घरमहाराष्ट्रनाशिकप्रभाग ३४ मध्ये कामगार, कसमा पट्ट्यातील मतदानावर लक्ष

प्रभाग ३४ मध्ये कामगार, कसमा पट्ट्यातील मतदानावर लक्ष

Subscribe

रणधुमाळी प्रभाग ३४

नाशिक : जुना प्रभाग क्रमांक २६ व २७ च्या संयोगातून नवनिर्मित प्रभाग ३४ची रचना केली गेली. भागवत आरोटे, राकेश दोंदे, मधुकर जाधव हे तीन विद्यमान तर उत्तम दोंदे हे माजी नगरसेवक याच प्रभागातून निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याने ही निवडणूक हॉट ठरण्याचे राजकीय भविष्य वर्तवले जात आहे. प्रभाग ३४ मध्ये खालचे व वरचे चुंचाळे या गावांचा समावेश असून येथे मध्यमवर्गीय कामगारांची संख्या अधिक आहे.

याशिवाय बहुतांश रहिवासी हे कसमा व खान्देश परिसरातील असल्याने हा भाग पूर्वीपासूनच खान्देश व कसमा प्रभावित प्रभाग म्हणून ओळखला जातो. विशेष म्हणजे, ग्रामीण भागाशी जुळलेली नाळ आजही तितकीच भक्कम असल्याने हा परिसर सातत्याने शिवसेनेचा गड मानला जात आहे. मात्र गेल्यावेळच्या निवडणुकीत भाजप आणि मोदींचा मोठा प्रभाव राहिल्याने शिवसेनेच्या वर्चस्वाला छेद देत भाजपने शिवसेनेचा बालेकिल्ला आपल्या अखत्यारीत केला. विद्यमान नगरसेवकांनी प्रभागात रस्ते डांबरीकरण, काँक्रिटीकरण, समाज मंदिर, नवीन जलवाहिनी, क्रीडांगण उभारून कोट्यवधींची विकासकामे केली असली तरी प्रभागातील चुंचाळे भागात रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. या भागात विद्युत पोल उभारले, परंतू त्याला लाईट नाही. रात्री अंधाराचे साम्राज्य असते. लहान-मोठ्या मुलांना येथे खेळण्यासाठी मैदान नाही. या भागात स्मशानभूमीदेखील नसल्याने नागरिकांना, अंत्यसंस्कारासाठी मोरवाडी, सिडको, पंचवटी अथवा सातपूर स्मशानभूमी येथे जावे लागते. याशिवाय लहान-मोठ्या नागरी समस्यांची डोकेदुखी आहेच.

- Advertisement -

प्रभागातील गेल्या तीन दशकांहून अधिक काळापासून प्रलंबित डॉ. आंबेडकर पुतळ्याचा प्रश्न निकाली काढत केलेला लोकार्पण सोहळा हा त्यांच्यासाठी बूस्टरचा डोस ठरला नाही तर नवलच. त्रिस्तरीय प्रभाग रचनेत दोन जागा राखीव तर एक जागा खुल्या प्रवर्गासाठी निश्चित झाल्याने अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या तर काहींच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे. राखीव आरक्षणाचा पहिला फटका शिवसेनेचे दोन विद्यमान नगरसेवक भागवत आरोटे व मधुकर जाधव या दोघांपैकी एकाला बसणार आहे. एकच जागा सुटल्याने येथे ज्येष्ठ नगरसेवक मधुकर जाधव यांना की, नगरसेवक भागवत आरोटे यांना संधी मिळते याकडे सर्व प्रभागाचे आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. अर्थात मधुकर जाधव हे ज्येष्ठतेमुळे निवडणूक लढवण्याची शक्यता कमी असल्याने भागवत आरोटे यांचा एक स्पर्धक कमी होणार आहे. शिवसेनेकडून माजी नगरसेवक उत्तम दोंदें रिंगणात उतरण्याच्या तयारीत असल्याने यावेळीही काका-पुतण्या एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले दिसू शकतात. मागील निवडणुकीत भाजपचे विद्यमान नगरसेवक राकेश दोंदे यांनी आपलेच काका तत्कालीन नगरसेवक उत्तम दोंदे यांचा पराभव केला होता. त्याचा वचपा काढण्याचा प्रयत्न ‘काकां’कडून केला जाऊ शकतो. अर्थात प्रभागाचे स्री-पुरुष आरक्षण कसे होते, यावर पुढची समीकरणे अवलंबून आहेत. शिवसेनेला टक्कर देण्यासाठी भाजपकडूनही जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे, तर कॉग्रेस, मनसे, राष्ट्रवादी यांच्यासह वंचित बहुजन आघाडीच्या इच्छुकांनीही तयारी सुरु केली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे महानगरप्रमुख अविनाश शिंदे यांसह कोरोना काळात सातत्याने अग्रेसर राहिलेले संदीप तांबे, रामदास दातीर, अरुण दातीर, विनोद दोंदे, तेजस्विनी झोले, यशवंत पवार, पुष्पावती पवार, निवृत्ती इंगोले, अशोक पारखे, ज्योती कवर, निवृत्ती गोवर्धने, ज्ञानेश्वर बगडे, सचिन सिन्हा, लता गोवर्धने, योगेश शेवरे, स्वप्निल पासळे, समाधान शिंदे, मच्छिद्र माळी, स्वप्ना माळी, पंकज भामरे, सुभाष गुंबाडे, सुनिता गुंबाडे, रामदास मेदगे, लखन कुमावत, सद्दाम शेख, वैशाली थोरात, डॉ. अमृत सोनवणे तयारीत आहेत.

- Advertisement -

असा आहे प्रभाग

चुंचाळे वरचे, चुंचाळे खालचे, दत्तनगर, रामकृष्ण नगर, संजिवनगर, म्हाडा, अंबिका नगर, जाधव संकूल, विराट नगर, भोर टाऊनशिप

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -