घरमहाराष्ट्रउमेदवारांचे भवितव्य आज ईव्हीएममध्ये बंद होणार

उमेदवारांचे भवितव्य आज ईव्हीएममध्ये बंद होणार

Subscribe

रायगडमध्ये 22 लाख 73 हजार मतदार

महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी मतदान होत असून, रायगड जिल्ह्यातील 7 मतदारसंघामध्ये एकूण 78 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. 2 हजार 714 मतदान केंद्रांवर जाऊन 22 लाख 73 हजार 239 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणूक शांततेत आणि सुरळीत पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासनासह पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.

जिल्ह्यात पनवेल, कर्जत, उरण, अलिबाग, पेण, श्रीवर्धन आणि महाड असे ७ मतदारसंघ आहेत. पनवेल मतदारसंघात 10, कर्जतमध्ये 11, उरण 8, पेण 14, अलिबाग 13, श्रीवर्धन 14 आणि महाडमध्ये 8 असे एकूण 78 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जिल्ह्यात 22 लाख 73 हजार 239 मतदारांची नोंद झाली आहे. त्यामध्ये 11 लाख 57 हजार 457 पुरुष मतदार, 11 लाख 15 हजार 777 महिला मतदार आणि इतर 5 जणांचा समावेश आहे. 16 हजार 901 दिव्यांग मतदार आहेत. मतदानासाठी 2 हजार 714 मतदान केंद्रांची सोय करण्यात आली आहे.

- Advertisement -

निवडणुकीच्या कामासाठी 12 हजार 697 अधिकारी आणि कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये 7 हजार 433 पुरुष आणि पाच हजार 264 महिलांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे 1 हजार 905 वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. 41 भरारी पथकांची स्थापनाही केली आहे. 3013 मतदान युनिट आणि तेवढीच मतदान यंत्रे, 3450 व्हीव्हीपॅट यंत्र उपलब्ध झाली आहेत.

विधानसभा निवडणुका शांतातेत आणि सुरळीत पार पडाव्यात, कायदा आणि सुव्यवस्था राखली जावी यासाठी जिल्हा पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रात 3 हजार 483 पोलिसांच्या ताफ्यासह 5 केंद्रीय सुरक्षा दलाच्या कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील 28 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ठिकठिकाणी नाकाबंदी सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात 134 पोलीस अधिकारी, 2 हजार 103 कर्मचारी, 1 हजार 246 होमगार्ड, तसेच केंद्रीय सुरक्षा दल विभागाच्या पाच कंपन्या अशी सुरक्षा व्यवस्था सज्ज आहे. मतदान प्रक्रियेसाठी रविवारी सायंकाळी अधिकारी आणि कर्मचारी विविध ठिकाणच्या मतदान केंद्रांवर दाखल झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -