घरमहाराष्ट्रनाशिकमनमाड : अतिवृष्टी, महागाई, ऑनलाईनचा बाजारपेठेला फटका

मनमाड : अतिवृष्टी, महागाई, ऑनलाईनचा बाजारपेठेला फटका

Subscribe

खरेदीसाठी ग्राहक नसल्याने दुकानदार, व्यापार्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण

मनमाड : एकीकडे दिन-दिन दिवाळी म्हणत दिवाळीच्या सणाला सुरुवात झालेली असताना दुसरीकडे मात्र अतिवृष्टी, वाढती महागाई आणि ऑनलाईन खरेदीच्या वाढत्या क्रेजमुळे मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात बाजारपेठेवर मंदीचे सावट असल्याचे दिसून येत आहे. कोरोनामुळे दोन वर्षानंतर दिवाळी साजरी होत असल्यामुळे यंदा चांगला व्यवसाय होईल, या आशेवर कापड, रेडिमेड, किराणासह इतर व्यापारी, दुकानदारांनी माल भरून ठेवला असून, दिवाळी अवघ्या दोन दिवसांवर आली असताना खरेदीसाठी ग्राहक नसल्यामुळे दुकानदार, व्यापार्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

भारतीय संस्कृतीत दिवाळीला आगळे-वेगळे महत्व असून एका प्रकारे दिवाळी सर्वात मोठा सण असल्यामुळे गोरगरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वच जण हा सण आपापल्यापरीने उत्साहाच्या वातावरणात साजरा करतात.ग्रामीण भागात तर एक महिन्या अगोदर दिवाळीची तयारी करण्याची परंपरा असून घराला रंगरंगोटी करण्यापासून फराळ तयार करणे, त्यांतर नवीन कपडे, फटाके, रांगोळी, आकाश कंदील, पणत्या आदी खरेदीची लगबग सुरु होते.

- Advertisement -

मनमाड शहराला खेटून अनेक छोटे-मोठे गाव असल्याने या शहराची आर्थिक उलाढाल ही ग्रामीण भागातील नागरिक व शेतकर्‍यावर जास्त अवलंबून आहे.सणासुदीच्या काळात विशेषता दिवाळीच्या वेळी शहरातील नागरिकासह ग्रामीण भागातील नागरिक खरेदीसाठी मोठ्या संख्येने या शहरात येतात. कोरोनामुळे दोन वर्ष दिवाळी साजरी करता आली नाही आता कोरोना आटोक्यात आल्यामुळे यंदाची दिवाळी धुमधडाक्यात साजरी केली जाईल त्यामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरात किराणा, कापड, फराळ, आकाशकंदील, पंत्या यासह इतर दुकाने थाटली आहे.मात्र कोरोना त्यानंतर झालेली अतिवृष्टी,गगनाला भिडलेली महागाई आणि लोकांचा ऑनलाईन खरेदीकडे वाढता कल असे तिहेरी संकटीचे सावट दिवाळीवर देखील दिसून येत आहे.एरवी दिवाळी सुरु होण्या अगोदर बाजार पेठेत खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडायची परंतु दिवाळी अवघ्या काही दिवसावर येवून ठेपलेली असताना देखील बाजार पेठेत पाहिजे तेवढे ग्राहक येत नसल्याचे पाहून व्यापार्‍या मध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

दिवाळी सणाच्या वेळी इतकी मंदी आम्ही कधीच पहिली नसल्याचे दुकानदार-व्यापारी सांगतात. अगोदरच कोरोनाने सर्व सण उत्सवावर काहीसे निर्बंध आले होते या सध्या कोरोन आटोक्यात आल्यामुळे शासनाने निर्बंध शिथिल केले असल्याने नागरिक खरेदी साठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडतील असे वाटत होते मात्र अतिवृष्टीने पिके हातातून गेल्यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे तर महागाईमुळे गोरगरीब,मध्यम वर्गीयावर आर्थिक संकट आले आहे.शासकीय नोकरदार यांना नियमितपणे पगार सुरु असून त्यांना महगाई भत्ता,बोनस देखील मिळाल्यामुळे त्यांची दिवाळी व्यवस्थित होत आहे मात्र ते देखील हात राखून खर्च करताना दिसत असल्याचे चित्र आहे.

- Advertisement -

यंदाच्या दिवाळीवर अतिवृष्टी, गगनाला भिडलेली महागाई ऑनलाईन खरेदीच्या वाढत्या क्रेजमुळे बाजारपेठेवर कमालीची मंदी असल्याचे दिसून येत आहे. पिक आले नाही म्हणून हातात पैसा नाही. पैसा नसल्याने दिवाळी साजरी तरी कशी करणार अशा प्रतिक्रिया शेतकरी व ग्रामीण भागातील नागरिकांनी व्यक्त केल्या असून मनमाडसह संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात हीच परिस्थिती असल्यामुळे यंदा दिवाळी सारखा सण देखील आर्थिक कचाट्यात सापडला असल्याचे भयावह चित्र आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -