घरमहाराष्ट्रनाशिकलोकप्रतिनिधींच्या मुलांची थाटात लग्न; कोरोना नियमांच्या उल्लंघनाची ‘लगीनघाई’

लोकप्रतिनिधींच्या मुलांची थाटात लग्न; कोरोना नियमांच्या उल्लंघनाची ‘लगीनघाई’

Subscribe

अनेक बड्या नेत्यांची उपस्थिती; पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष

नाशिक: राज्यात कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा धोका वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे राज्यावर निर्बंधांचे सावट असताना शासनाने राज्यात निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार विवाह सोहळ्यांवरील उपस्थितीवर निर्बंध आणण्यात आले असताना लोकप्रतिनिधींच्या मुला-मुलींची लग्न मात्र मोठ्या धुमधडाक्यात संपन्न होत असल्याचे चित्र नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात दिसून येत आहे. नाशिकमध्ये बुधवारी आमदार उदयसिंह राजपूत आणि जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या मुलीच्या लग्नसोहळ्यात तर कोरोना नियम अक्षरशः पायदळी तुडवले गेले. विशेष म्हणजे, अनेक बड्या नेत्यांनी या लग्न सोहळ्याला उपस्थिती लावली. त्यामुळे सर्वसामान्यांवर कारवाईचा बडगा उगारणार्‍या पोलीस प्रशासनाकडून आता याबाबत काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नाशिकमध्ये बुधवारी गंगापूर रोडवरील बालाजी लॉन्स येथे कन्नडचे शिवसेना आमदार उदयसिंग राजपूत यांच्या मुलाचा विवाह सोहळा संपन्न झाला, तर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या मुलीचा विवाह सोहळा गंगापूर रोडवरील गीता लॉन्स येथे मोठ्या थाटात संपन्न झाला. कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागल्याने राज्यात विवाह सोहळे तसेच इतर उपक्रमांवर निर्बंध लादण्यात आले आहेत. मात्र, लोकप्रतिनिधींच्या मुलांच्या लग्नात वर्‍हाडी मंडळींची उपस्थिती पाहता नियम फक्त सर्वसामान्यांनाच का, असा प्रश्न उपस्थित होतोय.

- Advertisement -

विशेष म्हणजे, या विवाह सोहळ्यात शिवसेनेचे खासदार संजय राऊत, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, कृषीमंत्री दादा भुसे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी उपस्थिती लावली. मात्र एकानेही मास्क लावलेला नव्हता. सर्वसामान्यांना मास्क नसेल तर दंड करणार्‍या कर्तव्यदक्ष प्रशासनाने मात्र इकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे,हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या वर्‍हाडी मंडळींनाही मास्कचा विसर पडल्याचे दिसून आले. सोशल डिस्टन्सिंगचा तर पुरता फज्जा उडाल्याचे दिसून आले. या सोहळ्याच्या निमित्ताने सर्वसामान्यांना एक न्याय आणि राजकीय नेत्यांना वेगळा न्याय अशी चर्चा सुरु असून सर्वसामान्यांवर कारवाई करणार्‍या पोलिसांकडून आता काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नगरमध्येही शाही विवाह सोहळा

भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या मुलाचा बुधवारी विवाह सोहळा होता. कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवत मोठ्या गर्दीसह हा विवाह सोहळा पार पडला. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री गिरीश महाजन, खासदार डॉ. सुजय विखे-पाटील आदींसह भाजप नेते उपस्थित होते.

- Advertisement -

काय आहे नियम?

राज्यात 24 डिसेंबर रोजी मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांच्या स्वाक्षरीने निर्बंध जारी करण्यात आले आहे. त्यानुसार संपूर्ण राज्यभर सर्व सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर रात्री 9 ते सकाळी 6 यावेळेत बंदी असेल. लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहांमध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या 100 च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या 250 च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के यापैकी जे कमी असेल ते मात्र, या नियमांचे जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यात व कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यात पालन झाले नाही. आता नाशिक पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन काही कारवाई करते का, याची उत्सुकता लागली आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -