घरमहाराष्ट्रRaigad Water Crisis : पूर आणि पाणीटंचाईचा महाडचा शाप कधी पुसणार?

Raigad Water Crisis : पूर आणि पाणीटंचाईचा महाडचा शाप कधी पुसणार?

Subscribe

महाडकरांच्या वाट्याला कायमचा पूर आणि पाणीटंचाई पूजलेली आहे. ४० वर्षांपासून टँकरमुक्त महाडची घोषणा कागदावरच राहिल्याने तहानलेले महाडकर आता संतप्त झाले आहेत. रायगड जिल्हा प्रशासन यावर कायमस्वरुपी उपाय करणार का, असा प्रश्न महाडकर विचारत आहेत.

निलेश पवार : आपलं महानगर वृत्तसेवा

महाड : दरवर्षी महाड तालुक्यात पूर येतो, लोकांच्या डोळ्यातून आसवे टपकतात. त्यानंतर पुन्हा दरवर्षी पाणीटंचाई निर्माण होते आणि डोळ्यातील अश्रू पिण्याची वेळ महाडकर आणि तालुक्यातील जनतेवर येते. हे चक्र कधी थांबणार आहे का, असा प्रश्न आता विचारला जातोय. कारण दरवर्षी पाणीपुरवठा योजनांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च होत असेल, तर पाणीटंचाईची स्थिती का निर्माण होते? हा मुख्य सवाल आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन जोपर्यंत या प्रश्नाच्या मुळाशी जाणार नाही, पूर निवारण्यासाठी आणि पाणीसाठ्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करणार नाही, तोपर्यंत उन्हाळा-पावसाळ्यातही महाडकरांचे हाल सुरूच राहणार हे वास्तव आहे.

रायगडसह महाड तालुक्यात दरवर्षी ३ हजार मिलीमीटर पाऊस पडतो, पिण्याच्या पाण्यावर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. तरीही महाड तालुक्यातील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत असेल, तर हे अपयश कुणाचे, याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ रायगड जिल्हा परिषदेवर आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Raigad Water Crisis : दे माय… पाणी दे, पाणी दे!

आजही महाड तालुक्यातील वाडी-वस्त्या तहानलेल्या आहेत. तालुक्यात जवळपास ६८ वाड्या आणि १३ गावे तहानलेली आहेत. यामध्ये पिंपळकोंड, टोळ, सापे, आढी, डोंगरोली, पाचाड गाव, पिंपळदरी, माझेरी, वीर, नातोंडी मुळगाव, ताम्हाणे, वाकी या गावांचा समावेश आहे.

- Advertisement -

या वाडी-वस्त्यांनी महाड पंचायत समितीमध्ये टँकरने पाणीपुरवठ्याची मागणी केली आहे. डोक्यावर उन्हाचे चटके आणि दुसरीकडे घशाला पडलेली कोरड असताना देखील या गावातील महिला डोक्यावर हंडे घेत पाण्यासाठी तळ गाठलेल्या विहितून पाणी काढण्यासाठी रांगा लावत आहेत. नेमेची येतो पावसाळा याप्रमाणे महाड तालुक्यात भरभरून पाउस पडतो. अगदी महापूर येतो. नद्या-नाले तुडुंब भरून वाहतात. त्यानंतर उन्हाळा येतो आणि तीव्र पाणीटंचाई निर्माण होते.

हेही वाचा… Raigad News : आमदार गोगावलेंविरोधात थेट राष्ट्रपतींना पत्र

महाड तालुक्यातील बहुतांश भाग हा दुर्गम आणि खेडोपाड्यात वसलेला आहे. यामुळे भौगोलिक कारणामुळे तीव्र उतारातून पावसाचे पाणी नदीतून वाहून समुद्राला मिळते. पाण्याचे स्त्रोत लवकर आटत आहेत. ४० वर्षे झाली तरी महाड तालुका टँकरमुक्त होत नाही, पाणीटंचाईमुक्त होत नाही, ही खूप गांर्भीयाने विचार करण्याची बाब आहे. शासनाने अनेक योजना राबवल्या तरीही वाडी-वस्त्यांना पाण्याची टंचाई भासते म्हणजेच योजनेचे पाणी मध्येच कुठेतरी मुरते. यंदा पाचाड, आढी, डोंगरोली या गावांना दरवर्षी तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

पाचाडमधील लोकांना तर पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त इतर पाणी विकत घ्यावे लागते. टँकरने केलेली मागणी शासकीय स्तरावर तत्काळ पूर्ण केली जात नाही. टँकरमुक्तीच्या नावाखाली ही मागणी प्रलंबित ठेवली जात असल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत. आदिवासी वाडीतील ग्रामस्थ नदीत डवरा खोदून पाणी मिळतात. तालुक्यातील पारमाची आदिवासी वाडी, कोतुर्डे आदिवासी वाडीत तर भयानक स्थिती आहे. कोथूर्डे धरणातून महाड शहरासह २२ गावांना पाणीपुरवठा होतो.
यामध्ये महाड, किल्ले रायगड मार्गावरील लाडवली, नाते, खर्डी, चापगाव, तळोशी, नांदगाव खुर्द, नांदगाव बुद्रुक, करंजखोल, कोकरे, आचळोली तसेच केंबुर्ली दासगाव, वहुर मोहोप्रे, गांधारपाले या गावांचा समावेश आहे. या गावांनाही पाणीपुरवठा अत्यंत कमी होत असल्याने पाणीटंचाईची तीव्रता जास्त आहे.

तालुक्यातील कोथुर्डे धरणातील पाण्याचा साठा संपुष्टात आल्यामुळे महाड शहरांवर पाणीटंचाईचे संकट आले आहे. शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झाला आहे. जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार धरणात १५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या शहरातील सुलतान गल्ली, सरेकर आळी, काजळपुरा, दस्तुरी नाका, चवदार तळे, गोमुखी आळी, भीम नगर, या भागांना या धरणातून पाणीपुरवठा केला जातो. या भागात पाणीपुरवठा करताना महाड नगरपालिकेने एकदिवस आड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार महाडमध्ये पहाटे साडेपाच वाजता पाणी सोडण्यात येईल, फक्त देशमुख मोहल्ला भागामध्ये दुपारी १२ वाजता पाणी सोडले जाणार आहे.

उर्वरित भागांमध्ये दुसरे दिवशी पहाटे साडेपाच वाजता काकरतळे, इंगवले रोड, रोहिदास नगर, प्रभात कॉलनी, जवाहर कॉलनी, तांबड भुवन इत्यादी भागांमध्ये पाणी सोडण्यात येणार आहे. महाड शहरातील काही भागांना कुर्ला धरणातून पाणीपुरवठा होतो. या धरणात सध्या समाधानकारक जलसाठा असला तरी मे महिन्याच्या अखेरपर्यंत साठा खालावतो. यामुळे कुर्ला धरणावर अवलंबून असलेल्या भागांना मे अखेरपर्यंत टंचाई जाणवते. त्यामुळे शहरातील काही भागांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो.

जलजीवन योजनेचा घोळ

संपूर्ण रायगड जिल्ह्यातील जलजीवन योजनांवर कोट्यवधींचा खर्च झाला आहे आणि होत आहे. महाड तालुक्यात दोनशेहून अधिक ठिकाणी जलजीवन योजना राबवली आहे. प्रत्येक गावातील मंजूर निधी देखील कोट्यवधीच्या घरातील आहे. मात्र या योजनेतील शेकडो चुका आणि तांत्रिक अडचणी यामुळे जलजीवन योजना पूर्ण होऊनही पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. अनेक गावांतील जुन्या योजनांची वीजबिलांची थकबाकी असल्याने महावितरणने या गावांना वीज जोडण्या दिलेल्या नाहीत. यामुळे पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. या गावांतून यापूर्वी अनेक योजना राबवल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -