घरमहाराष्ट्रनाशिकऐन पावसाळ्यात पालिकेवर हंडा मोर्चा

ऐन पावसाळ्यात पालिकेवर हंडा मोर्चा

Subscribe

नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण काठोकाठ भरलेले असताना ऐन पावसाळ्यात सातपूर परिसरातील पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. यामुळे संतप्त नागरिकांनी भाजपचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांच्या नेतृत्वात महापालिकेच्या राजीव गांधी भवनावर हंडा मोर्चा काढला होता. यावेळी पाणीप्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात आली.

नाशिक शहराला गंगापूर धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, काही दिवसांपूर्वी सातपूर-त्र्यंबक रोडवर नाशिक महापालिकेची १२०० मिलीमीटर व्यासाची पाईपलाईन फुटली होती. त्यानंतर तातडीने पालिकेकडून युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम करण्यात आले. त्यानंतर पुन्हा अनेक भागात पाणीपुरवठा सुरळीत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. परिणामी आज नाशिक महापालिकेवर हंडा मोर्चा काढण्यात आला. विशेष म्हणजे पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सद्यस्थितीत गंगापूर धरण 90 टक्क्यांवर भरले आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील इतरही धरणेही तुडुंब भरली आहेत.

- Advertisement -

नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण भरल्याने पुढील काही काळासाठीचा पाणी प्रश्न मिटला आहे. असे असताना शहरात अनेक ठिकाणी पाणीपुरवठा सुरळीत नसल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. एका बाजूला शहर ढगफुटी होत आहे. शहरातील रस्त्यांवर गुडघ्याएवढे पाणी आहे. मात्र दुसरीकडे नागरिकांचे घसे कोरडेच असल्याचे चित्र दिसत आहे. पाणी आहे मात्र पाणीपुरवठा सुरळीत नसल्याने नागरिकांना पाण्यावाचून दिवस काढावा लागत असल्याची खंत नागरिकांनी यावेळी बोलून दाखवली त्यामुळे नाशिक मनपाचा भोंगळ कारभार व व्यवस्थापनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी महापालिकेच्या मुख्यालयावर हंडा मोर्चा काढत पाणीप्रश्न कधी सोडवणार? तसेच नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष कधी देणार, असा सवाल केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -