घरमहाराष्ट्रनाशिकनवरत्नांचा हार 'उमामहेश्वर गल्ली'

नवरत्नांचा हार ‘उमामहेश्वर गल्ली’

Subscribe

गोरेराम चौकातून उत्तरेकडून गंगापात्राकडे जाणारी उमामहेश्वर गल्ली, चौकाला गायधनी, ग्यानपागा, कुंटे, उमामहेश्वर गल्ली अशी प्रदक्षिणा घालून गोदाकाठी जाता येते. या चौकातील भव्य वाड्यातून पूर्वी गोदाप्रवाह दिसत असे. या गल्लीच्या दुतर्फा कुलकर्णी, खैरे, भावसार, गवारे, शं. पुजोशी, गाडगीळ या परिवारांचे हे जुन्या काळातील वाड्यांपैकी जोशी यांच्या वाड्याच्या जागेत जैन बांधवांची निवासस्थाने व प्रार्थना मंदिर आहे. गवारे परिवार गोपालक म्हणून प्रसिद्ध होता.

एकमुखी दत्तमंदिराचे पुजारी श्रीपादराव बर्वे यांच्यासह नृत्य, नाट्य, वाद्य, संगीत, मेळे, धार्मिक बाबी या क्षेत्रातील मान्यवर आणि बाळ कर्वे हे बालकलावंत राहत असत. भावसार यांच्या वाड्यात केतकर हे प्रसिद्ध शिक्षक होते. कला सहयोग या नाट्य संस्थेचे संस्थापक, नाट्यकर्मी व महाराष्ट्रातील उत्कृष्ट नाणे संग्राहक, सुवर्ण पदकप्राप्त पुरुषोत्तम भार्गवे व एचएएलचे कुशल तंत्रज्ञ शिरीष भार्गवे यांचे वास्तव्य भावसार वाड्यात आहे.

- Advertisement -

कुंटे गल्ली-चौकातील पूर्व-पश्चिम असलेली अरूंद व सहा-सात वाडे असलेली ही तशी छोटी गल्ली. परंतु, कर्तृत्ववान असामींचे वास्तव्य असलेली मोठी गल्ली. मुख्यत्त्वे ब्राह्मण वस्ती असलेल्या भावसार वाड्यालगत बोहरी समाजातील अबुजीवाला परिवाराचा वाडा आपल्या मातृभाषेबरोबरच मराठी उत्तम बोलणारा आहे. त्या जागेत महापालिकेची गुजराती शाळा भरत. कळवणकर यांच्या रिमझिम नावाच्या प्रसिध्द वाड्यालगतचा वाडा टकले यांचा होता. टकलेबाई या वैद्यकी करत. तो वाडा परांजपे यांनी घेतला. दोन्ही परिवारातील मंडळी प्रसिध्द होती. परांजपे वाड्यात न्यू हायस्कूलचे नामवंत शिक्षक वसंत गडकर यांचे क्लासेस प्रसिध्द होते. या गल्लीत विद्वज्जनांबरोबरच सर्वसामान्य व्यक्तिमत्त्व असलेल्या एका जिद्दी व्यक्तीचा सर्वांनाच मोठा आदर वाटत असे. विठ्ठल लहानू दिंडे हे हॉटेलमध्ये आचारी काम करणारे कारागीर होते. त्यांचे कौशल्य म्हणजे, ४०-५० प्रकारची मिठाई व उत्तम खमंग पदार्थ ते करीत असत. त्यांचे हात अनंतहस्ते कमलावराने देता या उक्तीचा परिचय करून देणारे होते. शहरात त्यांनी गाडीवरून शेव व भेळविक्रीचा व्यवसाय सुरू केला. त्या काळात राजस्थानातील एक महाराज हा व्यवसाय करत. दिंडे यांचे वैशिष्टय असे की कुंटे गल्ली ते नाशिकमधील काही प्रमुख चौकांतून गाडीवर भेळ घेण्यासाठी चौकाचौकांत गटागटाने खवय्ये त्यांची मार्ग प्रतीक्षा करत. पुढे त्यांनी रविवार कारंजा येथे पाणीपुरी विक्री केंद्र सुरू केले.

ओट्याजवळील या केंद्रावर नाशिकमधील अनेक मंडळी परिवारासह रात्री बारापर्यंत गर्दी करत. परिसराला चौपाटीचे स्वरूप प्राप्त झाले होते. पुढे त्यांनी पान स्टॉल टाकला. रात्री दोनपर्यंत पान तंबाखू शौकिनांची गर्दी उसळत असे. श्री सिद्धिविनायक हे त्यांचे आराध्य दैवत आहे. लोथे यांच्या वाड्याच्या दर्शनी भागात छोटीशी मूर्ती ठेवून ते पूजाअर्चा करत. चतुर्थीला अतिशय गर्दी जमत असे. दिंडे यांच्या परिवारातील लक्ष्मीबाई या पत्नीने व मदन, संजय, दीपक, संतोष यांनी आता शीतल सोसायटीत स्वखर्चाने भव्य मंदिर उभारले आहे. गोरेराम लेन गल्लीतील पंचरत्नेश्वराप्रमाणे दिंडे यांचे सिद्धिविनायकाच्या दर्शनास (टाकळी रोड) येथे भाविकांची नित्य गर्दी असते. दिंडे यांनी रूपकमल नावाचा मेळा गणेशोत्सवातील कार्यक्रमासाठी तयार केला होता.

- Advertisement -

रंगभूषा, गीतलेखन, नकला इत्यादी बाजू कुशलतेने ते पार पाडीत असत. नाशिक शहरातील अग्रणी मेळ्यांपैकी रूपकमल मेळा होता. असे अंतरी नाना कळा असलेले विठ्ठल दिंडे कुंटे गल्लीत राहत असत. त्यांच्या शेजारचा वाडा नवरत्नातील आणखी एक रत्न आहे. नाशिकमध्ये महाराष्ट्र व भारतासह परदेशातही तेजोमयी गोपाळराव हरी कुंटे यांचा वाडा ग्वाल्हेरच्या सिंदीया पब्लिक स्कूलचे उपप्राचार्य असलेले गोपाळराव नाशिक येथे कायम वास्तव्यासाठी आले. ते थिऑसॉफीचे १९१२ ते १९७१ अर्धशतकाहून अधिक काळ सभासद होते. या विषयातील सुमारे ५०० दुर्मिळ व महत्त्वाची पुस्तके त्यांच्या छोट्याशा ग्रंथालयात होती. १९४२ मध्ये नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. वाचनालयासाठी त्याकाळी ५० हजारांची देणगी देणारे एफ. एच. दस्तूर हे पारशी समाजाचे मान्यवर शिक्षक, त्यांचे उपरोक्त सोसायटीचे प्रमुख सहकारी होते. आंतरराष्ट्रीय थिऑसॉफीचे अधिवेशन डिसेंबरमध्ये होत असे.

भारतामधील अड्यार, मद्रास वाराणसी येथील महत्त्वाच्या अधिवेशनास ते आवर्जुन उपस्थित राहत व भाग घेत. कुंटे यांच्या वाड्यात दर मंगळवारी चुंबळे फोटोग्राफर, सदावर्ते कापड व्यापारी, राहणे, दस्तूर, ले. कर्नल भडभडे, सुब्रह्मण्यम आदी मान्यवरांची चर्चात्मक बैठक असे. गोपाळराव कुंटे यांचा अध्यात्माचा सखोल अभ्यास होता. गोपाळरावांच्या उज्ज्वल परंपरेत त्यांचे पुत्र रामभाऊ कुंटे हे शैक्षणिक, इतिहास, पुरातत्त्व व सांस्कृतिक क्षेत्रातील महनीय व्यक्तिमत्त्व. तिक्ष्ण बुद्धिमत्ता, आकलनशक्ती, हजरजबाबीपणा या गुणांमुळे त्यांच्याशी संवाद साधताना समोरच्या व्यक्तीवर त्यांची चटकन छाप पडते. ते नाशिकच्या प्रसिध्द शिक्षण प्रसारक मंडळाच्या सेवेत कार्यरत होते. श्रेष्ठ गणितज्ज्ञ म्हणून प्रसिध्द कुंटे यांनी हुतात्मा अनंत कान्हेरे स्मृती समिती व मुख्यत्त्वे भारतीय इतिहास संकलन समितीचे (महाराष्ट्र) जिल्ह्यात कार्य केले. जिल्हा समितीचे सदस्य म्हणून महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. समितीने नाशिक, त्र्यंबकेश्वर व सांस्कृतिक यथा दर्शन हा ग्रंथ व परिषदेनिमित्त गौतमी ही स्मरणिका प्रसिद्ध केली.

(संदर्भ : सावानाचे माजी अध्यक्ष मधुकर झेंडे लिखित चौकांचा इतिहास पुस्तकातील लेख)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -