घरमहाराष्ट्रनाशिकशेती करू की पाल्यांचे आधार अपडेट करू? शहरासह ग्रामीण भागातील पालकही त्रस्त

शेती करू की पाल्यांचे आधार अपडेट करू? शहरासह ग्रामीण भागातील पालकही त्रस्त

Subscribe

नाशिक : शाळेतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पात्र ठरविण्यासाठी त्यांचे आधारकार्ड अपडेटची सक्ती करण्यात आली आहे. शाळेची संचमान्यता आधारकार्ड अपडेट असलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येवर होणार आहे. त्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थी व पालक यांच्या मागे आधारकार्ड अपडेट करण्यासाठी तगादा लावला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. ग्रामीण भागात ऐन पेरणीच्या मोसमात पालकांना आपल्या पाल्याचे आधारकार्ड अपडेट करण्यासाठी हातचे काम सोडून आधार सेंटरवर चकरा माराव्या लागत आहेत.

१ जानेवारी पासून आधार अपडेटसाठी असलेल्या कागदपत्रात बदल झाल्याने पालकांची मोठी धावपळ होत आहे. पूर्वी जन्म दाखल्याच्या झेरॉक्सवर, शाळेच्या बोनफाईडवर देखील अपडेट होत होते. मात्र आता जन्म दाखला, बोर्ड सर्टीफिकेट अथवा पासपोर्ट किंवा इतर शासकीय ओळखपत्र यांच्या मुळप्रतीची मागणी होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील पालक वैतागले आहेत. एकाच कामासाठी त्यांना विविध ठिकाणी फिरावे लागत असून नाहक आर्थिक खर्च वाढल्याने ते पुरते वैतागले आहेत. त्यामुळे काही वैतागलेल्या पालकांनी सरळ मुख्याध्यापकांनाच सांगून टाकले आहे की, विद्यार्थी शाळेत ठेवायचा असेल तर ठेवा अन्यथा काढून टाका! ग्रामीण भागातील पालकांकडे मुलांच्या जन्माचे दाखले उपलब्ध नाहीत. काही पालकांनी जन्म नोंद केलेली नाही तर काही पालकांनी जन्म नोंद वेळी वेगळेच नाव दिले आहे.

- Advertisement -

शाळेत प्रविष्ठ करतांना संबंधित विद्यार्थ्याचे वेगळे नाव टाकले. मात्र त्या सर्वांचा त्रास आता होऊ लागला आहे. शाळा स्तरावर आधार अपडेट करण्यासाठी शाळेतील दाखल्याची अटेस्टेड झेरॉक्स, बोनफाईड सर्टिफिकेट दिले जात आहे. मात्र आधार कार्ड सेंटर संचालक असे कागदपत्रे ग्राह्य मानत नसल्याने पालकांचा वेळ व पैसा वाया जात आहे.

शासनाने शालेय विद्यार्थी आधार अपडेट बाबत कागदपत्रे क्लिष्टता कमी करावी अशी मागणी ग्रामीण भागातील पालक व शिक्षकांकडून होत आहे. ग्रामीण भागातील बहुतांश पालक वर्ग शेतकरी असून येन मोसमात शेतीकामे सोडून आधारकार्ड अपडेट साठी चकरा माराव्या लागत आहे. त्यात पुन्हा कागदपत्रे अपुर्ततेमुळे माघारी यावे लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे. शासनाने केंद्र स्तरावर कॅम्प लावण्याची मागणी होत आहे. एकतर अपडेट काम सोपे करा अथवा आधार सक्ती काढा, अशी विनंती विद्यार्थी, पालकांसह शिक्षकांनी करीत आहेत. विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट काम जवळपास ८० टक्के झाले असले तरी उर्वरित २० टक्के विद्यार्थी आधारकार्ड अपडेट करतांना शिक्षकांच्या देखील नाकी नऊ आले आहे. काही विद्यार्थी, पालक याबाबत उदासीन आहेत.

आधार अपडेट करण्यासाठी कागदपत्रांची क्लिष्टता मोठा अडथळा ठरत आहे. जन्म नोंद करतांना वेगळी नोंद व शाळेत प्रविष्ठ करताना वेगळे नाव यामुळे मिसमॅच होत आहे. काही पालकांनी जन्म नोंद पालकांनी केलीच नाही. सातत्याने चकरा माराव्या लागत असल्याने आधार अपडेटसाठी टाळाटाळ वाढली आहे. शाळेच्या बोनफाईडवर अथवा शाळा दाखला अटेस्टेड झेरॉक्सवर अपडेट करण्यास हरकत नाही. : अनिल अहिरे, शिक्षक, चिखलओहोळ

अनावधानाने माझ्या मुलीच्या जन्माची नोंद त्यावेळी केली गेली नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीकडून मला जन्माचा दाखला मिळत नाही. त्यामुळे मुलीचे आधार कार्ड अपडेट करता येत नाही. शाळेचे देखील आधार कार्ड अभावी काम अडले आहे. आता कोणत्या पध्दतीने आधार अपडेट करावे समजत नाही. शिवाय आधार अपडेटच्या कामामुळे शेतीकामे देखील प्रलंबित पडली आहेत. : सीताराम मोरे, पालक,चिखलओहोळ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -