‘मुख्यमंत्र्यांकडे दिलगिरी व्यक्त केली, पण राऊतांसारख्या सोंगाड्यावर मला बोलायचं नाही’ – प्रसाद लाड

Shivsena MP Sanjay Raut and BJP MLA Prasad Lad
'मुख्यमंत्र्यांकडे दिलगिरी व्यक्त केली, पण राऊतांसारख्या सोंगाड्यावर मला बोलायचं नाही' - प्रसाद लाड

भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी वेळ आली शिवसेना भवन फोडू असं वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी प्रसाद लाड यांच्यावर जोरदार निशाणा साधला. दरम्यान, आता प्रसाद लाड यांनी संजय राऊत यांच्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्र्यांकडे दिलगिरी व्यक्त केली पण संजय राऊत सारख्या सोंगाड्यावर बोलणं उचित वाटत नाही, असं म्हटलं आहे. ते रविवारी माध्यमांशी बोलत होते.

कालच्या वक्तव्यानंतर मी माझा एक व्हिडिओ सर्व प्रसारमाध्यमांना दिला होता. माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आलं आहे. कैलासवासी शिवसेना प्रमुखांवर प्रेम करतो, आमचं दैवत समजतो, त्या शिवसेना प्रमुखांबद्दल आणि त्यांच्या वास्तूबद्दल बोलल्याबद्दल मी माझी दिलगिरी व्यक्त केली होती. माझ्यासाठी तो विषय संपलेला आहे, असं प्रसाद लाड म्हणाले. मात्र, पुढे त्यांना अरेला कारे करायची आमची तयारी आहे, असा इशारा देखील दिला आहे.

राऊतांसारख्या सोंगाड्यावर मला बोलायचं नाही

माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. मी दिलगिरी व्यक्त केली आहे. माझा दिलगिरी व्यक्त केलेला व्हिडिओ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवला आहे. राहिली गोष्ट संजय राऊत यांची…तर राऊतांसारख्या सोंगाड्यावर मला बोलायचं नाही, असं प्रसाद लाड म्हणाले.

आमच्यासाठी ‘तो’ विषय संपला – फडणवीस

तोडफोड करणं भारतीय जनता पक्षाची संस्कृती नाही. प्रसाद लाड यांनी आपला व्हिडीओद्वारे स्पष्टीकरण दिलं आहे. आमच्य़ासाठी हा विषय संपलेला आहे. आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही; पण अंगावर आलं तर कोणाला सोडत नाही, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.


हेही वाचा – तोडफोडीची आमची संस्कृती नाही, ‘तो’ विषय संपला, पण अंगावर आल्यानंतर सोडत नाही – फडणवीस