घरमहाराष्ट्रRaigad News : महामार्गांनी दिला रायगडमधील शेतकऱ्यांना रोजगार

Raigad News : महामार्गांनी दिला रायगडमधील शेतकऱ्यांना रोजगार

Subscribe

मुंबई-गोवा आणि मुंबई-पुणे महामार्गांलगत ताज्या भाज्यांबरोबर फळांच्या विक्रीची दुकाने सुरू करून शेतकऱ्यांनी त्यांच्यासाठी नियमित उत्पन्नाची सोय केली आहे.

अलिबाग : रायगड जिल्ह्याची औद्योगिक जिल्हा अशी ओळख असली तरी पर्यटन जिल्हा हा ओळख आजही कायम आहे. मुंबई आणि पुणे या आर्थिक उलाढाल करणाऱ्या प्रमुख शहरांना रायगड जिल्ह्याने जोडले आहे. आर्थिक केंद्रबिंदू बनू पाहणाऱ्या रायगड जिल्ह्यात जनतेला अपेक्षित असणारे मॉल उभे राहिले नसले तरी भाज्या आणि फळे खरेदी-विक्रीसाठी सहज जागा उपलब्ध झाली आहे. रायगड जिल्ह्यातील भाजीपाल्याला जिल्ह्यातून जाणारे महामार्ग बाजारपेठ बनले आहेत. मुंबई-गोवा महामार्ग आणि मुंबई-पुणे महामार्ग फ्रूट-व्हेजिटेबल मॉल बनत आहेत, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.

रायगड जिल्हा पर्यटन जिल्हा असल्याने देश-विदेशातील पर्यटक जिल्ह्यातील समुद्रकिनारे आणि गडकिल्ल्यांना भेटी देतात. येणारे पर्यटक त्यांच्या वाहनांनी येण्यास प्राधान्य देतात. त्याचबरोबर तळकोकणात जाणारे नोकरदार आणि पुणे, सातारा तसेच कोल्हापूरच्या दिशेने जाणारे प्रवासीदेखील जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गांचा वापर करतात. त्यावेळी त्यांची पसंती महामार्गांलगत असणारे ताज्या भाज्यांचे आणि फळांचे स्टॉल यांना असते. मुंबई-गोवा महामार्ग आणि मुंबई-पुणे महामार्गावर लगतच्या जागेत वाहने पार्क करून भाजी आणि फळे खरेदीसाठी झुंबड उडते.

- Advertisement -

हेही वाचा… Raigad Forest News : रायगडमधील वनक्षेत्र अधिक हरित, वन्यप्राण्यांमध्ये 15 टक्के वाढ

पेण, माणगाव, पोलादपूर, पनवेल, खालापूर या तालुक्यांमध्ये पालेभाज्यांच्या पिकाला स्थानिक बाजारपेठेव्यतिरिक्त अधिकचे दाम मिळवून देणारी बाजारपेठ उपलब्ध होत नव्हती. यावर प्रथम पेण, पोलादपूर आणि माणगाव येथील शेतकऱ्यांनी मुंबई-गोवा महामार्गालगत टोपल्यांमधून भाजी विक्री करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर पनवेल, खालापूर तालुक्यांत स्थानिकांनी महामार्गालत अशीच भाजीविक्री करण्यास सुरुवात केली. आता स्थानिकांच्या या पालेभाजी विक्रीला पर्यटक, प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Poladpur Heat News : उन्हामुळे पोलादपूरकरांच्या अंगाची काहिली

रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गावर पेण तालुक्यातील हमरापूर, जिते, वडखळ, माणगाव शहरातील बाजारपेठ, पोलादपूर शहरातील बाजारपेठ तसेच खालापूर तालुक्यातील खालापूर नाका, चौक, रसायनी फाटा येथे पालेभाजी विक्रीचे झाडांच्या पानाचे स्टॉल उभाण्यात आले आहेत. स्थानिक शेतकऱ्यांनी पिकवलेल्या ताज्या भाज्या खरेदी करण्यासाठी या स्टॉलसमोर अलिशान गाड्या उभ्या राहतात. शेतकऱ्यांनी थेट शेतातून भाजी आणल्याने त्यांना चांगला भाव मिळतो तर ताजी भाजी असल्यामुळे ग्राहकांचीही खरेदीसाठी झुंबड उडते.

नियमित उत्पन्नाची सोय

महामार्गामुळे आम्हाला चांगला रोजगार मिळाला आहे. गावापासून दूर असला तरी महामार्गाच्या बाजूला भाजी आणि फळे विकण्याची संधी मिळत असल्याने रोज चांगले उत्पन्न मिळते. स्थानिक शेतकऱ्यांची भाजी असल्यामुळे वाहतुकीचा आणि दलालीची खर्च वाचतो. – रसिका पाटील, भाजीविक्रेत्या, हमरापूर

रोजगारांची उत्तम संधी

भाजी स्थानिक शेतकऱ्यांकडन मिळते. मात्र, ताज्या फळांसाठी पनवेल, नवी मुंबईला जावे लागते. दिवसभरात भाजी, फळांची चांगली विक्री होते. ताजी भाजी आणि फळे मिळत असल्याने ग्राहक खरेदीसाठी आवर्जून थांबतात. रोजच चांगला नफा मिळत नाही. तरीही महामार्गामुळे संधी मिळाली आहे. – नवीन पाटील, फळे-भाजी विक्रेते, हमरापूर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -