घरफिचर्ससशस्त्र क्रांतीकारक - भगतसिंग

सशस्त्र क्रांतीकारक – भगतसिंग

Subscribe

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील थोर क्रांतिकारकांपैकी एक म्हणजे भगतसिंग. आज त्यांची जयंती. २७ सप्टेंबर १९०७ रोजी तत्कालीन पंजाब प्रांतातील ल्यालपूर जिल्ह्यातील बंग या गावी एका शेतकरी-देशभक्त कुटुंबात भगतसिंग यांचा जन्म झाला.

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील थोर क्रांतिकारकांपैकी एक म्हणजे भगतसिंग. आज त्यांची जयंती. २७ सप्टेंबर १९०७ रोजी तत्कालीन पंजाब प्रांतातील ल्यालपूर जिल्ह्यातील बंग या गावी एका शेतकरी-देशभक्त कुटुंबात भगतसिंग यांचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव विद्यावती आणि वडिलांचे नाव किशनसिंग होते. भगतसिंग यांच्या जन्माच्या वेळी काही दिवस आधीच त्यांचे वडील आणि दोन काकांची तुरुंगातून सुटका झाली होती. क्रांतिकारी वाड.मयाचा प्रसार केल्याबद्दल त्यांच्या वडिलांना दहा महिन्यांची शिक्षा झाली होती. बंग येथे प्राथमिक शिक्षण पार पडल्यानंतर १९२३ मध्ये भगतसिंग लाहोरच्या डी. ए. व्ही. आणि पुढे नॅशनल कॉलेजमधून बी.ए. झाले. वयाच्या १२ व्या वर्षी भगतसिंग यांनी जालियनवाला बाग हत्याकांड ज्या ठिकाणी घडले ती जागा पाहिली. विद्यार्थीदशेत असताना भगसिंग यांच्यावर जयचंद विद्यालंकार आणि भाई परमानंद या शिक्षकांचा प्रभाव पडला होता. विद्यार्थीदशेत असताना त्यांनी आजन्म अविवाहित राहून स्वतःला देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात झोकून देण्याची शपथ घेतली होती. त्यांनी विद्यार्थ्यांची संघटना स्थापण्यात पुढाकार घेतला होता. वयाच्या १४ व्या वर्षीच ते गुरुद्वारा नानकाना साहेब येथे अनेक लोकांना ठार मारणार्‍यांच्या विरुद्धच्या आंदोलनात सहभागी झाले होते. सुरुवातीच्या काळात त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता, पण काँग्रेसचे तत्कालीन धोरण न पटल्याने ते काँग्रेसमधून बाहेर पडले. इटलीच्या जोसेफ मॅझिनीच्या ‘यंग ईटली’ नावाच्या गटापासून प्रेरणा घेऊन १९२६ मध्ये त्यांनी ‘नवजवान भारत सभा’ स्थापित केली. यासाठी भगतसिंग यांना सुखदेव, चंद्रशेखर आझाद, बटुकेश्वर दत्त, भगवती चरण, जतींद्रनाथ दास यांचे सहकार्य लाभले. ‘नवजवान भारत सभा’ ही कट्टर देशभक्त युवकांची संघटना होती. १९२३ मध्ये त्यांनी हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संस्थेत प्रवेश केला. या संस्थेत रामप्रसाद बिसमील, शहीद अशफाखल्ला खान, चंद्रशेखर आझाद यांसारखे दिग्गज होते. चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संस्थेने पंजाबमधील सर्व कार्याचे नेतृत्व भगतसिंग यांच्यावर सोपवले. या संस्थेचे जाळे सर्वत्र पसरले होते. पुढे या संस्थेचे रूपांतर ‘नवजवान सैनिक संघ’ (हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी) या संस्थेत करण्यात आले. संस्थेच्या सर्व शाखांशी संपर्क ठेवून त्यांच्यात एकसूत्रता ठेवण्याचे काम भगतसिंगांवर सोपवण्यात आले होते. १९२८ मध्ये लाहोरला पोहोचलेल्या सायमन आयोगाविरोधात लाला लजपतराय यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने झाली. यावेळी ब्रिटिशांनी केलेल्या लाठीहल्ल्यात लालाजी जखमी झाले. पुढे या जखमी अवस्थेतच त्यांचे निधन झाले. लालाजींच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी लाठीहल्ल्यामागील मुख्य सूत्रधार पोलीस अधीक्षक स्कॉट याची हत्या करण्याचा निर्धार भगतसिंग, चंद्रशेखर आझाद आणि त्यांचा साथीदार शिवराम राजगुरु यांनी केला, पण ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळी ब्रिटिश पोलीस अधिकारी स्कॉटऐवजी जे. पी. सॉन्डर्स त्या ठिकाणी पोहोचला आणि स्कॉट ऐवजी तो मारला गेला. या हल्ल्यानंतर ‘सॉन्डर्स मरण पावला, लालाजींच्या खुनाचा बदला घेतला गेला’, अशी भगतसिंग यांच्या हस्ताक्षरातील पत्रकं लाहोरच्या रस्त्यांवर झळकली. भगसिंग तेथून फरार होऊन कोलकात्याला गेले, पण त्यांनी जतींद्रनाथ दास यांच्याकरवी आग्रा व लाहोर येथे बॉम्ब कारखाने सुरू केले. ट्रेड डिस्प्युट बिल व पब्लिक सेफ्टी बिल या अन्यायकारक विधेयकांविरोधात दिल्लीच्या केंद्रीय विधानसभेत ब्रिटिशांच्या हुकूमशाही वृत्तीचा निषेध करण्यासाठी बॉम्ब टाकण्याचे काम बटुकेश्वर दत्त आणि भगतसिंग यांच्यावर सोपवण्यात आले. ८ एप्रिल १९२९ रोजी ही विधेयके सभागृहात मांडण्यात आली. बिलाचा निर्णय देण्याच्या क्षणीच प्रेक्षक सज्जात बसलेले बटुकेश्वर दत्त आणि भगतसिंग यांनी सज्जातून सभागृहात बॉम्ब फेकले, हवेत गोळ्या झाडल्या तसेच निषेधपत्रकं फेकली. यावेळी दोघांनीही ‘इन्कलाब जिंदाबाद’ अशा घोषणा देत सरकारच्या स्वाधीन झाले. हा बॉम्बहल्ला आणि इतर आरोप लावून भगतसिंग यांच्यासह त्यांच्या साथीदारांना शिक्षा ठोठावण्यात आली. २३ मार्च १९३१ रोजी राजगुरु, सुखदेव आणि भगतसिंग यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. देशावरील प्रेमामुळेच हे तीनही क्रांतिकारक हसतमुखाने शिक्षेला सामोरे गेले. क्रांतिकाराप्रमाणेच भगतसिंग हे वृत्तपत्रकारदेखील होते. त्यांनी बसवंतसिंग या टोपणनावाने अर्जुन, प्रताप आदी नियतकालिकांमधून स्फुटलेखन केले होते. सशस्त्र क्रांतिकारकांच्या यादीत भगतसिंग यांचे नाव सर्वप्रथम येते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -