घरमहाराष्ट्रनाशिकस्मार्ट सिटीचे सीईओ प्रकाश थविल यांचा बदलीचा ठराव

स्मार्ट सिटीचे सीईओ प्रकाश थविल यांचा बदलीचा ठराव

Subscribe

महासभेत सदस्य आक्रमक स्मार्ट कामांचा चक्काचूर झाल्याचा आरोप

स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांची कारकिर्द अनेक वर्षांपासून वादात आहे. स्मार्ट कामात ठेकेदारांना पाठीशी घालणे, नगरसेवकांना स्मार्ट कंपनीच्या प्रकल्पांबददल पुरेशी माहिती न देणे आदी बाबी थविल यांच्या विरोधातातील रोषाला कारणीभुत आहेत. तसेच थविल हे महासभेला पूर्वसुचना न देता अनुपस्थित असल्याने त्यांची बदली करण्यात यावी, असा ठराव महासभेत करण्यात आला.

स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात सुरू असलेल्या कामांबाबत येणारया तक्रारींची दखल घेत या कामांविषयी चर्चा करण्यासाठी मंगळवारी विशेष महासभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या सुरुवातीलाच स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल उपस्थित नसल्याने सदस्यांनी संतप्त होत संबंधितांनी महासभेचा अपमान केला असून त्यांना तातडीने बडतर्फ करण्याची मागणी केली. यावेळी सदस्यांनी स्मार्ट सिटी कामांचा पंचनामा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून स्मार्ट सिटीअंतर्गत शहरांचा विकास होत असतांना नाशिकमध्ये मात्र स्मार्ट सिटीच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींच्या स्वप्नांचा चक्काचूर झाल्याचा आरोप सदस्यांनी केला. स्मार्ट सिटी अंतर्गत ५४ कामे दाखवण्यात आलेली आहे. मात्र प्रत्यक्षात २० कामे ही या प्रकल्पांतर्गत येत असून एक दोन कामे वगळता पाच वर्षात या प्रकल्पांतील एकही काम पूर्ण झाले नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. थविल यांचा मनमानी काभार आणि अरेरावी यामुळे सत्ताधार्‍यांसह विरोधक हैराण झाले आहेत. शहरात ठिकठिकाणी खड्डे खोदून ठेवण्यात आले असून नाशिककरांना खड्ड्यात घालण्याचे काम करण्यात आल्याने जनतेच्या मनात महापालिकेविषयी रोष आहे. शहरात स्मार्ट सिटी कंपनीने कोणते प्रकल्प पूर्ण केले याची माहिती द्यावी, अशी मागणी नगरसेवक गुरूमित बग्गा यांनी केली.

- Advertisement -

केंद्र व राज्य शासनाकडून मंजूर निधी पुरेशा प्रमाणात प्राप्त झाला नसताना महापालिकेने दोनशे कोटी कसे दिले, असा सवाल उपस्थित करत स्मार्ट सिटी कंपनीकडून महापालिकेचे दोनशे कोटी परत घ्यावेत अशी मागणीही यावेळी करण्यात आली. काँग्रेस गटनेते शाहू खैरे म्हणाले, स्मार्ट सिटीअंतर्गत जी कामे सुरू आहेत त्या सर्व कामांचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे उर्वरित कामे नगरसेवकांना विश्वासात घेऊन करावीत. सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन या कामांची पाहणी दौरा केला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. २०१५ मध्ये कंपनीची स्थापना करण्यात आली. पाच वर्षात प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित असताना अद्याप एकही काम पूर्ण झाले नसल्याचा मुद्दा नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी मांडला. या कामांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी बडगुजर यांनी केली. ४० टक्के अतिरिक्त टेंडर केले गेले, कामे चुकीची झाली याला जबाबदार कोण असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. स्मार्ट सिटी बरखास्त करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केली. या कामांसाठी केपीएनजी नावाचा कन्सल्टंट आहे, त्यांना ३० ते ४० कोटी रुपयांची फी दिली गेली. परंतू शहरात अवघे ३ ते ४ टक्केच कामे झाली आहेत. नगरसेवकांची पाच लाखांची विकास कामे होत नाहीत पण आपले २०० कोटी स्मार्ट सिटी कंपनीकडे पडून आहे असे सांगत स्मार्ट सिटी कंपनी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशाराही बोरस्ते यांनी दिला. नगरसेवक सलिम शेख यांनी कामांबाबत आक्षेप नोंदवत मनसेने केलेली कामे स्मार्ट सिटी अंतर्गत केल्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. सदस्यांच्या भावना जाणून घेत महापौर सतीश कुलकर्णी यांनी आपणही स्मार्ट कामांची पाहणी केली असता अनेक त्रुटी आढळून आल्याचे सांगितले. सदस्यांच्या भावना विचारात घेऊन सीईओ प्रकाश थविल यांच्या बदलीचा ठराव होत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक हिमगौरी आडके, भाजप गटनेते जगदीश पाटील, योगेश हिरे, अजिंक्य साने, गजानन शेलार, दीक्षा लोंढे, शिवाजी गांगुर्डे, सुनील गोडसे, डॉ. हेमलता पाटील यांनी स्मार्ट कामांबाबत नाराजी व्यक्त केली.

महापालिकेची उदारता का?

या प्रकल्पासाठी केंद्र ५०० कोटी देणार होते, त्यापैकी १९६ कोटी प्राप्त झाले. राज्य शासनाकडून २५० कोटींपैकी ९८ कोटी रुपये प्राप्त झाले. महापालिकेने २५० कोटींपैकी २०० कोटी रुपये दिले. या सर्व कामांची प्राकलने अतिरिक्त दराने जात असताना याचे दायित्व महापालिकेला द्यावे लागेल, याकरीता ६०० कोटी लागतील. त्यामुळे शासन जितका निधी देईल, त्याचप्रमाणात महापालिकेनेही निधी द्यावा, असा मुद्दा मांडत दोनशे कोटी परत घ्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

- Advertisement -

प्रकल्पांचा दर्जा निकृष्ट

कराराप्रमाणे वेळेत प्रकल्प पूर्ण करणे हे ठेकेदाराची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यास संचालक मंडळ जबाबदार नाही. शहरात कोट्यवधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेले नेहरू उद्यान, शहरातील अंत्यसंस्कारासाठी स्मार्ट सिटी अंतर्गत तयार केलेली विद्युत दाहिनी, त्र्यंबकनाका ते अशोकस्तंभ दरम्यानचा स्मार्ट रस्ता हे प्रकल्प अत्यंत निष्कृष्ट दर्जाचे झाले. यामध्ये मोठे आर्थिक नुकसान झाले. स्मार्ट सिटी अंतर्गत झालेली सर्व कामे संशयास्पद आहेत. थविल हे मनमानी पद्धतीने कामकाज करीत असल्याबाबत यावेळी नगरसेवकांनी नाराजी दर्शवली.

सीबीआय चौकशी करा

स्मार्ट सिटी कंपनीचे सीईओ प्रकाश थविल यांच्या कार्यप्रणालीबाबत सदस्यांनी संताप व्यक्त केला. थविल यांच्या कारभाराबाबत वारंवार महासभेत मुद्दा उपस्थित करूनही थविलांवर असलेल्या वरदहस्तामुळे ही अधिकची कामे केली जातात, यात वाटेकरी कोण याची सीबीआय चौकशी करा, अशी मागणी करत कुंटेंना थविलच का हवेत असा सवाल केला गेला. थविल हे कुंटेंचे टोलवसुली करणारे आहेत का, असा गंभीर आरोप गजानन शेलार यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -