घरमहाराष्ट्रअमृत महोत्सवी वर्षात लालपरीचे आधुनिक पाऊल, पुणे-अहमदनगर शिवाई या विद्युत बससेवेचा शुभारंभ

अमृत महोत्सवी वर्षात लालपरीचे आधुनिक पाऊल, पुणे-अहमदनगर शिवाई या विद्युत बससेवेचा शुभारंभ

Subscribe

राज्य परिवहन महामंडळाची बससेवा हा राज्याच्या प्रगतीचा अविभाज्य घटक होती आणि भविष्यातही राहील. राज्याचे भविष्य घडविण्याचे आणि संस्कृती जपण्याचे कार्य एसटीने केले, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या अमृत महोत्सवी कामगिरीचा गौरव केला.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बुधवारी अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले. यानिमित्ताने स्वारगेट बसस्थानक येथे पुणे विभागाच्या ‘शिवाई’ या विद्युत बससेवेचा शुभारंभ देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. १९४८ साली पुणे ते अहमदनगर मार्गावर एसटी महामंडळाची पहिली बस धावली होती. याच मार्गावर बुधवारी पहिली ‘शिवाई’ ही विद्युत बससेवा सुरू करण्यात आली. या बससेवेला बुधवारी हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात बुधवारी यानिमित्त विशेष सोहळा संपन्न झाला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थितांना संबोधित केले. राज्य परिवहन महामंडळाची बससेवा हा राज्याच्या प्रगतीचा अविभाज्य घटक होती आणि भविष्यातही राहील. राज्याचे भविष्य घडविण्याचे आणि संस्कृती जपण्याचे कार्य एसटीने केले, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या अमृत महोत्सवी कामगिरीचा गौरव केला. यावेळी राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेच्या अमृत महोत्सवी गौरवशाली कामगिरीचा आढावा घेणारी चित्रफीत दाखविण्यात आली.

- Advertisement -

गेल्या २५ वर्षाहून अधिक काळ विनाअपघात सेवा दिलेल्या ३० चालकांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. २५ हजार रूपये रोख रक्कम, शाल, श्रीफळ, प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड.अनिल परब, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोर्‍हे, खासदार गिरीश बापट, परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, मुख्य सुरक्षा आणि दक्षता अधिकारी एम. के. भोसले, पुणे विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड आदी उपस्थित होते.

नव्या संकल्पनांचा स्वीकार – मुख्यमंत्री
राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेत सुधारणा करताना नव्या संकल्पना शासन स्वीकारत आहे. सर्वांत जास्त विद्युत बसेस आणणारे मुंबई हे देशातील पहिले शहर ठरले. विद्युत बसचे तंत्रज्ञान नवीन आहे. त्याची सवय व्हायला वेळ लागेल. एसटीची सेवा प्रदूषणविरहीत कशी होईल यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. काळाच्या गरजा आणि तंत्रज्ञानात होत असलेले बदल लक्षात घेऊन त्यानुसार प्रगती करणे हे आपले उद्दिष्ट आहे, असे त्यांनी सांगितले. एसटी बसला पुण्यातून सुरुवात झाली आणि पुण्यातच अमृत महोत्सवाला सुरुवात होत आहे हा योगायोग असल्याचेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

एसटीला गतवैभव मिळवून देणारच- परिवहनमंत्री
एसटी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी असून एसटीचे गतवैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी शासन सर्व प्रकारचे प्रयत्न करेल. त्यासाठी शासनाकडून निधी कमी पडू दिला जाणार नाही. अमृत महोत्सवी वर्षातील पदार्पण हा एसटीच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा आहे. एसटीच्या स्थित्यंतराचे आपण साक्षीदार आहोत. रस्त्यात अडचणी येतात, खड्डे असतात, मात्र मार्ग काढत एसटीचा प्रवास सुरू आहे. एसटी ही प्रत्येक गावातील माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे, असे परिवहनमंत्री अनिल परब यांनी सांगितले.

शिवाई बसची वैशिष्ठ्ये
शिवाई बस विद्युत घटावर चालणारी आहे. त्यामुळे बस प्रदूषण विरहित, पर्यावरण पूरक, वातानुकुलीत व आवाज विरहित आहे. बसला आकर्षक रंगसंगतीमध्ये ‘शिवाई’ असे नाव देण्यात आले आहे. बस एकदा चार्ज केल्यानंतर जास्तीत जास्त २५० कि.मी. पर्यंत जाऊ शकते. प्रत्येक प्रवाशांसाठी स्वतंत्र व स्वनियंत्रित वातानुकुलीत लुव्हर बसविण्यात आले आहे व त्यासोबत वाचण्यासाठी स्वतंत्र दिवा देण्यात आला आहे. ही बस १२ मीटर लांबीच्या सांगाड्यावर बांधण्यात आली असून तिची रुंदी २.६ मीटर व उंची ३.६ मीटर आहे. सांगाड्याच्या खालच्या बाजूस बसच्या मधोमध प्रशस्त असा सामान कक्ष देण्यात आला आहे. शिवाई बसमध्ये ४३ प्रवाशांसाठी ‘पुश बॅक’ सीट आहे. प्रत्येक दोन सीटच्यामध्ये दोन्ही प्रवाशांचे मोबाईल चार्जिंगसाठी स्वतंत्र युएसबी पोर्ट देण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -