घरताज्या घडामोडीमुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान पंतप्रधानांकडून एकनाथ शिंदेंचे कौतुक; अर्थ काय?

मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान पंतप्रधानांकडून एकनाथ शिंदेंचे कौतुक; अर्थ काय?

Subscribe

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी सहकुटुंब दिल्ली दौरा करीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटातील विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी योग्य टाइमिंग साधत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना ट्विटरवर अजितदादा लवकरच मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा त्यांनी केला. मिटकरींच्या या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवारांचे बॅनर्सही झळकले आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदेंनी भेट घेतल्यानंतर पीएम मोदींनी ट्वीट करत शिंदेंचं तोंडभरून कौतुक केलं आहे. त्यामुळे त्यांच्या या ट्वीटचा नेमका अर्थ काय? हे पाहणं महत्वाचं आहे.

नरेंद्र मोदींचं ट्वीट काय?

महाराष्ट्राचे गतिशील आणि कष्टाळू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांना आणि त्यांच्या कुटुंबाला भेटून आनंद झाला. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठीची त्यांची तळमळ आणि विनम्र स्वभाव कौतुकास्पद आहे, अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी एकनाथ शिंदेंचं कौतुक केलं.

- Advertisement -

एकनाथ शिदेंचं ट्वीट काय?

देशाचे पंतप्रधान म्हणून कणखर आणि सक्षम असलेल्या नरेंद्र मोदीजी यांनी माझे वडील, पत्नी, मुलगा खासदार श्रीकांत शिंदे, सून आणि नातू यांच्यासह मला सदिच्छा भेटीला बोलावून आपलेपणाने विचारपूस केली. माझ्या कुटुंबाशी निवांत गप्पा मारल्या. त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून आमच्यासाठी वेळ काढला. गेले वर्षभर केंद्र सरकारचे भक्कम पाठबळ राज्य सरकारला मिळत आहे. ते सहकार्य यापुढेही कायम मिळो, ही मागणी मान्य करत पंतप्रधानांनी आश्वस्तही केले. पंतप्रधानांची आपुलकी, आशीर्वादाचा हात आणि आस्था नवे बळ देणारी आहे, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी मोदींच्या भेटीनंतर म्हटलं होतं.

- Advertisement -

रायगड जिल्ह्याच्या खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडीवर बुधवारी रात्री दरड कोसळून दुर्घटना घडली होती. या ठिकाणी सुरू असलेले बचावकार्य आणि पुनर्वसनाबाबतची माहिती पंतप्रधान शिंदे यांच्याकडून जाणून घेतली. या संकटात केंद्र सरकार पाठीशी असल्याचे ते म्हणाले. याशिवाय, राज्याशी संबंधित विविध विषयांवर पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा झाली. राज्यात सुरू असलेल्या विकास प्रकल्पांना केंद्र सरकारचे पाठबळ असल्याचे आश्वासन यावेळी पंतप्रधानांनी दिले असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

धारावी प्रकल्प आशिया खंडातील सर्वात मोठा प्रकल्प असून यामुळे मुंबईचा चेहरामोहरा बदलणार आहे. या प्रकल्पामुळे येथील लोकांचे जीवनमान उंचावणार आहे. त्यासाठी हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावा, अशी अपेक्षा मोदी यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे व्यक्त केली. त्याचबरोबर मुंबईतील पुनर्विकासांच्या रखडलेल्या प्रकल्पांना चालना देण्याची चर्चा यावेळी झाली. प्रत्येक कुटुबांला हक्काचे घर मिळावे, असे केंद्र शासनाचे धोरण असून राज्य त्या दिशेनेही काम करीत असल्याचे समाधान पंतप्रधानांनी व्यक्त केले असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीदेखील सहकुटुंब भेट घेतली. यावेळी अमित शहा यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याची प्रतिकृती भेट देण्यात आली.


हेही वाचा : दिल्लीवारीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गाठीभेटी, पंतप्रधान मोदी आणि अमित शहांशी चर्चा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -