घरमहाराष्ट्रमुंबईसह ठाणे, गुहागरवरील सेनेच्या हट्टामुळे युती रखडली!

मुंबईसह ठाणे, गुहागरवरील सेनेच्या हट्टामुळे युती रखडली!

Subscribe

विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना युतीचा फैसला अजूनही होताना दिसत नाही. राज्यातील काही जागांवरील शिवसेनेचा दावा भाजपला अद्याप मान्य नाही. आणि याला कारण ठरले आहे ते मुंबईसह ठाणे, पुणे आणि गुहागरच्या जागेवरील तिढा. ज्या जागांवर सेना तिसर्‍या क्रमांकावरही पोहोचू शकली नाही, अशा जागांवरील हट्ट न सोडल्यास या जागांवर मैत्रिपूर्ण लढत करावी, असा नवा सूर भाजपतून व्यक्त होऊ लागला आहे. दुसरीकडे जागांची अदलाबदल होणार नसल्यास भाजपच्या उमेदवाराला सेनेचे आणि सेनेच्या उमेदवाराला भाजपचे चिन्ह देऊन निवडणुकीला सामोरे जाण्याचा आणखी एक प्रस्ताव भाजपने पुढे केला आहे.

विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसा भाजप-शिवसेना युतीच्या जागा वाटपाचा तिढा वाढतो आहे. राज्यातल्या विधानसभेच्या २८८ जागांपैकी प्रत्येकी १४४ जागांचे वाटप करण्याची मागणी सेनेने सुरुवातीपासून लावून धरली होती. यामुळे २०१४ च्या निवडणुकीत प्राप्त झालेल्या जागांवरही पाणी सोडावे लागण्याची चिन्हे भाजपपुढे होती. याकारणे हा प्रस्ताव कदापि शक्य नसल्याचे भाजपने आधीच जाहीर करून टाकले. पुढे भाजप आणि सेनेने गत निवडणुकीत जिंकलेल्या जागांव्यतिरिक्त शिल्लक जागा समप्रमाणात वाटप करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र तो सेनेला मान्य नव्हता. जागा वाटपाच्या या तिढ्यात नव्याने भाजप १४४, सेना १२६ सहकारी १८ असे वाटप भाजपकडून पुढे करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. जागा वाटपाचे हे सूत्र मान्य करायचे असल्यास काही जागांची अदलाबदल करण्यासाठी शिवसेना आग्रही असल्याचे सांगण्यात आले.

- Advertisement -

यात मुंबईसह पुणे, ठाणे आणि गुहागर येथील भाजपला अपेक्षित असलेल्या जागांवर शिवसेनेने हट्ट धरला आहे. वडाळ्यातील जागा गत निवडणुकीत काँग्रेसने जिंकली होती. काँग्रेसचे विजयी उमेदवार कालिदास कोळंबकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने ही जागा आपल्याला मिळावी, असा भाजपचा आग्रह आहे. या जागेवर भाजप दुसर्‍या स्थानी तर सेना तिसर्‍या क्रमांकावर फेकली गेली होती. यामुळे ही जागा आपल्यालाच मिळायला हवी, असा भाजपचा दावा आहे. भायखळ्याची जागाही सेनेला हवी आहे. या जागी एमआयएमचे वारीस पठाण हे विजयी उमेदवार होते. तर भाजप दुसर्‍या क्रमांकावर होता. तिसर्‍या क्रमांकावर काँग्रेस तर शिवसेना चौथ्या क्रमांकावर फेकली गेली होती. यामुळे ही जागाही सोडायची नाही, असे भाजपने ठरवून टाकले आहे. गुहागरची जागा परंपरेने आपल्याकडे असल्याचा दावा भाजपचा आहे.

मात्र भास्कर जाधवांसाठी ती सेनेला हवी आहे. तीही सोडायची नाही, असे भाजपने स्पष्ट केले आहे. ठाण्यातील बेलापूर, ऐरोली आणि ठाणे या तीन जागांवर सेनेने दावा केला आहे. यातील बेलापूर आणि ठाण्याची जागा भाजपने जिंकली होती. पुण्यातील दोन जागा मिळाव्यात असा आग्रह सेनेने धरला आहे. सेनेच्या या आग्रहामुळेच युती रखडल्याचे सांगितले जाते.

- Advertisement -

आता या जागा मैत्रीपूर्ण लढतीने लढवल्या जाव्यात असा प्रस्ताव पुढे आला आहे. तोही सेनेला मान्य नाही. अखेरचा पर्याय म्हणून सेनेच्या जागेवर भाजपच्या उमेदवाराला सेनेचे निवडणूक चिन्ह आणि भाजपच्या जागेवर सेनेच्या उमेदवाराला भाजपचे निवडणूक चिन्ह देऊन निवडणूक लढवण्याचा नवा पर्याय भाजपने पुढे केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -