घरक्राइमआर्थिक व्यवहारातून टोळक्याचा एकावर हल्ला

आर्थिक व्यवहारातून टोळक्याचा एकावर हल्ला

Subscribe

आर्थिक व्यवहारातून चौघांच्या टोळक्याने एकावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना फेमस बेकरीमागे, प्रज्ञानगर, नानावली येथे घडली. याप्रकरणी अब्दुल हमीद अब्दुल गणी शेख यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार समीर ऊर्फ बादशाह, याकुब, गेंड्या, रियाज यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार पोलिसांनी समीर ऊर्फ बादशाह, याकुब व गेंड्या यांना अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, पैशांच्या देवाण-घेवाण व्यवहारावरुन अब्दुल शेख यांना संशयितांनी शिवीगाळ व मारहाण केली. त्यानंतर संशयितांनी त्यांच्या खिशातील १५ हजार रुपये काढून घेतले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गवळी करत आहेत.

अल्पवयीन मुलीचा विनयभंग

नाशिक : तू माझेसोबत चल, मला तुझ्याशी बोलायचे आहे, असे म्हणत एकाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला.
याप्रकरणी महिलेने नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी आडसरे (ता.इगतपुरी, जि.नाशिक) येथील संशयित निखील पुंजाराम गबाले (वय २३) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी घराबाहेर अंगणात कपडे धुत असताना संशयित गबाले तिच्याजवळ आला. तू माझेकडे दुर्लक्ष का करते. तू माझेसोबत चल, मला तुझ्याशी बोलायचे आहे, असे म्हणत गबाले याने मुलीचा विनयभंग केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गांगुर्डे करत आहेत.

- Advertisement -

देवी मंदिरातून अष्टधातूची चोरी

देवी मंदिरातून अष्टधातूची चोरी झाल्याची घटना ज्युपिटर हॉटेलमागे देवी मंदिरात, वासन नगर, पाथर्डी फाटा येथे घडली. याप्रकरणी योगेश इंगळे यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, देवी मंदिराचा दरवाजा उघडून चोरट्याने अष्टधातूचे श्रीयंत्र लंपास केला. ही बाब योगेश इंगळे समजताच त्यांनी मंदिरात येत पाहणी केली. मात्र, यंत्र कोठेही दिसून आले नाही. त्यातून यंत्र चोरीला गेल्याची खात्री झाली. पुढील तपास पोलीस हवालदार राणे करत आहेत.

कुरापत काढत एकाला शिवीगाळ, मारहाण

नाशिक : कुरापत काढत दोघांनी एकास मारहाण केल्याची घटना सोमवारी (दि.३१) सायंकाळी ७.३० वाजेदरम्यान सण्डे बाजार, हाडोळा, देवळाली कॅम्प येथे घडली. याप्रकरणी यश अनिल खरात यांनी देवळाली कँम्प पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी देवळाली कँंम्प येथील संशयित सागर बंगाली (वय २१) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, यश खरात यांचे अनिल खरात सण्डे बाजारातील मच्छी विक्री दुकानाजवळ माशाच्या खोक्यामध्ये बर्फ भरत होते. त्यावेळी संशयित सागर बंगाली रिक्षामध्ये दारु पिल्यानंतर एका घराजवळ लघूशंका करत होता. अनिल खरात यांनी त्यास हटकले. त्याचा राग आल्याने सागर बंगाली याने रात्री ९.३० वाजेदरम्यान भांडणाची कुरापत काढून खरात यांच्या घराजवळ आले. त्याने अनिल खरात यांना घराबाहेर बोलवले. त्याने शिवीगाळ करत अनिल खरात यांना मारहाण केली. त्यावेळी अब्राल ऊर्फ लड्डू याने अनिल खरातांवर चाकूहल्ला केला. पुढील तपास पोलीस नाईक आर. व्ही. मिरजे करत आहेत.

- Advertisement -

स्विमिंग पुलामध्ये एकाचा मृत्यू

देवळाली कॅम्प येथील मेरुभूमी सोसायटीतील स्विमींग पुलामध्ये गेलेल्या एकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.३०) मेरुभूमी सोसायटीत घडली. याप्रकरणी देवळाली कँम्प पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. किर्तीकुमार पोपटलाल शहा (५२) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मेरुभूमी सोसायटीत स्विमींग पूल आहे. रविवारी सुमारे १५ मुले स्विमींग पुलामध्ये पोहत होती. त्यावेळी किर्तीकुमार शहा पोहण्यासाठी आले. दरम्यान, त्यांचा मृत्यू झाला. त्यांना पोहता येत असल्याने पाण्यात विजेचा धक्का लागल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे की अन्य कारणामुळे मृत्यू झाला, याचा तपास पोलीस करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -