घरमहाराष्ट्रपुणे तेथे काय उणे, लाचखोरीतही पहिले

पुणे तेथे काय उणे, लाचखोरीतही पहिले

Subscribe

राज्यातला भ्रष्टाचार रोखण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग शर्थीचे प्रयत्न करत असून मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे. पण महाराष्ट्रात गेल्या वर्षभरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या सापळा कारवाईत पुणे आघाडीवर असल्याचे समोर आले आहे.

राज्यातला भ्रष्टाचार रोखण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग शर्थीचे प्रयत्न करत असून मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे. पण महाराष्ट्रात गेल्या वर्षभरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या सापळा कारवाईत पुणे आघाडीवर असल्याचे समोर आले आहे. पुण्यामध्ये सर्वाधिक कारवाया करण्यात आल्या असून लाचखोरीत मुंबईचा सर्वात शेवटचा क्रमांक आहे. पुण्यामध्ये गेल्या वर्षभरात एकूण २०० सापळे लावण्यात आले ज्यामध्ये लाच घेणार्‍या अधिकार्‍यांना रंगेहाथ पकडण्यात एसीबीला यश आले.
महाराष्ट्रभरात एसीबीने केलेल्या कारवाईत पुणे वरचढ असून मुंबईचा क्रमांक सर्वात शेवटी लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. एसीबीच्या पथकाने महाराष्ट्रात ठिकठिकाणी केलेल्या कारवायांचा आढावा घेतल्यास भ्रष्टाचारांच्या प्रकरणांमध्ये महसूल विभागाचा प्रथम क्रमांक असून दुसर्‍या स्थानावर पोलीस दल आहे. राज्यभराच्या आकडेवारीनुसार लाचखोरीत पुणे आघाडीवर असून त्या खालोखाल नागपूर, औरंगाबाद, नाशिक, ठाणे, अमरावती, नांदेड आणि सर्वात शेवटी मुंबईचा नंबर लागतो. मुंबईमध्ये गतवर्षी फक्त ३९ सापळे लावण्यात आले. भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करुनसुद्धा समाजात सुरू असलेला भ्रष्टाचार संपण्याऐवजी त्याचे प्रमाण वाढत असल्याची टक्केवारी समोर येत आहे. महसूल आणि पोलीस विभाग लाचखोरीत अव्वल असण्याचे कारण म्हणजे जनतेचे वारंवार या दोन विभागांकडे काम असते. त्याचा फायदा घेऊन या विभागातले अनेक अधिकारी लाचेची मागणी करतात. त्यामुळे लाचखोरीत या दोन्ही विभागांचा नंबर सर्वात प्रथम येत असल्याचे एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.
सर्वात मोठा सापळा पुण्यातच
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आतापर्यंत केेलेल्या अनेक वर्षांच्या रेकॉर्डनुसार सर्वात मोठा सापळा पुण्यात लावण्यात आला. ज्यामध्ये एका वकिलाला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. सुमारे ४० दिवस सलग हा सापळा लावण्याचे प्लॅनिंग एसीबीकडून करण्यात आले होते. अखेर आरोपी रोहीत दत्तात्रय शेंडे या वकिलाला भूमी अभिलेख विभागाच्या उपसंचालकाच्या वतीने १ कोटी ७० लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली. एसीबीच्या इतिहासात केलेली पुण्यातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. पुणे एसीबीने केेलेल्या या कारवाईनंतर काहीच दिवसात दुसरी कारवाई करण्यात आली होती,ज्यामध्ये जमिनीचे प्रकरण निकाली काढण्यासाठी सचिन डोंगरे या तहसिलदाराला १ कोटी रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते.

सर्वाधिक भ्रष्ट महसूल विभाग

लाचलुचपत विभागाने महसूल विभागातल्या भ्रष्टाचारी अधिकार्‍यांच्या मुसक्या आवळल्याने या विभागाचा लाचखोरीत प्रथम क्रमांक लागतो. मात्र सापळ्यांमध्ये पकडण्यात आलेली रक्कमसुद्धा मोठी आहे. २०१८ ला महसूल विभागातल्या अधिकार्‍यांसाठी लावण्यात आलेल्या सापळ्यांमध्ये ३ कोटी ६ लाख १४,१०० रुपये इतकी रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. तर दुसर्‍या क्रमांकावर असणार्‍या पोलीस दलातील सापळ्यांमध्ये २४ लाख ६६९०० रुपये इतकी रक्कम जप्त करण्यात आली.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -