घरमहाराष्ट्रसंजय राऊत पडले भारी, निपटण्यासाठी शिंदे-भाजपाची फौज उतरली मैदानात

संजय राऊत पडले भारी, निपटण्यासाठी शिंदे-भाजपाची फौज उतरली मैदानात

Subscribe

मुंबई : राज्यात सत्तेची समीकरणे बदलण्याची चर्चा जोरात रंगली आहे. तर दुसरीकडे, राजकीय आखाड्यात एक वेगळाच ‘सामना’ रंगल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी शिंदे गट आणि भाजपाला लक्ष्य केले आहे. त्यामुळे शिंदे गटांच्या प्रवक्त्यांप्रमाणेच भाजपाचे नेतेही आक्रमक झाले आहेत. परिणामी, खासदार संजय राऊत भारी पडल्याने त्यांना तोंड देण्यासाठी शिंदे गट आणि भाजपाने नेत्यांची फौज मैदानात उतरवल्याचे चित्र आहे.

राज्यात 2019नंतर राजकीय समीकरणे बदलत गेली. त्यात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली ती खासदार संजय राऊत यांनी. त्यांच्या पुढाकाराने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी उभी राहिली आणि भाजपाचे सत्ता स्थापनेचे मनसुबे धुळीस मिळवले. शिवसेनेच फूट पडल्यानंतर संजय राऊत यांच्या निशाण्यावर शिंदे गटाप्रमाणेच भाजपाही आहे. पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी खासदार संजय राऊत यांची जामीनावर सुटका झाल्यानंतर शिंदे गटावर जोरदार टीका केली. विशेष म्हणजे, त्यांनी भाजपाबद्दल चकार शब्द काढला नव्हता. शिवाय, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांच्याबरोबरच दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. त्यामुळे तुरुंगात जाऊन आल्यामुळे त्यांचा सूर बदलल्याची चर्चा सुरू झाली.

- Advertisement -

अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Opposition party leader Ajit Pawar) यांच्या भाजपाप्रवेशाची चर्चा सुरू होती. नंतर त्यांच्या मुख्यमंत्रीपदाची चर्चा सुरू झाली. पण जीवात जीव असेपर्यंत मी राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे अजित पवारांनी स्पष्ट केले आहे. एकीकडे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांचा निकाल अद्यापही समोर आलेला नसताना, दुसरीकडे हे सरकार 15 दिवसांतच कोसळणार असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे शिंदे गट बिथरला असून त्यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे.
संजय राऊत यांचे मानसिक संतुलन पूर्णपणे बिघडले असून उचलली जीभ लावली टाळ्याला अशी त्यांची स्थिती झाली असल्याची टीका शिंदे गटाच्या शिवेसनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केली आहे. त्याचबरोबर, संजय राऊत हे महाराष्ट्राच्या राजकारणातले शेखचिल्ली आहेत. त्यांची स्वप्ने कधीच पूर्ण होणार नाहीत, असे प्रत्युत्तर शिवसेनेच्या नव्या प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी दिले आहे.

राऊतांविरोधात भाजपाही आक्रमक
खासदार संजय राऊत यांच्या निशाण्यावर भाजपा देखील आहे. जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी 2019च्या पुरवामा हल्लाप्रकरणावरून मोदी सरकारवर ठपका ठेवला आहे. तोच मुद्दा घेत संजय राऊत यांनी दैनिका सामनातील अग्रलेखाद्वारे तसेच आपल्या ‘रोखठोक’ सदरातून भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. याबरोबरच त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री दादा भुसे तसेच भाजपा आमदार राहुल कूल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. दादा भुसेंनी गिरणा सहकारी साखर कारखान्यात 1800 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. तर, राहुल कूल यांनी भीमा-पाटस सहकारी साखर कारखान्यात 500 कोटी रुपयांचा घोटाळा केला असून त्याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी संजय राऊत यांनी केली आहे. काल, बुधवारी दौंडमधील वरवंडमध्ये संजय राऊत यांनी या साखर कारखान्याच्या सभासदांची सभा सुद्धा घेतली. भाजपा नेते राहुल कूल हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती मानले जातात.

- Advertisement -

दुसरीकडे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सांगण्यावरून संजय राऊत यांना खासदार बनवले आणि त्यासाठी मी पैसा खर्च केला, असा खळबळजनक दावा भाजपाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भांडुप येथील एका कार्यक्रमात केला होता. त्यावरून खासदार संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्याविरोधात मुलुंड कोर्टात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते सुद्धा संजय राऊत यांच्याविरोधात मैदानात उतरले आहेत. दस्तुरखुद्द देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांना सकाळी खासदार संजय राऊत यांच्याकडे जायचे बंद करण्याचा सल्ला दिला आहे. तर, संजय राऊत हे चायनीज मॉडेल आहेत. राजकारणासाठी त्यांच्यासारखी माणसे चोरबाजारात स्वस्तात मिळतात, अशी टीका भाजपा आमदार नितेश राणे यांनी केली आहे. याशिवाय, किरीट सोमय्या, आशिष शेलार, राम कदम हे अधूनमधून राऊत यांच्यावर तोंडसुख घेणारे ‘बाईट’ देतच असतात.

संजय राऊत यांची भूमिका स्पष्ट आहे. ते सकाळी माध्यमांसमोर येऊन ठाकरे गटाबरोबरच महाविकास आघाडीचे अजेंडा मांडतात. त्यात शिंदे गट आणि भाजपाला लक्ष्य केले जाते. ते येऊन गेले की, मग दिवसभर शिंदे गटाबरोबर भाजपा नेत्यांची फौज मैदानात उतरल्याचे चित्र पाहायला मिळते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -