घरमहाराष्ट्रछत्री, रेनकोट, प्लास्टिक कव्हरचा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत समावेश

छत्री, रेनकोट, प्लास्टिक कव्हरचा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत समावेश

Subscribe

पावसाळा अवघ्या काही दिवसांवर आलेला असताना लॉकडाऊनमुळे पावसाळ्याच्या वस्तूंची खरेदी देखील लोकांना करता आलेली नाही. त्यातच आता लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. जर हा लॉकडाऊन वाढला तर पावसाळ्यात लागणारी छत्री, रेनकोट तसेच प्लास्टिक वस्तू कशा खरेदी करणार याच्या चिंतेत असलेल्या नागरिकांना आता दिलासा मिळाला आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत पावसाळ्याचा हंगाम सुरू होणार असल्याने छत्री, रेनकोट आणि प्लास्टिक कव्हर किंवा कव्हर यांचा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. राज्यात साधारणत: ७ जूनच्या दरम्यान पावसाला सुरुवात होते.

त्यामुळे जर १८ मे पासून सुरू होणारा लॉकडाऊनचा चौथा टप्पा ३१ मेपर्यंत वाढविला गेल्यास ऐन पावसाळ्यात विद्यार्थ्यांपासून ते शेतकर्‍यांपर्यंत अनेकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळेच येणारा पावसाळा लक्षात घेऊन छत्री, रेनकोट आणि प्लास्टिक शीट्स किंवा कव्हर यांचा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या काळात करावयाच्या उपायांच्या संदर्भात शुक्रवारी शासनामार्फत सुधारित मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. हा आदेश ३० सप्टेंबरपर्यंत लागू राहील. आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून २ मे २०२० रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये ही सुधारणा करण्यात आली आहे.

- Advertisement -

यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा अंदाज
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एकीकडे राज्य सरकारसमोर करोनाचे संकट असताना यंदा पाऊसदेखील जूनच्या पहिल्या आठवड्यात पडेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार ५ जून ते ३० सप्टेंबर हा पावसाचा कालावधी असेल. या कालावधीत ९६ ते १०० टक्के पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -