घरमहाराष्ट्रशिवसेनेने भाजपला धोका दिला; भाजप नेते अमित शहा यांचा आरोप

शिवसेनेने भाजपला धोका दिला; भाजप नेते अमित शहा यांचा आरोप

Subscribe

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीआधी शिवसेनेला बंद खोलीत मुख्यमंत्रिपदाबाबत कोणताही शब्द दिला नव्हता, याचा पुनुरुच्चार त्यांनी केला. मुंबईच्या राजकारणावर भाजपचा वरचष्मा राहिला पाहिजे, असेही शहा यांनी सांगितले

मुंबई : आपण त्यांच्यासोबत एकत्र निवडणुका लढविल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर आपण मते मागितली. मात्र, त्यांनी निवडणूक निकालानंतर आपल्याला धोका दिला, असा आरोप भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी शिवसेनेवर केला. राजकारण आपण सर्व सहन करू शकतो, मात्र धोका सहन करू शकत नाही, असे सांगत शहा यांनी धोका देणाऱ्यांना जमिनीवर आणा, असे आवाहन भाजप पदाधिकाऱ्यांना केले.

त्यांची आणि आपली  इतक्या वर्षांपासून युती होती. परंतु २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी केवळ दोन जागांवरून युती तोडली. तशी युती तोडायची गरज होती का? युती तोडल्यानंतर निवडणुकीत त्यांनी आपल्या जागा पाडल्या. त्यांनी आपला विश्वासघात केला. तरीही नंतर आपण  युती केली, असे शहा म्हणाले. राजकारणात धोका देण्याची ज्यांना  सवय लागते ते कधीच मजबूत होऊ शकत नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला.

- Advertisement -

लालबागच्या राजाच्या दर्शनसाठी मुंबईत आलेल्या अमित शहा यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मेघदूत या शासकीय निवासस्थानी भाजपचे खासदार, आमदार, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आगामी मुंबई महापलिका निवडणुकीत १५० जागा जिंकण्याचे लक्ष्य निर्धारित करताना शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीआधी शिवसेनेला बंद खोलीत मुख्यमंत्रिपदाबाबत कोणताही शब्द दिला नव्हता, याचा पुनुरुच्चार त्यांनी केला. मुंबईच्या राजकारणावर भाजपचा वरचष्मा राहिला पाहिजे, असेही शहा यांनी सांगितले.

आमच्यामुळे नाही तर  स्वतःच्या  चुकीमुळेच  शिवसेनेला फटका बसला आहे. ठाकरेंच्या अहंकारामुळे शिवसेना फुटली. स्वतःच्या निर्णयामुळे शिवसेना छोटा पक्ष झाला. मात्र, आम्ही  त्यांना कधीच छोटे मानले नाही. उद्धव ठाकरेंनी केवळ दोन जागांसाठी २०१४ मध्ये आपल्यासोबतची युती तोडली.ते खयाली पुलाव पकवत होते. त्यांना वाटले की भाजप युती तोडू देणार  नाही. आपल्याशिवाय भाजपचे  काय होणार, आपल्याच जास्त जागा जिंकून येतील असा त्यांचा समज होता. जो चुकीचा ठरला, असेही शाह यांनी सांगितले.

- Advertisement -

त्यामुळे अशा धोका देणाऱ्यांना आपण धडा शिकवला पाहिजे.ही संधी आपल्याला  मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने चालून आली आहे. जे धोका देतात त्यांना योग्य शिक्षा झालीच पाहिजे. त्यासाठी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने जमिनीवर उतरुन काम केले  पाहिजे, अशी अपेक्षा शाह यांनी व्यक्त केली. आम्ही छोटा भाऊ -मोठा भाऊ  असे कधीच केले नाही. शिवसेनेनेच युती तोडून,आमच्या जागा पाडून आमच्या पाठीत खंजीर खुपसला. तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर मते मागितली आणि निवडून आले. नंतर मात्र जनतेचा विश्वासघात केला, असेही शहा म्हणाले.

महापलिका निवडणुकीत एनडीए विजयी होईल

दरम्यान, मोदीजींच्या नेतृत्वात  एकनाथजी आणि देवेंद्रजींची जोडी  जनतेच्या हितासाठी  समर्पित वृत्तीने काम करत आहेत. मला विश्वास आहे की आगामी मुंबई महापलिका निवडणुकीत एनडीए प्रचंड बहुमताने विजयी होईल, असे ट्वीट अमित शहा यांनी केले आहे.

अभी नही तो कभी नही!

देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी अभी नही तो कभी नही, असे सांगत मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्याचा निर्धार बोलून दाखवला. मूळ शिवसेना आपल्यासोबत आहे. त्यामुळे आपल्याला मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवायचा आहे. त्यामुळे आपल्या जीवनातील शेवटची  निवडणूक आहे असे समजून कामाला लागा, असे आवाहन फडणवीस यांनी केले.यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आदी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -