घरमहाराष्ट्रनाशिकगोदावरीच्या पश्चिम काठाची पंचरत्ने

गोदावरीच्या पश्चिम काठाची पंचरत्ने

Subscribe

गोदाकाठावरील पंचरत्नेश्वर हे प्रसिध्द मंदिर आहे. मंदिरातील शिवलिंगावर सजावटीसाठी पंचमुखी चांदीचा मुखवटा आहे. तो महत्त्वाच्या प्रसंगी व मुख्यत्वे कार्तिक महिन्यात वैकुंठ चतुर्दशीला अवश्य घालतात. हे मंदिर १७५८ मध्ये यज्ञेश्वर दीक्षित पटवर्धन यांनी बांधले. त्यांचे वंशज व्यवस्था पाहतात असे नाशिकमधील हे एकमेव मंदिर आहे. दशभुजा सिद्धिविनायक मंदिराशेजारी भानोसे वाड्यात दादा महाराज पराडकर या थोर पुरुषाची समाधी आहे. भानोसे वंशज आजदेखील नित्य समाधी पूजा करतात. पश्चिमेकडील गोरेरामाच्या पायर्‍यांलगत शीतलादेवीचे प्रसिध्द मंदिर आहे.

श्री गोरेराम मंदिराचे विशेष म्हणजे पूर्व दरवाजाकडे होणारे श्री गंगा गोदावरी दर्शन. पूर्वी गोदावरीच्या महापुराचे दृश्य पाहण्यासाठी नागरिकांची रीघ असे. मंदिराच्या गंगापात्राकडे जाणार्‍या पायर्‍या किती बुडाल्या, त्याची मोजदाद करून नीलकंठेश्वर मंदिर किती पाण्यात गेले. याचा अंदाज घेत असत. पुराच्या लाटांचे आवाज ऐकून गोदामाई प्रक्षुब्ध होत व रौद्ररूप धारण करते. पुराच्या पाण्याच्या लाटेने नारोशंकराचा घंटानाद जेव्हा सुरू होतो तेव्हा श्री शंकराच्या जटेतून भूतलावर आपण अवतरलो, या कृतज्ञ जाणिवेने श्री नारोशंकरास स्नान घालून अभिषेक, आरती गोदावरी करीत असावी असे वाटते. सुवासिनीदेखील गोदावरीस पूजाअर्चा व श्रीफल अर्पण करून ओटी भरीत असत. या गोरेराम मंदिराचे परंपरागत पूजारी पद्मनाभी परिवार केवळ देवभक्तीतच गुंतलेला नव्हता तर समाजरूपी देवतेचे व पूजा बांधण्याचे उत्तरदायित्त्व पार पाडीत होता. त्याचे अग्रणी रामाचार्य पद्मनाभी होते. महात्मा गांधींच्या प्रभावाने प्रेरित होऊन तारूण्यात स्वातंत्र्य चळवळीत ते सहभागी झाले. दलितोध्दार चळवळीचे ते नाशिकमधील प्रमुख गणले जात. जीवनाच्या अखेरीपर्यंत त्याच्या धार्मिक कार्यासाठी स्वत: जात. त्यांना गावातील सर्व मंदिरे सर्वांसाठी खुली करावीत अशी त्यांची आग्रही भूमिका होती. मानवतेची पूजा बांधणारे हे परोपकारी गृहस्थ अविवाहित राहिले. अनेक राजकीय, सामाजिक विशेषत: वसंत व्याख्यानमालेच्या परंपरागत कार्यक्रमाला निराळे स्वरूप त्यांनी दिले. महाराष्ट्र शासनाने त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन स्वातंत्र्यसैनिक म्हणून त्यांना कृतज्ञतापूर्वक गौरविले. पद्मनाभी शास्त्रींच्या कन्या मुळे सरस्वती विद्यालयाच्या नामांकित शिक्षिका होत्या.
गोरेराम मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या नैऋत्य कोपर्‍यात भूयारी मार्ग साधारणत: २५-३० फुटांचा अंधारी मार्ग तो मुरलीधर मंदिरात जात असे. सहलीला आलेले शाळेतील विद्यार्थी व लहान मुले या मार्गाने रामरक्षा म्हणत चाचपडत जात असत आणि मुरलीधर मंदिरात पोहोचताच मुरलीधराची प्रसन्न मूर्ती पाहून सर्व भीती क्षणभरात विसरून जात.

- Advertisement -

मुरलीधर मंदिराकडे जाण्यास भांडी बाजार बालाजी मंदिरासमोरून मुख्य मार्ग आहे. तसाच तो गोरेराम मंदिरालगत गल्लीतूनही आहे. मुरलीधराची लोभस मूर्ती आणि गालावरील नैसर्गिक केशररेखा प्रसन्नता वाढवते. दोन्ही बाजूस दोन वत्स असलेल्या गायी व मध्ये मुरली वाजवित असलेल्या मुरलीधराची पांढर्‍या संगमरवरी पाषाणाची साडेतीन फूट उंचीची मूर्ती फारच मनोहर दिसते. भागवताच्या दहाव्या स्कदातील वर्णनाप्रमाणे आहे. हिंगणे घराण्यातील कोणी पुरूषाने चांदोरी येथून ही मूर्ती नाशिक येथे आणली आणि १८२८ मध्ये गुंडराज महाराज व दादाबाबा नावाच्या भाविकाने मंदिर बांधले व मूर्तीची स्थापना केली. हल्ली संत परिवारातील डॉ. सुधाकर, सोमनाथ व डॉ. संदीप संत परंपरेने उत्सव साजरा करतात. मुळात अर्धनारी नटेश्वराचा पोशाख व सात दिवस हरिनाम सप्ताह असे उत्सवाचे स्वरूप होते. हरिभाऊ तात्या महाराज यांनी श्रीकृष्णाला विविध रूपाने दररोज वेश बदलण्याची परंपरा सुरू केली. आजमितीपर्यंत त्या प्रथेप्रमाणे सुंदर पोशाखात गरूडावरील कृष्ण, मयुरावरील कृष्ण, राधास्वरूप कृष्ण, मोहिनीरूप कृष्ण, अर्धनारी नटेश्वर, झुल्यावरील कृष्ण आणि अष्टमीस बाळरूप दिले जाते. द्वादशीस कृष्णाला अर्धे सोहळे, घोंगडी, केशसंभार हातात काठी, गोफण, बाजूला गायी अशा पोशाखाने सजवितात. सायंकाळी श्रीकृष्णाचा नामकरण सोहळा होतो. त्या वेळी बाळ गोपाळ गवळणींसह फुगड्या, हमामा, हे क्रीडाप्रकार खेळतात. रासक्रीडा केली जाते. कृष्णाला पाळण्यात ठेवून नामकरण विधी होतो. या दिवशी बरेच भाविक लहान मुलामुलींना पाळण्यात टाकून नामकरण करतात. मंदिरात देवासमोर पाळण्यात नामकरण झालेल्या अनेक घटना घडल्याची उदाहरणे सांगितली जातात. अष्टमीला सुरू झालेला हा उत्सव द्वादशी पर्यंत कथा, कीर्तन, प्रवचने पारायणे, नवमीला भंडारा, एकादशीला हरिजागर आणि द्वादशीला कालाप्रसाद देऊन त्याची सांगता होते. सांगता होते खरी, परंतु या सप्ताहातील मुरलीधराची रूपे पाहून ‘दर्शन मात्रे मनोकामना पुरती’ ची प्रचीती येते.

(संदर्भ : सावानाचे माजी अध्यक्ष मधुकर झेंडे लिखित चौकांचा इतिहास पुस्तकातील लेख)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -