घरमहाराष्ट्रसंजीव भट्ट यांच्या आरोपानंतर गुजरातमध्ये राजीनामे घेतले का?

संजीव भट्ट यांच्या आरोपानंतर गुजरातमध्ये राजीनामे घेतले का?

Subscribe

एका अधिकाऱ्याच्या पत्रावरुन राजीनामा मागणाऱ्या भाजप नेत्यांना संजय राऊतांचा सवाल

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्ब नंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. याशिवाय, सरकार बरखास्त करा अशी मागणी राज्यासह देशाच्या संसदेत केली जात आहे. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपला सवाल केला आहे. आयपीएस संजीव भट्ट यांच्या आरोपानंतर गुजरातमध्ये राजीनामे घेतले का? असा सवाल एका अधिकाऱ्याच्या पत्रावरुन राजीनामा मागणाऱ्या भाजप नेत्यांना संजय राऊतांनी केला आहे.

केंद्रीय न्याय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी महाराष्ट्र सरकार राज्य चालवण्यास सक्षम नसल्याचं म्हटलं आहे. यावर संजय राऊत यांनी रविशंकर प्रसाद यांना सवाल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हा आयपीएस अधिकारी संजिव भट्ट आणि शर्मा यांनी सतत गुजरातच्या तत्कालिन सरकारविरोधात लेटर बॉम्ब टाकले होते. त्याच्या आधारावर गुजरातचे तत्कालिन मुख्यमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्र्यांवर कारवाई करणार का? असा सवाल संजय राऊत यांनी केला. संजिव भट्ट यांचे आरोप हे परमबीर सिंग यांच्यापेक्षाही गंभीर आहेत. संजिव भट्ट यांना तुरुगांत टाकलं. महाराष्ट्रात वेगळा न्याय आणि गुजरातमध्ये वेगळा न्याय. हे कोणतं संविधान आहे? संजिव भट्ट यांचं पत्र पुन्हा समोर आणावं. मी रविशंकर प्रसाद यांना आणि काल लोकसभेत थयथयाट करत होते त्यांना आवाहन करतो की त्या पत्रावर देखील कारवाई करण्याची मागणी करा, असं खुलं आव्हान संजय राऊत यांनी दिलं आहे.

- Advertisement -

परमबीर सिंह हे सर्वोच्च न्यायालयाच्या यंत्रणेचा वापर करुन राज्य सरकारवर दबाव आणू पाहत आहेत. तशी वेळ आली तर महाराष्ट्र सरकाराने विचार करायला हवा, असं संजय राऊत म्हणाले. देशाचे माजी सरन्यायाधीश आणि भाजपचे राज्यसभेचे खासदार रंजन गोगोई यांनी अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाच्या कारभारावर ताशेरे ओढले होते. सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळत नाही, दबाव आणला जातो, असं त्यांनी म्हटलं होतं. मग परमबीर सिंह हे देखील न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून राज्य सरकारवर असाच दबाव आणू पाहत आहेत का, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -