घरताज्या घडामोडीमोदींच्या बिहारमधील सभांचा अभ्यास करुन शिवसेना दसरा मेळावा व्यासपीठावर घेणार

मोदींच्या बिहारमधील सभांचा अभ्यास करुन शिवसेना दसरा मेळावा व्यासपीठावर घेणार

Subscribe

शिवाजी पार्कवर दरवर्षी नित्यनिमाने होणारा दसरा मेळावा हा शिवसेनेसाठी महत्त्वाचा मानला जातो. शिवसैनिकांना नवी ऊर्जा देणे असो किंवा विरोधकांवर तुटून पडणे. दसरा मेळाव्याच्या भाषणामधून शिवसेना प्रमुख आपल्या राजकारणाची चुणूक दाखवित असतात. यावर्षी कोरोनाचे संकट असल्यामुळे हा दसरा मेळावा ऑनलाईन होणार असे सांगितले जात असतानाच आता दसरा मेळावा हा व्यासपीठावरच होणार असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जाहीर केले आहे. त्यासाठी बिहारमधील मोदींच्या १२ सभांचा अभ्यास करु आणि त्यानंतर दसरा मेळाव्याचे आयोजन करु, असे राऊत यांनी सांगितले आहे.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतरचा हा पहिलाच दसरा मेळावा आहे. या मेळाव्याचे महत्त्व राजकीय आणि सांस्कृतिक देखील आहे. दसरा मेळावा घेण्याबाबत चर्चा सुरु आहे. नियम आणि आरोग्याच्यादृष्टीने योग्य होईल, अशा पद्धतीने नियोजन केले जाईल, असे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी टीव्ही ९ या वृत्तवाहिनीशी बोलताना दिले. तसेच दसरा मेळावा ऑनलाईन घेणार का? या प्रश्नावर राऊत म्हणाले की, दसरा मेळावा ऑनलाईन होणार हे कुणी सांगितलं? असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.

- Advertisement -

२५ ऑक्टोबर रोजी दसरा आहे. कोरोनाच्या महामारीमुळे अनेक गोष्टी ऑनलाईन होत आहेत. पण बिहार निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ सभा घेणार आहेत. ते सभा कशा घेतात, याचा आम्ही अभ्यास करणार आहोत. ते पाहून कोणत्याही नियमांचे उल्लंघन न करता दसरा मेळावा व्यासपीठावर होणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. पुढच्या एक-दोन दिवसांत यावर सकारात्मक निर्णय होणार असल्याचेही राऊत म्हणाले.

पॅटर्न बदलू नका मेळावा ऑनलाईनच घ्या

दरम्यान विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी संजय राऊत यांच्या भूमिकेवर टीका केली आहे. पंतप्रधान मोदींना राम मंदिराचे उदघाटन ऑनलाईन करण्याचा सल्ला देणारे संजय राऊत दसरा मेळावा ऑनलाईन का घेत आहेत? असा प्रश्न दरेकर यांनी उपस्थित केला आहे. तसेच कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी ठाकरे सरकारने सण, उत्सवांवर बंधने घातली. त्यामुळे हा पॅटर्न बदलू नये असेही दरेकर म्हणाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -