घरमहाराष्ट्रनाशिकआमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

Subscribe

माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेच्या हस्ते गौरव

संगमनेर : सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचा वारसा सांभाळताना नामदार बाळासाहेब थोरात यांच्याबरोबर आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यात सातत्याने ठेवलेल्या जनसंपर्क व जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी केलेला पाठपुरावा हा अत्यंत कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काढले.

पुणे येथील एस. एम. जोशी सभागृहात यशवंत वेणू प्रतिष्ठान पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने राज्यस्तरीय यशवंत वेणू पुरस्कार प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले होते. तर व्यासपीठावर ज्येष्ठ विचारवंत मधुकर भावे, माजी आमदार उल्हासदादा पवार, कवी रामदास फुटाणे ,उद्धव कानडे, कार्याध्यक्ष रंगनाथ गोडगे, सचिन इटकर, नारायण सुर्वे साहित्य अकादमीचे अध्यक्ष सुदाम मोरे सुनील उकिर्डे आदी उपस्थित होते. याप्रसंगी आमदार डॉ. सुधीर तांबे व नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांच्या शानदार कार्यक्रमात मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन यशवंत वेणू या राज्यस्तरीय पुरस्काराने गौरवण्यात आले.

- Advertisement -

उच्च विद्याविभूषित असलेले आमदार डॉ. तांबे यांच्यासारख्या सुसंस्कृत राजकारण्यांची सध्या राज्याला गरज आहे. एका वर्षात पाच लाख किलोमीटरचा प्रवास करणार्‍या या नेतृत्वाने सदैव प्रत्येकाशी अंतःकरण पूर्वक ठेवलेला संवाद हा संपूर्ण महाराष्ट्रातील इतर नेत्यांसाठी आदर्शवत असल्याचे ते म्हणाले. आमदार डॉ. तांबे म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार प्रेरणा देणारा आहे. महाराष्ट्रातील या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा आदर्श घेऊन आपण राजकारण व समाजकारणात काम करत आहोत.

या नावाने पुरस्कार मिळणे हा जीवनातील आनंदाचा क्षण असल्याचे ते म्हणाले. तर दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, संगमनेरमध्ये काम करताना काही ज्येष्ठ लोक यशवंत वेणू म्हणून हाक मारायचे आज त्याच नावाने पुरस्कार मिळतो आहे. यावेळी माजी आमदार उल्हास पवार, कविवर्य रामदास फुटाणे यांचीही भाषणे झाली.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -