घरमहाराष्ट्रदोन वॉर्ड तोडल्याने जाणार होतो कोर्टात, पण... सदा सरवणकर यांची उद्विग्नता

दोन वॉर्ड तोडल्याने जाणार होतो कोर्टात, पण… सदा सरवणकर यांची उद्विग्नता

Subscribe

मुंबई : विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी मुंबई महापालिका प्रभागरचनेवर चर्चा करण्यात आली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात बदलण्यात आलेल्या प्रभागरचनेबाबत शिंदे गटातील शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी नाराजी व्यक्त केली. माझ्या माहिम-दादर विधानसभा क्षेत्रातील दोन वॉर्ड वरळी विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात जोडले गेले. याविरोधात मी न्यायालयात जाणार होतो, असे सांगत सरवणकर यांनी उद्विग्नता व्यक्त केली.

मागील महाविकास आघाडी सरकारने मुंबई महापालिकेत प्रभाग वाढवण्याचा निर्णय घेतला होता. पण इतर निर्णयांप्रमाणेच शिंदे-फडणवीस सरकारने हाही निर्णय बदलला. ही प्रभागरचना पूर्वीप्रमाणेच कायम ठेवण्याचा अध्यादेश काढला होता. या अध्यदेशासंबंधीचे विधेयक आज विधानसभेत मांडण्यात आले. त्यावरील चर्चेत मुंबईतील आमदारांनी आपली मते मांडली. सदा सरवणकर यांनी ठाकरे सरकारच्या काळातील बदलांबाबत प्रतिक्रिया देताना त्यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेचे आमदार व माजी मंत्री आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

ही प्रभागरचना का बदलली गेली, याची माहिती आपल्याला मिळाली नाही. माहिम-दादर माझा मतदारसंघ असून यातील दोन प्रभाग वरळी विधानसभेला जोडले गेले. याबाबत मी त्यावेळी शिवसेनेच्या नेत्यांना विचारले, पण सर्वांनीच निवडणूक आयोगाकडे बोट दाखवले. अशा प्रकारे या बदलाचा पहिला बळी मी ठरलो आहे. अर्धा दादर तोडला अन् वरळीला जोडला, असा सदा सरवणकर यांनी केला.

माझ्या मतदारसंघात झालेल्या या बदलासंदर्भात मी तत्कालीन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलो. तेव्हा त्यांनाही कसलीच माहिती नसल्याचे समजले. म्हणून मी कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला. पण कोर्टात जाऊ नका, अस निरोप मला देण्यात आला. हे सगळं भयानक होते, असे सदा सरवणकरांनी सांगितले.

- Advertisement -

प्रभाग फेररचनेत भ्रष्टाचार?
महापालिका प्रभाग फेररचनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याने हे प्रभाग तोडले गेले. प्रभागांची फेररचना करताना कुठलेही निकष लावले? असला सवाल त्यांनी केला. याची लाचलुचपतप्रतिबंधक विभागाकडून चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
कॅगतर्फे ऑडिट करणार

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या आरोपांची महालेखा परीक्षक अर्थात कॅगकडून विशेष ऑडिट करण्यात येईल. याशिवाय काही आरोपांची नगरविकास खात्याच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात येईल. चौकशीचा फार्स न करता आरोपांची चौकशी कालबद्ध वेळेत पूर्ण करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चेला उत्तर देताना केली.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -