घरमहाराष्ट्रनाशिकमिळकती पाचशे कोटींच्या, भाडे २० लाख

मिळकती पाचशे कोटींच्या, भाडे २० लाख

Subscribe

पंचनामा मिळकतींचा : मिळकतींचा व्यावसायिक वापर करणार्‍या संस्थांकडूनही प्रशासन अल्प भाडे आकारत असल्याने त्याचा मोठाच आर्थिक फटका पालिकेला बसत आहे.

‘महापालिका ही नफा कमवणारी संस्था नाही,’ असे म्हणत मिळकतींचा व्यावसायिक वापर करणार्‍या संस्थांकडूनही प्रशासन अल्प भाडे आकारत असल्याने त्याचा मोठाच आर्थिक फटका पालिकेला बसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार महापालिकेच्या मालमत्तांची एकूण किंमत काढल्यास ती पाचशे कोटींपेक्षा अधिक निघेल. मात्र, या मिळकतींच्या माध्यमातून महापालिकेला जेमतेम २० लाख रुपयांपर्यंतच वार्षिक भाडे प्राप्त होते. विनामूल्य सेवा देणार्‍या आणि अल्प शुल्क घेऊन सेवा देणार्‍या संस्था वगळता व्यावसायिक वापर करणार्‍यांकडून रेडीरेकनरच्या दराने भाडे आकारल्यास महापालिकेला कोट्यवधींचे उत्पन्न प्राप्त होऊ शकते.

महापालिकेच्या मिळकतींचा गैरवापर होत असल्याच्या मुद्यावरून प्रशासनाने संबंधित मिळकती सील करण्याची कारवाई सुरू केली. मात्र, त्यात सर्वसामान्यांचा थेट संबंध असलेल्या अभ्यासिका, वाचनालय आणि व्यायामशाळांनाच लक्ष्य केले गेले. प्रत्यक्षात ज्या मिळकती केवळ राजकीय वजन वापरून नाममात्र भाडेतत्वावर देण्यात आलेल्या आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्याचे धारिष्ठ्य प्रशासनाने केलेलेच नाही. बँका, शिक्षण संस्थांचे कार्यालय आदी मिळकती नाममात्र भाडेतत्वावर दिल्या आहेत. सुमारे १७१ मिळकती अक्षरश: मातीमोल किंमतीत ’उपभोग’ल्या जात आहेत. त्यात ६८ मिळकती अवघ्या दीडशे रुपयांपेक्षा कमी भाड्याने देण्यात आलेल्या आहेत. उर्वरित मिळकतीही थोड्याफार अशाच फरकाने भाडेतत्त्वावर देण्यात आल्यात. स्वयंसेवी संस्थांना अधिक भाड्याच्या कचाट्यातून सोडल्यास हरकत नाही, पण बँका, शिक्षण संस्थांचे कार्यालये, हॉटेल्स आणि मोठ्या व्यवसायिकांकडून अल्प भाडे आकारले जात असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवरही संशय व्यक्त होतो. पंडित कॉलनीतील महापालिकेची जुनी इमारत याचे उत्तम उदाहरण आहे. या एका इमारतीच्या भाड्यातून लाखो रुपयांचा महसूल गोळा होणं शक्य असतानाही केवळ काही हजारांवरच समाधान मानले जात आहे.

- Advertisement -

१५० मालमत्तांना १०१ रुपयांपेक्षा कमी भाडे

ज्यांच्याकडे गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून मालमत्ता अगदी कमी दरात देण्यात आल्या आहेत, त्यांच्याकडून वर्षाला लाखो रुपयांची कमाई होत असल्याचे प्रकार होत आहेत. पालिकेच्या एकूण मालमत्तांपैकी बारा मालमत्तांवर अवघे एक रुपये ते बारा रुपये वार्षिक भाडे आहे. तर १३८ मालमत्ता अशा आहेत की, त्यावर १०१ रुपये वार्षिक भाडे आकारण्यात येत आहेत. १४९ समाजमंदिरे, ८१ सभामंडप, १५१ व्यायामशाळा, ४२ अभ्यासिका व १७ वाचनालयांसाठी पालिकेने दिलेल्या इमारतींवर भाडे आकारणीच होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शंभर ते दोनशे चौरस मीटरच्या शहराच्या मध्यवर्ती भागातील जागा अवघे एक ते १०१ रुपयांना भाडेतत्वावर देण्यात आल्या आहेत.

..तर मिळकती खुल्या

महापालिकेने सील केलेल्या मिळकतींबाबत वेगळी भूमिका घेताना ज्या संस्था रेडीरेकनरच्या अडीच टक्के रक्कम भरतील त्यांच्या मिळकती तत्काळ खुल्या करून दिल्या जातील, असे स्पष्ट केले आहे. महापालिकेच्या महासभेत अडीच टक्के दराऐवजी अर्धा टक्के दर निश्चित झाले, तर पुढील भाड्यात उर्वरित रक्कम वळती करून घेण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -