घरमहाराष्ट्रनाशिकराज्य, राष्ट्रीय क्रिकेटमध्ये नाशिककर महिलांचा डंका

राज्य, राष्ट्रीय क्रिकेटमध्ये नाशिककर महिलांचा डंका

Subscribe

ईश्वरी, मायाच्या कामगिरीने चार चाँद; सरत्या वर्षातील कामगिरीने नववर्षात मिळणार उभारी

शुभांगी खेलुकर , नाशिक :
क्रीडा स्पर्धांमध्ये सातत्याने आपला दबदबा कायम ठेवणार्‍या नाशिककरांनी क्रिकेटमध्येही आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. यात महिलाही मागे नाहीत. गेल्या वर्षभरातील कामगिरी पाहता विभागीय स्पर्धांसह राज्य, राष्ट्रीय स्पर्धांमध्येही नाशिकच्या मुलींनी मैदाने गाजवल्याचे दिसून येते. यात माया सोनवणे, ईश्वरी सावकार, रसिका शिंदे, प्रियांका घोडके, साक्षी कानडी, लक्ष्मी यादव यांची नावे आवर्जून घेतली जातील. नववर्षात या महिला क्रिकेटर्समधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निश्चितच नाशिककर बघायला मिळतील, अशी अपेक्षा क्रीडावर्तुळातून व्यक्त केली जात आहे.

नाशिक जिल्ह्यातील सिन्नरसारख्या ग्रामीण भागातून आलेल्या माया सोनवणेसह साक्षी आणि प्रियांकाने राज्य स्पर्धांमध्ये सातत्याने दमदार कामगिरी केली. ज्याद्वारे त्यांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या यादीत नाशिकचे नाव सातत्याने उल्लेखित ठेवले. याचबरोबरीने ईश्वरी सावकारने १६ वर्षाखाली महिलांच्या महाराष्ट्र संघात खेळताना नाशिककरांची मान उंचावली. उजव्या हाताची आक्रमक फलंदाज ईश्वरीने नुकत्याच झालेल्या चॅलेंजर ट्रॉफीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत भारतीय संघासाठी आपली दावेदारी सिद्ध केली होती. नुकत्याच झालेल्या इन्व्हिटेशन मॅचेसमध्ये ईश्वरीने भरपूर प्रयत्न केले. मात्र, तिला भारत अ संघात स्थान मिळवण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. सद्यस्थितीत ती महाराष्ट्राच्या १९ वर्षाखालील संघात खेळतेय. सिन्नरच्या माया सोनवणेही डेहराडून येथे झालेल्या महिला एकदिवसीय सामन्यात महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले.

- Advertisement -

या स्पर्धेत लेग स्पिन गोलंदाज असलेल्या मायाने ५ सामन्यांत २१ षटाकांत केवळ ७० धावा देत ४ गडी बाद करत सर्वांचे लक्ष वेधले. तिची गोलंदाजीतील ही सर्वोत्तम कामगिरी होती. २०१४-१५ तसेच २०१७-१८ च्या हंगामात २३ वर्षाखालील महिलांच्या स्पर्धेत मायाने भारतात सर्वाधिक १५ गडी बाद करण्याची किमया केली. पुदुच्चेरी येथे झालेल्या २३ वर्षाखालील टी-२० सामन्यांच्या स्पर्धेत २०१८-१९ तिने महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करताना सातत्याने दमदार कामगिरी केली. याच जोरावर तिची चॅलेंजर ट्रॉफीसाठी भारत ‘अ’ संघात निवड झाली. मुख्य म्हणजे, मायाने ही निवड सार्थ ठरवत संघाच्या विजयात मोलाचे योगदानही दिले. गेल्या वर्षी सिन्नरच्याच साक्षी आणि प्रियांकाने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले होते. एका अत्यंत लहानशा गावातून नाशकात आलेल्या या तिघींनी अल्पावधीतच आपली छाप सोडली. राज्य पातळीवर त्यांनी केलेल्या कामगिरीने नाशिकच्या महिला क्रिकेटमध्ये नवचैतन्य संचारले.

याचीच फलनिष्पत्ती म्हणून नाशकातून महिला क्रिकेटर्सची संख्या कमालीची वाढलेली दिसून येत आहे. उदयोन्मुख खेळाडूंमध्ये लक्ष्मी यादव हे नाव आवर्जून घेता येण्यासारखे आहे. गेल्या मोसमात तिची सातत्यपूर्ण अन् लक्ष्यवेधी कामगिरी वाखाणण्याजोगी अशी आहे. १९ वर्षाखालील महाराष्ट्र राज्य संघात तिने महत्त्वपूर्ण योगदान दिले. तिच्यासह शाल्मली क्षत्रिय, ज्ञानेश्वरी देवरे, कार्तिकी देशमुख या तिघींनीही आपल्या कामगिरीतील सातत्यामुळे सर्वांचेच लक्ष वेधले आहे. २०२२ मध्ये या महिला खेळाडूंमधून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रिकेटर्सची ओळख होईल, यात शंका नाही. सर्व खेळाडूंना जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद शहा, सचिव समीर रकटे, प्रशिक्षक भावना गवळी, मार्गदर्शक मंगेश शिरसाठ, संदीप सेनभक्त, फिटनेस ट्रेनर विनोद यादव आदींसह जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांचे मार्गदर्शन लाभते.

- Advertisement -

भावना गवळींचे योगदान

जिल्हा क्रिकेट संघटनेच्या महिला संघप्रशिक्षक भावना गवळी यांची महाराष्ट्र महिला वरिष्ठ संघाच्या सहायक प्रशिक्षकपदी तसेच संघ व्यवस्थापकपदी निवड झाल्याने नाशिककर महिला खेळाडूंच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची बाब ठरत आहे. गेल्या दोन वर्षांपासून भावना गवळी यांचे सर्व महिला खेळाडूंना प्रशिक्षण लाभत असून, त्याचीच फलनिष्पत्ती म्हणून आज राज्य, राष्ट्रीय पातळीवर महिला खेळाडूंचा दबदबा बघावयास मिळत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -