. त्यासाठी हानीकारक रसायनांचा वापर केला जात नसल्याने, ही अस्सल सेंद्रीय फळं आरोग्यदायी ठरत आहेत. या ठिकाणी सध्या केशर आंबा आणि लिची खरेदीची संधी नाशिककरांकडे चालून आली आहे.

- Advertisement -

पर्यटकांसाठी आकर्षण…

 

वृक्षराजी बघतानाच रानवाटेवरची भटकंती पर्यटकांना सुखावून जाते. याशिवाय लहानशी झोपडी, घर, अंगणातलं जातं, माठ, विहीर, बैलगाडी यांतून ग्रामीण संस्कृती आणि जीवनांचं दर्शन घडतं.पर्यटकांसाठी सुविधांची उपलब्धतापर्यटनाच्या दृष्टीने आम्ही विविध सुविधांची उपलब्धता करून दिली आहे. याचा पर्यटकांनी आनंद घ्यावा. शेतीपासून दूरावलेल्या लहानग्यांना या माध्यमातून निसर्गाच्या जवळ नेण्याची संधी पालकांना या माध्यमातून मिळते आहे. अधिकाधिक नागरिकांनी या ठिकाणी भेट द्यावी.- एस. वायूनंदन, कुलगुरू, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -