घरमहाराष्ट्रफडणवीस खोटे बोलण्याची मशीन, महाराष्ट्राची जनताच त्यांना संन्यास देईल; नाना पटोलेंचा हल्लाबोल

फडणवीस खोटे बोलण्याची मशीन, महाराष्ट्राची जनताच त्यांना संन्यास देईल; नाना पटोलेंचा हल्लाबोल

Subscribe

मोदी व फडणवीस सरकारनेच ओबीसी समाजाचा घात केला, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.

माझ्या हातात सत्ता द्या, तीन महिन्यात ओबीसी आरक्षण मिळवून देतो. जर आरक्षण मिळवून दिलं नाही तर राजकीय संन्यास घेईन अशी घोषणा करणारे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द होण्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आदेशाने चालणारा भारतीय जनता पक्ष, केंद्रातील मोदी सरकार व तत्कालीन फडणवीस सरकारच जबाबदार आहे. केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात ओबीसींची आकडेवारी दिली असती तर ही वेळच आली नसती पण भाजपाने ते जाणीवपूर्वक होऊ दिले नाही. आता मात्र भाजप नेते ओबीसींचा कळवळा असल्याचे दाखवत आहेत. सत्ता दिल्यास चार महिन्यात आरक्षण आणतो अन्यथा राजकीय संन्यास घेईन असे देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत. परंतु त्यांची नौटंकी महाराष्ट्राला समजली असून जनताच आता फडणवीसांना संन्यास देईल, असा घणाघात महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. आज टिळक भवन येथे नाना पटोले यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

देवेंद्र फडणवीस खोटे बोलण्याची मशीन आहे. खोटं बोल पण रेटून बोल हा त्यांचा स्थायीभाव आहे. २०१४ च्या निवडणुकीआधीही त्यांनी धनगर समजाला आरक्षणाचे आश्वासन दिले पण पाच वर्षात त्यांना आरक्षण दिले नाही, धनगर समजाची त्यांनी घोर फसवणूक केली. मराठा समाजाचीही दिशाभूल केली आणि त्यांचे आरक्षण रद्द झाले आणि आता ओबीसी आरक्षणाच्या बाबतीतही तेच झाले आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आरक्षण संपुष्टात आणण्याची ही खेळी आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी वारंवार आरक्षणाचा मुद्दा चर्चेत ठेवून आरक्षणविरोधी वातावरण निर्मिती केली. आरएसएसची विचारसणीच आरक्षणविरोधी आहे. त्यांना देशातील आरक्षण संपुष्टात आणायचे आहे.

- Advertisement -

ओबीसींच्या आरक्षणासाठी आवश्यक असणारी आकडेवारी ही केंद्राकडे आहे परंतु भाजप नेते त्यासाठी राज्य सरकारकडे बोट करत आहेत. माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याच विभागाने २०१७ साली अध्यादेश काढला होता त्यामुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आले. त्यांचे मंत्रालय नागपूरच्या रेशिमबागेतील आदेशावरून दुसरेच लोक चालवत होते. पंकजा मुंडे, बावनकुळे हे फक्त चेहरे आहेत, निर्णय घेणारे लोक वेगळेच होते त्यामुळे पंकजा मुंडे, बावनकुळे आता काय बोलतात त्याला काही अर्थ नाही.

ओबीसी समाजाने भारतीय जनता पक्षाला साथ दिली पण त्याच समाजाचा घात भारतीय जनता पक्षाने केला आहे. भाजपाच्या एका चुकीमुळे महाराष्ट्रातील ग्रामपंचायत, पंचायत समित्या, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकेतील तब्बल ५५ हजार ओबीसी लोकप्रतिनिधींवर कुऱ्हाड कोसळली आहे. याप्रश्नी राज्य सरकार सुप्रीम कोर्टात दाद मागणार असून राज्य निवडणूक आयोगाने घोषीत केलेल्या पाच जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलाव्यात, असे पटोले म्हणाले.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -