पुण्यासह कोल्हापूर शहरात पावसाची हजेरी; राज्यातील ‘या’ भागांना हवामान विभागाकडून अलर्ट जारी

Five dead after a wall collapsed due to heavy rains in Sahakar Nagar, Pune. More details awaited
पुण्यात पावसाचा कहर; भिंत कोसळून ५ जणांचा मृत्यू

पुणे : पुणे, कोल्हापूरसह राज्यातील इतर शहरात आज (१५ मार्च) संध्याकाळी ढगांच्या गडगडाटासह जोरदार सरी कोसळ्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. सकाळपासूनच आकाशात ढगांची मळभ दाटल्यामुळे अवकाळी पावसाच्या शक्यता होती. त्यानुसार पुण्यातील मुख्य पेठांसह, कोल्हापूर, सातारा, नंदुरबारसह अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली.

पुणे शहरातील मुख्य पेठांच्या परिसरासह पाषाण, सूस रस्ता, सहकारनगर, बिबवेवाडी, वारजे, कोंढवा, कोथरूड आदी भागांत पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. रात्री आठ वाजल्यानंतर सर्वच भागांत पावसाने हजेरी लावल्यामुळे पुणेकरांना ऐन ऊन्हाळ्यात पावसाळ्याची अनुभूती मिळाली.

कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी याठिकाणी पडलेल्या मुसळधार पावसामुळे येथील मार्केटमध्ये पाणी जमा झाले होते. यामुळे मार्केटमधील व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. साताऱ्यातील वाई खंडाळा तालुक्यासह महाबळेश्वरच्या काही भागात पावसाने हजेरी लावली. महाबळेश्वर, खंडाळा, लोणद भागासह सातारा शहरातही पाऊस झाल्यामुळे संपूर्ण साताऱ्यातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता.

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर, नंदुरबार, तळोदा, धडगाव तालुक्यात वादळी वाऱ्यांसह पाऊस झाला. पावसामुळे गहू, हरभरा, रब्बी ज्वारी, केळी आणि पपईसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामाच्या पिकांचे पूर्ण नुकसान होण्याची शक्यता आहे. सरकारी कर्मचारी संपावर गेल्यामुळे आधीच्या पावसात झालेल्या नुकसानीचे पंचनामे बाकी असताना पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

पावसाला पोषक हवामान असल्याने उद्या (१६ मार्च) राज्यात विजांच्या गडगडाटासह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपिटीसह वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

विदर्भात वादळी वाऱ्यांसह ऑरेंज अलर्ट 
हवामान विभागाने नागपूर विभागात चार दिवस गारांसह अतिवृष्टीचा इशारा दिला असून नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीतही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागपूर, चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयांत उद्या (16 मार्च) व शुक्रवारी (17 मार्च) अतिसतर्कतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. त्यासोबतच 16 ते 19 मार्चपर्यंत संपूर्ण विदर्भात वादळी वारे तसेच गारांसह पावसाचा इशारा (यलो अलर्ट) देण्यात आला आहे. भंडारा व गोंदिया जिल्हयात शुक्रवारी (17 मार्च) अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

कोणत्या राज्यात पावसाचे अलर्ट
जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नगर, पुणे या राज्यात गारपिरीटसह पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट), तर बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या भागात वादळी पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आणि पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदूरबार, धुळे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, लातूर, वर्धा, भंडारा, गोंदिया या राज्यात वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.