पवार-मोदींची भेट परिस्थिती सावरणारी, बिघडवणारी नव्हे

पालकमंत्री छगन भुजबळ यांनी राजकीय चर्चांना दिला पूर्णविराम

chhagan bhujbal slams bjp on income tax inquiry targets and obc conference

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीमुळे राज्यातील संपूर्ण राजकारण तर्कवितर्कांमुळे ढवळून निघाले आहे. याबाबत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मात्र या भेटीतून स्थिरतेचे संकेत दिल्याने राजकीय फोडण्यांना पूर्णविराम मिळाला.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर पालकमंत्री भुजबळांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या भेटीबाबत भाष्य केले. २०१४ मध्ये पवार-मोदी यांच्या भेटीनंतर ८० तासांचे सरकार स्थापन झाले होते आणि त्यावेळचे राजकीय नाट्य आजही सर्वांना माहित आहे. त्यामुळे या भेटीमुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. या भेटीबाबत तुम्हाला काय वाटते, या प्रश्नावर भुजबळांनी आपली भूमिका व्यक्त केली. पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांची भेट ही सहकार क्षेत्रासंदर्भात होती. त्यामुळे या भेटीमुळे काहीही बिघडणार नाही. याउलट राज्यात स्थिरता येईल. सरकार ५ वर्षे टिकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

चंद्रकांत पाटलांना दिला टोला

राज्य सरकारवर टिका करणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाही पालकमंत्री भुजबळांनी चांगलाच टोला दिला. भाजपातील नाराज असलेल्या पंकजा मुंडे आणि नागपूरातील चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत त्या ठिकाणचे नागरिक काय म्हणतात एकदा बघा. हे सरकार आमचं आहे, तुमचं नाही. आणि थोड्याफार कुरबुरी तर चालूच असतात, अशा शब्दांत भुजबळांनी चंद्रकांत पाटलांना आधी स्वपक्षातील अंतर्गत समस्या सोडवण्याचा सल्ला दिला.