घर महाराष्ट्र आता काय सत्यनारायणाची पूजा सांगत आहेत? अजित पवारांवरून ठाकरे गटाची फडणवीसांवर टीका

आता काय सत्यनारायणाची पूजा सांगत आहेत? अजित पवारांवरून ठाकरे गटाची फडणवीसांवर टीका

Subscribe

मुंबई : भाजपा नेते देवेंद्र फडणवीस ‘उप’ म्हणून पुन्हा आले. ते ‘उप’पददेखील संपूर्ण नाही. आता दिल्लीश्वरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनादेखील ‘उप’ करून फडणवीस यांची अवस्था बिकट केली. ‘‘मी पुन्हा पुन्हा पुन्हा ‘उप उप उप उप’ म्हणून आलो,’’ हे घोषवाक्य अजित पवार यांना शोभते. पुन्हा ज्या अजित पवार यांना फडणवीस चक्की पिसायला पाठवणार होते, त्यांना बाजूला बसवून ते काय आता सत्यनारायणाची पूजा सांगत आहेत? अशी टीका बोचरी टीका ठाकरे गटाने फडणवीस यांच्यावर केली आहे.

हेही वाचा – उद्धव ठाकरे यांच्या अहंकाराचा पिळ कायम आहे, चंद्रशेखर बावनकुळे यांचे टीकास्त्र

- Advertisement -

अजित पवार व मुख्यमंत्री शिंदे यांच्यात संघर्ष आहे. कमजोर, अस्थिर मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली काम करणार नाही, अशी भूमिका अजित पवार 2019पासून घेत आहेत. शिंदे-पवारांच्या वादात जिल्ह्यांना पालकमंत्री मिळू शकले नाहीत, मंत्रिमंडळ विस्ताराचे कोट व अनेकांची बाशिंगे वाया गेली आणि फडणवीस त्यावर काहीच करू शकले नाहीत. कारण दोघांच्या भांडणाची मजा पाहणे, कोंबड्यांच्या झुंजीत कुंपणावर बसणे हेच ‘उप’ धोरण त्यांनी स्वीकारलेले दिसते, अशी टीकाही सामना दैनिकातील अग्रलेखातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली आहे.

भ्रष्टाचाराचे, महिलांवरील अत्याचाराचे आरोप असलेले लोक फडणवीस यांचे मंत्रिमंडळातील सोबती आहेत व या महान ‘उप’ महोदयांना गटारगंगेस अत्तराची नदी म्हणावे लागत आहे. हे असे पुन्हा पुन्हा येणे दुश्मनाच्या नशिबीही नसावे, असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – …आणि फौजदाराचा जमादारही झाला नसता, ठाकरे गटाचे फडणवीस यांच्यावर शरसंधान

फडणवीस हे भांबावलेल्या मनःस्थितीत असल्याने राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती गंभीर बनली आहे. तरुण मुली व महिलांवर दिवसाढवळय़ा भररस्त्यांवर हल्ले होत आहेत. खुनाखुनी सुरू आहे. त्यावर बोलायचे सोडून गृहमंत्री असलेल्या फडणवीसांनी ‘पुन्हा पुन्हा पुन्हा’चे तुणतुणे वाजवणे सुरू ठेवावे हे योग्य नाही, असा सल्ला या अग्रलेखातून देण्यात आला आहे.

महाराष्ट्राची लूट सुरू आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जात नाहीत, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश विधानसभा अध्यक्ष पाळायला तयार नाहीत, पोलिसांचा वापर गुंडांच्या रक्षणासाठी सुरू आहे, जागोजागी लोकांचे बळी जात आहेत. पुन्हा पुन्हा ‘उप उप उप’ म्हणून आलेल्यांच्या नजरेसमोर हे घडत आहे, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.

हेही वाचा – “खरी मिरची झोंबायची बाकी आहे…” संजय राऊतांची चंद्रशेखर बावनकुळेंवर टीका

देवेंद्र फडणवीस हे आधी एक संवेदनशील व्यक्ती होते, पण ‘उप’ झाल्याच्या वैफल्यात त्यांची संवेदनशीलता संपली व अहंकाराचे ते महामेरू बनले. ‘मुख्य’चा ‘उप’ झाल्याच्या न्यूनगंडाने त्यांना अस्वस्थ केले. त्यामुळे त्यांची मानसिक अवस्था समजून घेणे गरजेचे आहे, अशी कोपरखळी ठाकरे गटाने दिली आहे.

- Advertisment -