घरमहाराष्ट्रपुणे : एक हजार कुटुंबियांना सुरक्षित स्थळी हलवले

पुणे : एक हजार कुटुंबियांना सुरक्षित स्थळी हलवले

Subscribe

मुठा नदीचे पाणी किनार्‍यावर असलेल्या गृह सोसायट्या, झोपडपट्टी, वस्ती भागात शिरल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

संततधार पावसामुळे खडकवासला, पानशेत पाठोपाठ वरसगाव धरण ही शंभर टक्के भरली आहे. या तीनही धरणातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग केला जात आहे. रविवारी दुपारनंतर मुठा नदीतील पाण्याचा विसर्ग हा प्रति सेकंद ४० हजार क्युसेक इतका केला गेला आहे. यामुळे मुठा नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. दुथडी भरून वाहणाऱ्या मुठा नदीचे पाणी किनार्‍यावर असलेल्या गृह सोसायट्या, झोपडपट्टी, वस्ती भागात शिरले. शहरातील आंबील ओढा नागझरी आणि माणिक नाला हे मुठा नदीला येऊन मिळतात. त्या ठिकाणी पाण्याचा फुगवटा निर्माण झाल्याने या नाल्यांचे पाणीदेखील कडेला असलेल्या झोपडपट्टी, वस्तींमध्ये जाऊ लागले आहे. सिंहगड रस्ता, नांदेड, रजपूत वस्ती, डेक्कन , पाटील इस्टेट ,मंगळवार पेठ, येरवडा येथील शांतीनगर, भारत नगर, इंदिरानगर याभागातील नागरिकांना जवळील महापालिका शाळांमध्ये हलविण्यात आले आहे. सुमारे एक हजार कुटुंबाना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून स्थानिक नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते त्यांना मदत करित आहेत. पाण्याची पातळी वाढल्यामुळे मुठा नदीवर असलेला नांदेड ते शिवणे हा पूल, भिडे पूल आणि गाडगीळ पुल हे वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.

५ ऑगस्टला सुट्टी घोषित

मुठा नदी प्रमाणेच मुळा नदीवरील मुळशी धरण आणी पवना नदीवरील पवना धरण हे देखील शंभर टक्के भरल्याने या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे मुळा नदी किनारी असलेल्या सांगवी, बोपोडी ,पाटील इस्टेट आदी भागात नदीचे पाणी शिरले आहे. या ठिकाणीदेखील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले जात आहे. मुळा मुठा संगम येथून पुढे पाण्याची पातळी आणखी वाढली असून बंडगार्डन येथून नदीचा निसर्ग हा जवळजवळ एक लाख क्युसेक पर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे शहराच्या पुढे असलेल्या नदीकिनारी भागातील गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे .मांजरी या गावातील काही भागात पाणी शिरले आहे. तेथील चार कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. हवामान विभागाने पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुणे जिल्ह्यातील शाळांना सोमवार दिनांक ५ ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -