घरमहाराष्ट्रनाशिकदेवळ्याच्या शेतकर्‍याने पिकवली रंगीबेरंगी फुलकोबी

देवळ्याच्या शेतकर्‍याने पिकवली रंगीबेरंगी फुलकोबी

Subscribe

वासोळच्या शेतकर्‍यांचा प्रयोग ठरतोय लक्षवेधी

जगदीश निकम , देवळा : देवळा तालुक्यात बळीराज्याने शेतात अनोखी किमया केली. चक्क तीन रंगाची फुलकोबी पिकवली आहे. देवळा तालुका म्हटलं तर पारंपरिक पद्धतीच्या शेतीसाठी ओळखला तर जातोच पण शेतात नाविन्यपूर्ण प्रयोगशील शेतीसाठी अग्रेसर ठरत आहे.

तालुक्यातील वासोळ येथील शेतकर्‍यांने नाविन्यपूर्ण रंगीबेरंगी फुलकोबीचा प्रयोग यशस्वीरित्या साकारला. जिभाऊ भगवान देसले यांनी आपल्या शेतातील २० गुंठे क्षेत्रावर रंगीबेरंगी फुलकोबीचे उत्पादन घेतले असून, ग्रामीण भागात ही फुलकोबी पिकवल्याने जणू नवलच वाटत आहे. परिसरात पांढर्‍या रंगाची फुलकोबी मोठ्या प्रमाणात पिकवली जाते परंतु देसले यांनी रंगीत फुलकोबी पिकवल्याने परिसरातून रंगीबेरंगी कोबी बघण्यास गर्दी होत आहे.

- Advertisement -

विशेषतः यात जांभळा, पिवळा आणि हिरव्या रंगाच्या फुलकोबीचा समावेश असून या फुलकोबीला मेट्रो सिटीत, फाईव्ह स्टार हॉटेल्स त्याचप्रमाणे इतरही शहरी भागात चांगली मागणी आहे. देसले यांचा मुलगा हितेंद्र व पुतण्या हेमंत यांनी गुगलसारख्या शोध माध्यमांतून या रंगीबेरंगी कोबी वाणाबद्दल माहिती मिळवली. परंतु त्यांना या रंगीबेरंगी फुलकोबीचे बियाणे उपलब्ध होत नव्हते. अखेर देसले यांचा सिजेंटा कंपनीच्या एका कामगारासोबत संपर्क झाला आणि त्यांना लागवडीसाठी ५ ग्रॅमच्या पुड्याचे १८ नग देसले यांनी प्रति नग पाचशे रुपये प्रमाणे खरेदी केले. या फुलकोबीची साधारण ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात लागवड केली जाते, तर तिला परिपक्व होण्यासाठी ७५ ते ८५ दिवस लागतात. सद्या ही रंगीत कोबी साधारण २५ ते ३० रुपये प्रति किलो भावाने विकली जात आहे. देसले यांना २० गुंठ्यासाठी लागवडीपासून ते काढणीपर्यंत साधारण २५ ते ३० हजार रुपये खर्च आला आहे. आतापर्यंत चार टन मालाचे उत्पन्न घेतले असून अजून दोन टन उत्पन्न मिळू शकते असा त्यांचा विश्वास आहे. जाणकारांच्या मते महाराष्ट्रातून पहिल्यांदाच हा प्रयोग नाशिक जिल्ह्यात जिभाऊ देसले यांनी यशस्वी करून दाखविला.

या रंगीत फुलकोबीत व्हिटॅमिन (ए) चे प्रमाण असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. त्याचप्रमाणे त्यात अधीक पोषक तत्वे असल्याने शहरी भागात जास्त मागणी आहे. परंतु जवळपास असलेल्या परिसरात कांदा, मका, बाजरी ही पारंपारिक पिके घेण्यातच शेतकरी गुंतून गेले आहेत. अशातच देसले यांनी आपल्या शेतात आगळावेगळा प्रयोग त्यांनी यशस्वी केला आहे.

- Advertisement -

स्थानिक बाजारपेटात ही फुलकोबी विकली जात नसल्याने देसले यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे त्यांनी आपला माल मुंबई येथील वाशी बाजारपेठ आणि गुजरातमधील वापी बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवावा लागत आहे. ग्रामीण बाजारपेठेत ही कोबी व्यापारी खरेदी करू लागले तर अनेक शेतकरी रंगीबेरंगी फुलकोबीचे उत्पादन घेण्यास तयार होतील, असे मत देसले यांनी व्यक्त केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -