घरमहाराष्ट्रRaigad Water Crisis : म्हसळ्याच्या १०० कोटींच्या योजना 'पाण्यात'च

Raigad Water Crisis : म्हसळ्याच्या १०० कोटींच्या योजना ‘पाण्यात’च

Subscribe

टँकरमुक्ती होऊनही म्हसळे शहर पाणीटंचाईचा सामना करत आहे. आजही शहरातील महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

अरुण जंगम : आपलं महानगर वृत्तसेवा

म्हसळा : रायगड जिल्ह्यात पाणीटंचाईने भीषण रुप धारण केले आहे. यात म्हसळा तालुकाही पिछाडीवर नाही. म्हसळा तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतीपेक्षा शहरात पाणीटंचाईची समस्या जास्त गंभीर आहे. विशेष म्हणजे संपूर्ण म्हसळा तालुका १२ वर्षांपूर्वी टँकरमुक्त झाल्याचा दावा केला जातो. प्रत्यक्षात ३० वर्षांत विविध योजनांसाठी १०० कोटींहून अधिक निधी खर्चुनही या उन्हाळ्यात म्हसळाकराच्या तोंडचे पाणी पळाले आहे. यालाच टँकरमुक्ती म्हणावी का, असा प्रश्न म्हसळ्यात विचारला जात आहे.

म्हसळा शहरात तीन दशकांत जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा योजना, राष्ट्रीय पेयजल योजना, जलजीवन मिशन अशा १०० कोटी रुपयांच्या योजना राबवल्या गेल्या. आता नव्याने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत म्हसळा शहरासाठी ४३ कोटींच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. तरीही शहरात पाण्याची बोंबाबोंब सुरूच आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Raigad Water Crisis : पूर आणि पाणीटंचाईचा महाडचा शाप कधी पुसणार?

यापूर्वी झालेल्या विविध योजनेत प्रचंड भ्रष्टाचार झाला, अनेक कामे निकृष्ट दर्जाची झाली, कामे न करताच ठेकेदाराला बिले दिली, असे अनेक आरोप झाले. त्यामध्ये काही भागांत जलवाहिनीची कामे, फिल्टरेशन प्लँट दुरुस्त करणे ही कामे न करताच ठेकेदाराला बिले दिल्याचे आरोप झाले आहेत. त्यामुळे म्हसळाकरांचे हक्काचे पाणी भ्रष्टाचारात मुरत असल्याचा आरोप केला जात आहे.

- Advertisement -

पाभरे येथून सुरु असलेल्या योजनेतील ३० हॉर्सपॉवरचे दोन्ही पंप बिघडल्याने म्हसळाकरांना केवळ एकवेळ अपुरे तसेच गढूळ पाणी मिळत आहे. शहराच्या अनेक भागांत कृत्रिम पाणीटंचाई होत असल्याने पाण्यासाठी महिला कधीही रस्त्यावर येऊ शकतात, इतकी परिस्थिती बिकट झाली आहे.

हेही वाचा… Raigad Water Crisis : तहानलेल्या पेण तालुक्याला ५ दिवसांआड पाणी

दरम्यान, म्हसळा नगरपंचायतीने शहरातील काही भागात विंधण विहिरी खोदून रहिवाशांना पंपाने पाणीपुरवठा सुरू केला आहे. यात म्हसळा दिघीरोड, नवानगर परिसरातील ८ ठिकाणे, साने-दातार आळी आणि हरिजन वस्ती यांचा समावेश आहे. त्यामुळे त्या भागातील रहिवाशांना किंचित दिलासा मिळाला आहे. भविष्यात ब्राह्मण आळी, तांबट आळी, सोनार आळी. कन्या शाळा परिसर, उमरोटकर-बोरकर वस्ती, मातोश्री पार्क या परिसरात किमान ७-८ विंधण विहिरी खोदून परिसरांत पर्यायी सोय करण्याची मागणी होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -