घरमहाराष्ट्रशिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचे आश्वासन कधीच दिले नव्हते

शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचे आश्वासन कधीच दिले नव्हते

Subscribe

सत्तेसाठी शिवसेना-भाजपमध्येच सामना सुरू

शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचे आश्वासन कधीच दिले नव्हते, असे स्पष्ट करतानाच मुख्यमंत्रिपदाबाबत भाजप कोणताही समझोता करणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला मंगळवारी दिला. अडीच वर्षांचे मुख्यमंत्रिपद देऊ, असे आम्ही कधीच कबूल केले नव्हते. 1995चा फॉर्म्युला येईल वगैरे असे काहीही होणार नाही, मुख्यमंत्रीपदासाठी प्रस्ताव आला होता, पण अशी कुठलीही बातचीत झाली नाही, असे अमित शहांनीही मला सांगितल्याचा खुलासाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या विधानानंतर शिवसेना आणि भाजपमधली धूसफूस आणखीन वाढली आहे. भाजपाच्या नेतृत्वाखाली पुन्हा महायुतीचेच सरकार स्थापन होईल असा दावाही त्यांनी केला.

अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचा शिवसेनेला शब्द दिलेला नव्हता. वाटाघाटीत अडीच वर्षांत मुख्यमंत्रिपदाचा शब्द नव्हता. आम्ही चर्चेतून तोडगा काढण्याचा प्रयत्न करू, कोणतीही आडमुठी भूमिका नाही. त्यांच्या मागण्या रास्त असल्यास विचार करू. आम्ही कुठलाच पर्याय शोधत नाही. शिवसेनाही शोधत नाही आहे. निम्मे निम्मे काय ठरले होते ते येत्या दोन ते तीन दिवसांत कळेल, असेही सूचक विधान मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

- Advertisement -

फडणवीस म्हणाले की, भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत येणार नाहीत. पंतप्रधानांनी आधीच स्पष्ट केलेच आहे, मात्र उद्या होणार्‍या बैठकीत विधिमंडळाचा नेता कोण यावर शिक्कामोर्तब होईल, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी पुढील पाच वर्षांसाठी आपणच मुख्यमंत्री होणार असल्याचे सांगितले. 1995चा फॉर्म्युला वगैरे काहीही ठरलेले नाही. शिवसेनेने अजून काहीही मागणी केलेली नाही. मीडियाला सरकार स्थापनेबाबत सरप्राईज देणार असल्याचेही फडणवीस म्हणाले.

आतमध्ये काय आहे हे तुम्हाला माहीत नाही. पण लवकरच फॉर्म्युला कळेल. आमचा ‘ए’ प्लॅनच आहे, बी प्लॅन नाही, असेही फडणवीसांनी स्पष्ट केले आहे. शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक शनिवारी मुंबईत झाली होती. अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद आपल्याकडे घ्या आणि सत्तेत ‘फिफ्टी-फिफ्टी’चा वाटाही घ्या, असा आग्रह शिवसेनेच्या आमदारांनी तिथे धरला होता. सत्तास्थापनेबाबत सर्व निर्णय घेण्याचे अधिकार आमदारांनी उद्धव यांना दिले होते. शिवसेनेचे आ. प्रताप सरनाईक यांनी बैठकीनंतर सांगितले की, अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदासह जे जे ठरेल ते भाजपाने लेखी द्यावे. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी असे काहीही होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. अडीच वर्षांचे मुख्यमंत्रिपद देऊ, असे कधीच कबूल केले नसल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला सूचक इशारा दिला आहे.

- Advertisement -

भाजपाने 105 जागांसह दोन अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळवत मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. मात्र कोणत्याही एका पक्षाला 145 हा सत्ता स्थापनेच्या आकडा गाठता आलेला नाही. शिवसेना 56 जागांसह दुसर्‍या, राष्ट्रवादी 54 जागांसह तिसर्‍या, काँग्रेस 44 जागांसह चौथ्या स्थानावर आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी शिवसेना-भाजपा एकत्र येतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

असा ५०-५० चा कोणताही फॉर्म्युला आमच्यात ठरला नाही

अमित शहांचा आजचा मुंबई दौरा रद्द

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे बुधवारी मुंबईत येणार होते. शहा मुंबईत आल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही ते भेट घेतील असे सांगण्यात आले होते. मात्र शहा यांनी आपला बुधवारचा मुंबई दौरा रद्द केला आहे. यामुळे तूर्तास शहा-ठाकरे भेट सध्या तरी टळली आहे. शिवसेनेला सत्तेत समसमान वाटप आणि अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद देण्याचे आश्वासन भाजपने दिले नव्हते असे खळबळजनक वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर पत्रकारांशी बोलताना मंगळवारी केले. आता अमित शहा यांचा मुंबई दौरा रद्द झाल्याने भाजप-शिवसेनेमधील संबंध अधिक ताणल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान अमित शहा १ किंवा २ नोव्हेंबरला मुंबईत येतील असे सूत्रांकडून समजते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -