घरमहाराष्ट्रSanjay Raut : पंतप्रधान मोदींच्या सोलापूर दौऱ्यावर राऊतांची टीका, म्हणाले - "जिथे...

Sanjay Raut : पंतप्रधान मोदींच्या सोलापूर दौऱ्यावर राऊतांची टीका, म्हणाले – “जिथे राजकीय फायदा तिथेच…”

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (ता. 19 जानेवारी) सोलापूर दौऱ्यावर आहेत. परंतु, मोदींच्या या दौऱ्यावर खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (ता. 19 जानेवारी) सोलापूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने सोलापुरातल्या कुंभारीत साकारण्यात आलेल्या रे नगर गृहनिर्माण संस्थेतील पंधरा हजार घरांचे लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडणार आहे. सोलापुरातील कार्यक्रम झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बंगळुरुकडे रवाना होतील. गेल्या आठवड्याभरापासून मोदींच्या या दौऱ्याची चर्चा सुरू होती. कारण आठवड्याभरापूर्वीच मोदींच्या हस्ते मुंबईतील बहुप्रतिक्षित अशा अटल सेतूचे उद्घाटन पार पडले. यावेळी त्यांनी नाशिक जिल्ह्याला भेट देत काळाराम मंदिरात जाऊन प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले. यानंतर अवघ्या आठ दिवसांतच पुन्हा मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने पंतप्रधानांचे हे दौरे महत्त्वाचे असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु, मोदींच्या या दौऱ्यावर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. महायुतीकडे कोणी प्रचारक नसल्याने लोकसभा निवडणुकीसाठी मोदींचे महाराष्ट्र दौरे वाढले आहेत. इतकेच नाही तर जिथे राजकीय फायदा जास्त आहे, तिथेच पंतप्रधान जास्त जात असतात, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे. (Sanjay Raut’s criticism of PM Narendra Modi visit to Solapur)

हेही वाचा… CM Eknath Shinde : दावोस दौऱ्यामुळे विरोधकांचे डोळे पांढरे होणार, मुख्यमंत्री शिंदेंचा टोला

- Advertisement -

आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुतीवर निशाणा साधला. प्रसार माध्यमांसमोर ते म्हणाले की, उत्तर प्रदेशात लोकसभेच्या जवळपास 85 जागा आहेत. त्यानंतर महाराष्ट्राचा नंबर लागतो. महाराष्ट्रात 48 जागा आहेत. त्यामुळे या दोन राज्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जास्त लक्ष आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र निर्णायक भूमिकेत असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मणिपूरला गेले पाहिजे, काश्मीर खोऱ्यात गेले पाहिजे, तसेच त्यांनी म्यानमारच्या सीमेवर, लडाखला जायला पाहिजे. लक्षद्वीपला जाऊन वेळ घालवला आणि मालदिवशी भांडण केले हे देखील राजकारण आहे. जिथे राजकीय फायदा आहे तिथेच पंतप्रधान जातात. त्यांना जनहीत, राष्ट्रहीत याचे त्यांना आणि त्यांच्या पक्षाला काही घेणे देणे नाही.

तसेच, मणिपूरमध्ये जर लोकसभेच्या २५ जागा असत्या तर ते मणिपूरला गेले असते. मणिपूरला लोकसभेच्या दोन-तीन जागा आहेत त्यामुळे राजकीयदृष्ट्या त्यांना नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचा पक्ष हा लोकसभेच्या आकड्यांचा हिशेब करतो आणि राजकारण करतो, असे म्हणत संजय राऊत यांनी सांगितले की, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वातील शिवसेनेचा, शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीचा, राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा धसका सत्ताधाऱ्यांनी घेतला आहे. लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे मते मिळवून देऊ शकत नाहीत म्हणूनच मोदी वारंवार महाराष्ट्रात येत आहेत, असा सणसणीत टोलाच राऊतांनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे.

- Advertisement -

देशाची 88 टक्के जनता नोकरीच्या शोधात आहे असे अहवाल सांगतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहा वर्षांत काय केले? प्रत्येक वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याची भाषा त्यांनी केली होती. मात्र पदवीधरांना ते पकोडे तळायला लावतात. नोकरी मागणाऱ्यांना रामलल्लाचे फुकट दर्शन देत आहेत, असे सांगतात. पण बेरोजगारांना आता फुकटात रामलल्लाचे दर्शन नको, त्यांना नोकरी हवी आहे. त्यामुळे 88 टक्के जनता नोकरी शोधत असेल तर हा देशच बेरोजगार झाला आहे, असे सांगत संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, मोदींच्या वारंवार दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात आगामी लोकसभेबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -