घररायगडPoladpur Heat News : उन्हामुळे पोलादपूरकरांच्या अंगाची काहिली

Poladpur Heat News : उन्हामुळे पोलादपूरकरांच्या अंगाची काहिली

Subscribe

मोठ्या प्रमाणात वृक्षतोड, वणवे यामुळे उन्हाचा कडाका आणखी वाढला आहे. त्यामुळे दिवसा संचारबंदी लागल्यासारखी स्थिती असते.

पोलादपूर : वाढत्या उन्हामुळे शहरासह तालुक्यातील जनतेची अक्षरशः होरपळ सुरू होत आहे. या उन्हाळारूपी आगीत चोहोबाजूला लागणारे वणवे आणि त्यामुळे तयार होणारा राखाडीमिश्रित धूर, बेसुमार वृक्षतोड, शेजारून जाणार्‍या मुंबई-गोवा महामार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण उन्हाच्या वणव्यात तेल ओतण्याचे काम करत आहेत. त्यामुळे सकाळी 10 नंतर रस्त्यावर संचारबंदी लागल्यासारखी स्थिती असते.

रखरखीत उन्हाळा पोलादपूरकरांना नवीन नसला तरी गेल्या दोन-तीन वर्षांपासून उन्हाळ्यात तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे सरकत आहे. परिणामी उन्हाळ्याचा हा नवा अनुभव घ्यावा लागत असल्याच्या प्रतिक्रिया जनतेतून उमटत आहे. एरव्ही उन्हाळ्यात घरासमोर मांडवात किंवा डेरेदार वृक्षाच्या सावलीखाली दुपारची वेळ घालवणे किंवा वामकुक्षी घेण्याचे दिवस इतिहासजमा झाले आहेत. भर दुपारच्या रणरणत्या अंगाला चटके देणार्‍या उन्हाच्या, अंगाची लाहीलाही करणार्‍या उकाड्याच्या त्रासापासून संरक्षण होण्यासाठी गाव, वाड्यांमधील ग्रामस्थ चक्क दारे, खिडक्या बंद करून घेत आहेत. दरवर्षी मे महिन्यात उष्णतेची लाट येत असते. मात्र यावेळी उष्म्याचे संकट मार्चअखेरपासूनच सुरू झाले आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Raigad Teachers News : देशाचं भविष्य घडवणाऱ्या गुरुजींची अल्प वेतनावर गुजराण

सकाळी साडेनऊपासूनच वातावरण तापायला सुरुवात होते. सूर्य डोक्यावर आल्यानंतर उष्णतेचे संकट जीव कासावीस करते. वृद्धांसाठी हा उन्हाळा असह्य ठरत आहे. शेतीसाठी शेतकरी भाजावळ करत आहेत. मात्र आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे भाजावळीकरिता फांद्या तोडण्यास झाडांवर चढणारे शेतकरी सकाळी दहाच्या आत झाडांवरून उतरून घर गाठत आहेत. त्यामुळे शेतकर्‍याला भाजावळ आणि पावसाळी सरपणासाठी फाटी गोळा करण्यात अडथळा निर्माण होत आहे. अशा स्थितीत रानात चिटपाखरूसुद्धा नजरेआड झाल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे ग्रामीण भागात अघोषित आणीबाणीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Raigad Crime News : हातभट्ट्यांवर रायगड पोलिसांची वक्रदृष्टी

यापूर्वी तालुक्यातून जाणार्‍या मुंबई-गोवा महामार्गावर पिंपळ, वड, जांभळ, नांदरूक, आंबा, गुलमोहर अशा डेरेदार सावली देणार्‍या वृक्षांची दुर्तफा रांग होती. मात्र महामार्गाच्या चौपदरीकरणात वृक्षतोड मोठ्या प्रमाणावर करण्यात आल्याने दुपारच्या वेळी या महामार्गावर वार्‍यासह गारवा देणारी सावली हरपली आहे. परिणामी दुपारच्या सुमरास शेकडो वाहनांची वर्दळ असणारा मुंबई-गोवा महामार्ग सुनासुना वाटत आहे. पोलादपूर हे तालुक्याचे मुख्यालय असल्याने सरकारी कार्यालये, बँका आहेत. मात्र उष्णतेच्या लाटेची दहशत इतकी की, सकाळी कामानिमित्त आल्यानंतर उशिरापर्यंत रेंगाळणारा खेडूत दुपारीच येथून काढता पाय घेत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -