घरमहाराष्ट्र'त्या' रिक्षा चालकाने तब्बल साडेपाच तोळे सोन्याचे दागिने केले परत

‘त्या’ रिक्षा चालकाने तब्बल साडेपाच तोळे सोन्याचे दागिने केले परत

Subscribe

रिक्षात विसरलेले सोन्याचे दागिने प्रामाणिक रिक्षा चालकाने मूळ मालकाला परत केल्याची घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. त्याच्या या कामगिरीमुळे सर्वत्र कौतुक होत आहे. भरत जाधव असे या प्रामाणिक रिक्षा चालकाचे नाव आहे. तर मंगल ढेरे असे दागिने परत केलेल्या मूळ मालकिणीचे नाव आहे. भरत यांच्या रिक्षात साडेपाच तोळ्यांचे सोन्याचे दागिने राहिले होते. ही बाब मंगल यांच्या लक्षात आली. मात्र तोपर्यंत रिक्षा चालक निघून गेले होते. याप्रकरणी मंगल यांनी निगडी पोलिसांत तक्रार नोंदवली होती. दरम्यान, चिंचवड पोलिसांनी रिक्षा चालक भरत यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले असून पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला आहे.

काय आहे नेमके प्रकरण 

मंगल विश्वास ढेरे या शुक्रवारी सायंकाळी दिराच्या वाढदिवसानिमित्त शिरूर येथील पिंपरी-चिंचवड शहरात आल्या होत्या. वाढदिवस झाल्यानंतर त्या परत पुण्यात जाणार होत्या. तेव्हा त्यांनी चिंचवड येथून रिक्षातून आकुर्डी रेल्वे स्थानकापर्यंत प्रवास केला. याच दरम्यान, साडेपाच तोळ्यांचे सोन्याचे दागिने असलेली बॅग रिक्षात विसरल्या. ही बाब त्यांच्या लक्षात आली, मात्र तोपर्यंत रिक्षा चालक भरत हे निघून गेले होते. रिक्षाचा काही वेळ शोध घेण्यात आला मात्र ते सापडले नाहीत. संबंधीत घटनेची तक्रार निगडी पोलिसांत देण्यात आली. दरम्यान, रिक्षा चालक भरत जाधव हे भाडे करून घरी गेले. रात्रभर सोन्याची दागिने असलेली बॅग रिक्षातच होती. दरम्यान, आज सकाळी रिक्षा चालक भरत हे आपल्या कुटुंबासह पुण्यातील दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला गेले होते. तेव्हा, त्यांच्या मुलाला रिक्षातील बॅग दिसली, ही बाब त्याने आपल्या वडिलांच्या लक्षात आणून दिली. भरत यांनी बॅग पाहून त्यात काय आहे हे पहिले असता त्यात सोन्याचे दागिने दिसले. त्यांनी काही विचार न करता संबंधित बॅग घेऊन चिंचवड पोलीस ठाणे गाठले. संबंधित घटनेची माहिती दिली. निगडी पोलिसात तक्रार दाखल असल्याने मंगल यांच्याशी संपर्क करणे शक्य झाले. मंगल यांना तातडीने चिंचवड पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले आणि प्रामाणिक रिक्षा चालक भरत यांनी पोलिसांच्या समक्ष साडेपाच तोळ्यांचे सोन्याचे दागिने दिले. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराव शिंगाडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन रिक्षा चालक यांचा सन्मान करण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -