घरमहाराष्ट्रनाशिकसॅक्रेड हार्ट शाळेच्या मनमानीविरोधात पालकांचे आंदोलन शिक्षणमंत्र्यांकडे करणार तक्रार

सॅक्रेड हार्ट शाळेच्या मनमानीविरोधात पालकांचे आंदोलन शिक्षणमंत्र्यांकडे करणार तक्रार

Subscribe

शाळेची शंभर टक्के शुल्क भरण्याचा आग्रह; निकालही रोखले

नाशिक : शाळा ऑनलाईन सुरू असल्यामुळे शैक्षणिक शुल्कात 50 टक्के सवलत देण्याची मागणी सॅक्रेड हार्ट कॉन्व्हेंट स्कूलच्या प्रशासनाने अमान्य केल्याच्या निषेधार्थ पालकांनी मंगळवारी (दि.8) शाळेविरोधात आंदोलन केले. शाळेच्या मुख्याध्यापकांशी चर्चा करुनही हा प्रश्न निकाली न निघाल्याने आता शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेण्याचा निर्णय पालकांनी घेतला आहे.

कोरोनामुळे शाळा ऑनलाईन सुरू असल्याने विद्यार्थ्यांना त्याचा शैक्षणिकदृष्ठ्या फायदा होत नाही. तसेच, पालकांनाही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही विद्यार्थ्यांच्या पालकांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या सर्व गोष्टींचा विचार करुन शाळेने चालू शैक्षणिक वर्षात 50 टक्के शुल्क माफ करण्याची मागणी पालकांनी केली होती. तब्बल एक हजार पालकांनी शाळेकडे लेखी पत्र दिले. मात्र, शाळा फक्त तीन हजार रुपये सवलत देऊ शकते, असे शाळेने कळवल्यामुळे संतप्त पालकांनी मंगळवारी सकाळी 11 वाजता शाळेच्या प्रवेशव्दारासमोर आंदोलन केले.

- Advertisement -

प्रवेशाद्वारासमोर दोन तास बसवून ठेवल्यानंतर काही पालकांना चर्चा करण्यासाठी मुख्याध्यापकांनी बोलवले. पालकांची एन्ट्री होताच शाळेतील शिक्षकांनी त्यांना भावनिक आवाहन केले. तुम्ही फीज नाही भरली तर आमचे वेतन कसे होणार? असा सवाल उपस्थित केला. परंतु, सर्वांना ही सवलत लागू केल्यास एकाचवेळी पालक 50 टक्के रक्कम भरुन देतील आणि शाळेचा प्रश्न निकाली निघेल, असे आवाहन त्यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका यांना केले. परंतु, त्यांनी स्पष्टपणे नकार दिल्यामुळे आता पालक थेट शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेणार आहेत.

दरम्यान, शैक्षणिक शुल्क भरले नाही म्हणून सॅक्रेड हार्ट शाळा शाळेने विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवल्याची तक्रार पालकांनी केली. पालकांचे आंदोलन सुरू असल्याने पोलिसही या ठिकाणी दाखल झाले. त्यांच्या उपस्थितीत शाळेच्या मुख्याध्यापकांशी चर्चा झाली. परंतु, शाळा आपली भूमिका बदलण्यास तयार नसल्याने पालक संतापले आहेत.

- Advertisement -

शाळेने समजून घ्यावे

पालकांनी आजवर कधीही शाळेच्या विरोधात भूमिका घेतली नव्हती. मात्र, कोरोनामुळे अनेक पालकांची नोकरी गेली, कुणाचे वेतन कमी झाले तर काहींचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. ही सर्व परिस्थिती शाळेने विचारात घेवून 50 टक्के शुल्क आकारणी करावी. शाळा प्रत्यक्ष सुरू झाल्यानंतर संपूर्ण शुल्क भरायला पालक तयार असल्याचे आंदोलनकर्त्या पालकांनी यावेळी सांगितले.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -