घरमहाराष्ट्रनाशिकगोदाकाठी कारवाईविनाच परतले अतिक्रमण निर्मूलन पथक

गोदाकाठी कारवाईविनाच परतले अतिक्रमण निर्मूलन पथक

Subscribe

बड्या अतिक्रमणधारकांपुढे म्यान, दुबळ्यांवर मात्र आघात

पंचवटी : गंगाघाटावरील शाही मिरवणूक मार्गावरील झोपड्यांचे अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाला अतिक्रमणधारकांच्या रोषामुळे माघार घेत रिकाम्या हाती परतावे लागले. दरम्यान, कानाकोपर्‍यात अतिक्रमण मोहीम राबविणार्‍या महापालिका प्रशासनाची मध्यवर्ती भागातील बड्या अतिक्रमणांकडे सोयीस्कर डोळेझाक करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना गणेश विसर्जन ठिकाणांची पाहणी करत असताना हे अतिक्रमण निदर्शनास आले होते. त्यानंतर ते त्वरित हटवण्याचे आदेश अतिक्रमण विभागाला आयुक्तांनी दिले होते. नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून सोमवारी (दि.१२) दुपारी १ वाजेच्या सुमारास झोपड्यांचे अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेतली. यावेळी पंंचवटी, पूर्व विभागाचे विभागीय अधिकारी, अतिक्रमण विभागाच्या कर्मचार्‍यांसह २ अतिक्रमण पथकांतील वाहने व १५ ते २० पोलीस कर्मचार्‍यांचा बंदोबस्त देण्यात आला होता. प्रत्यक्षात, पालिकेने झोपड्या हटवण्याचे काम सुरू करताच झोपडीधारक महिलांनी पालिका अधिकारी-कर्मचारी, पोलिसांना अतिक्रमण काढण्यासाठी तीव्र विरोध केला. त्यावेळी अतिक्रमणधारक आणि पालिका कर्मचार्‍यांमधील वादामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. यावेळी एका महिलेने मोहीमेतील वाहनावर चढून आपले साहित्य कर्मचार्‍यांच्या ताब्यातून घेण्याचा प्रयत्न केला. कर्मचार्‍यांनी या मोहीमेत संबंधित महिलेला दूर केले.

- Advertisement -

अर्थपूर्ण हितसंबंध

शहरात झोपड्यांसह फुटपाथवरील अतिक्रमित विक्रेत्यांची संख्यादेखील वाढली आहे. या प्रकाराला अतिक्रमण विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी जबाबदार असून, त्यांचे अर्थपूर्ण हितसंबंध यामागील खरे कारण असल्याचे सांगितले जात आहे.

पंंचवटीत तपोवन, औरंगाबाद रोड, दिंडोरी रोड, पेठरोड यांसह अनेक ठिकाणी अशा अनधिकृत व अतिक्रमित झोपड्या मोठ्या प्रमाणावर फोफावल्या आहेत. पालिकेकडून वेळीच कारवाई झाली तर वाढणार्‍या अतिक्रमणांवर आळा बसू शकेल.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -