घरमहाराष्ट्रलग्नाला नकार दिल्याने तरुणाचा चाकू हल्ला

लग्नाला नकार दिल्याने तरुणाचा चाकू हल्ला

Subscribe

लिव इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणीवर विवाहित तरुणाने चाकूने वार केल्याची घटना पिंपरी-चिंचवड शहरात घडली आहे. यात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

लिव इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणीवर विवाहित तरुणाने चाकूने वार केल्याची घटना पिंपरी-चिंचवड शहरात घडली आहे. यात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ला केलेल्या तरुणाने हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. तोदेखील गंभीर जखमी असून त्याच्यावर पिंपरी-चिंचवडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी तरुणीचा जबाब घेतला असून सांगवी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमिर इम्तियाज मुन्शी (वय २९, रा. राहटणी, मूळचा नालासोपारा, मुबंई) असं विवाहित हल्लेखोर आरोपीचे नाव आहे. ही घटना सोमवार, १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी तरुणीच्या राहत्या फ्लॅटमध्ये घडली.

विवाहित तरुणाचा तरुणीवर हल्ला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आमिर इम्तियाज मुन्शी आणि जखमी असलेली २६ वर्षीय तरुणी यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. ते लिव इन रिलेशनशिपमध्ये असून जाने- २०१७ ते जून- २०१८ एकाच फ्लॅटमध्ये राहत होते. आरोपी आमिरचा विवाह झाला असून त्याची पत्नी आणि मुलं हे त्याच्या आईकडे राहत असत. आमिर आणि जखमी तरुणी दोघेही एकमेकांना गेल्या तीन वर्षांपासून ओळखतात. एकत्र राहिल्यानंतर आमिर हा तरुणीला वारंवार लग्न करण्यासाठी तगादा लावत होता. त्यामुळे तरुणीने आरोपीला सोडून जाण्याच ठरवलं आणि पिंपळे सौदागर येथील तीन मैत्रिणीसोबत राहायला गेली.

- Advertisement -

दोघेही गंभीर जखमी

परंतू, तरुणी सोडून गेल्याने आरोपी आमिर हा दुखावला गेला होता. याच रागातून त्याने सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास पिंपळे सौदागर येथील फ्लॅटवर गेला. दरवाजाची बेल वाजवली, मात्र दुसऱ्याच तरुणीने दरवाजा उघडला, आरोपी आमिर थेट ओळखीच्या तरुणीच्या खोलीत गेला आणि तरुणीच्या उजव्या हाताची नस धारदार चाकूने कापली. त्यानंतर स्वतः आमिरने डाव्या हाताची नस कापत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. मैत्रिणीच्या मदतीने त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तरुणीची प्रकृती चिंताजनक असून तिला पुण्यातील ससून रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर आरोपीवर पिंपरी-चिंचवड मधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सांगवी पोलीस अधिक तपास करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -