घरदेश-विदेशJitendra Awhad : काका का, हे आता त्यांच्या चांगलंच लक्षात आलं...

Jitendra Awhad : काका का, हे आता त्यांच्या चांगलंच लक्षात आलं असेल; जितेंद्र आव्हाडांचा पवारांना टोला

Subscribe

नवी दिल्ली : राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर दोन्ही गटांनी पक्ष आणि चिन्हावर दावा केला. केंद्रीय निवडणूक आयोगासमोर याची सुनावणी झाली आणि आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव आणि घड्याळ हे पक्षचिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाविरोधात राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्या कार्यकर्त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. या याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी शरद पवार यांच्याबद्दल अभिमानास्पद वाक्य वापरल्याचं सांगत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. तसेच काका का, हे आतातरी यांच्या चांगलंच लक्षात आलं असेल, असो टोला देखील अजित पवार गटाला लगावला आहे.

हेही वाचा – Sharad Pawar : कोणीही भेटलं म्हणून खुलासा करत बसू का? वसंत मोरेंबाबत शरद पवारांची प्रतिक्रिया

- Advertisement -

आव्हाडांच्या पोस्टमध्ये काय?

जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) हँडलवर पोस्ट लिहीत म्हटलं आहे की, “न्यायदान करण्याच्या आसनावर बसलेले सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी आदरणीय शरद पवार साहेब यांच्याबद्दल जी टिप्पणी केली आहे, ती छाती फुगवणारी होती. सुप्रीम कोर्ट म्हणाले की, शरद पवार हे खूप मोठ्या उंचीचे नेते आहेत. सुप्रीम कोर्टातील एखाद्या न्यायाधीशाने न्यायासनावर बसून अशी टिप्पणी कोणाबद्दल केली असेल, असे मला तरी आठवत नाही. सर्वोच्च न्यायालयाला जे कळले ते ज्या बालकांना हाताला धरून शरद पवार साहेबांनी चालविले; त्यांना समजले नाही, हे दुर्दैवी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीने माझे मात्र उर भरून आला, अशी पोस्ट आव्हाडांनी केली आहे.

यासोबतच आव्हाडांनी आणखी एक पोस्ट केली आहे. आणि या पोस्टद्वारे अजित पवारांना टोला हाणला आहे. काका का, हे आतातरी यांच्या चांगलंच लक्षात आलं असेल, असं ही ते शेवटी म्हणाले आहेत. आव्हाड म्हणतात, राजकारण म्हणजे फक्त बेरजेचे गणित नसते. लोकांमध्ये जाऊन, जमिनीवर काम करून स्वत:ची ओळख निर्माण करावी लागते. राजकीय आणि सामाजिक जीवनात नितीमत्ता जपावी लागते. तुमच्या कृतीने तुम्ही स्वत:च स्वत:च्या अंगावर शिंतोडे उडवून घेतले आहेत. ‘या वयात’ही तुमच्याकडे स्वत:ची ओळख नाही. आमच्या बापाने निर्माण केलेला आणि वाढवलेल्या पक्षावर तुम्ही हक्क सांगताय. आजपर्यंत लोकं तुम्हाला तुमचं अस्तित्त्व विचारत होती, आज सर्वोच्च न्यायालयाने त्यावर शिक्कामोर्तब केले आहे.
‘काका का?’ हे आता यांच्या चांगलं लक्षात आलं असेल.

- Advertisement -

हेही वाचा – Awhad : दोन फोटो शेअर करत जितेंद्र आव्हाड म्हणतात, मुंबईची काय अवस्था झाली आहे ते बघा!

आजच्या सुनावणीत काय?

शरद पवार गटाच्या याचिकेवर आज न्यायमूर्ती सूर्याकांत आणि के.व्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या सुनावणीत कोर्टाने अजित पवार गटाला घड्याळ चिन्हाऐवजी दुसरं चिन्ह घेण्याचा पर्याय सुचवला आहे. शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी छगन भुजबळांच्या विधानाचा दाखला दिला. ग्रामीण भागातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी शरद पवारांचा फोटो आणि घड्याळ चिन्हाचा फोटो वापरावा हे विधान सिंघवींनी वाचून दाखवले. त्यावर तुम्ही शरद पवारांचे फोटो का वापरत आहात? तुम्हाला एवढा विश्वास असेल तर तुमचे फोटो वापरा असं न्यालयाने थेट सुनावलं आहे. अजित पवार गटाचे वकील मनिंदर सिंग यांनी आम्ही फोटो वापरत नाही आणि काही उत्साही कार्यकर्त्यांकडून ते झाले असावे, असे सांगितले. कार्यकर्ते सोशल मीडियावर टाकत असलेल्या पोस्टवर नियंत्रण ठेवणे शक्य नसते, असे सांगताच कोर्टाने पक्षाने आपल्या कार्यकर्त्यांना शिस्त लावणे आवश्यक असते असे म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -