परमबीर सिंह यांच्यावर आणखी एक खंडणीचा गुन्हा; दोन कोटी मागितल्याचा आरोप

Parambir Singh

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात आणखी एक खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. परमबीर सिंह यांनी दोन कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. शरद अग्रवाल नावाच्या व्यक्तीकडून दोन कोटींची खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली ठाणे शहरातील कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परमबीर सिंह यांनी शरद अग्रवाल यांच्याकडून दोन कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. कोपरी पोलीस ठाण्यात परमबीर सिंह यांच्याविरोधात शरद अग्रवाल यांच्याकडून २ कोटी रुपयांची खंडणी मागितली आणि जमिनी बळजबरीने नावावर करण्यात आल्याच्या आरोपावरुन गु. र. क्र. १७६/२०२१ भादंवि ३८४, ३८५, ३८८, ३८९, ४२०, ३६४ अ, ३४, १२० ब यांसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल झाला आहे. परमबीर सिंह यांच्या सोबत संजय पुनामिया, सुनील जैन, मनोज घोटकर आणि डीसीपी पराग मणेरे असे सहआरोपी आहेत. पुढील तपास पो. नि. फूलपगारे करत आहेत.

परमबीर, डीसीपी, एसीपी यांच्यासह आठ जणांविरुद्ध खंडणीचा गुन्हा

परमबीर सिंह, डीसीपी अकबर पठाण यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर कालच खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. केस मागे घेण्यासाठी बांधकाम व्यवसायिकाकडून खंडणी मागितल्याचा आरोप परमबीर सिंह, अकबर पठाण यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर करण्यात आला आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी श्यामसुंदर अग्रवाल हा असून ठाण्यातील बांधकाम व्यवसायिक आहे. अग्रवाल यांच्या तक्रारीवरून परमबीर सिंह, डीसीपी अकबर पठाण, एसीपी श्रिकांत शिंदे , पीआय आशा कोरके, पीआय नंदकुमार गोपाले, पोलीस अधिकारी संजय पाटील, सुनील जैन आणि संजय पनामिया आणि संबंधित पोलीस अधिकारी यांच्या विरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्रमांक २९९/२१, कलम३८७, ३८८, ३८९, ४०३, ४०९, ४२०, ४२३, ४६४, ४६५, ४६७, ४६८, ४७१, १२०(b), १६६, १६७, १७७, १८१, १८२, १९३, १९५, २०३, २११, २०९, २१०, ३४७, १०९, ११०,१११,११३ भा. द. वि. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. नमूद गुन्ह्यातील २ आरोपींना अटक करण्यात आली आहे.