घरमहाराष्ट्रउडानच्या तिसर्‍या टप्प्यात विमान पाण्यावर उतरणार

उडानच्या तिसर्‍या टप्प्यात विमान पाण्यावर उतरणार

Subscribe

देशातील बहुचर्चित उडाण उपक्रमांतर्गत पहिल्या दोन टप्प्यांमध्ये सुरू झालेली विमानसेवा यशस्वी झाली आहे. आता तिसर्‍या टप्प्यात २३५ ठिकाणी विमानसेवा सुरू करणार असल्याची माहिती केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली आहे. विशेष म्हणजे या योजनेमध्ये पाण्यात उतरणार्‍या विमानांचाही समावेश असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. कोल्हापूरमधील विमानतळाच्या नव्या इमारतीच्या भूमिपूजन समारंभ प्रसंगी ते बोलत होते.

प्रभू म्हणाले, उडाण योजना सुरू झाल्यापासून ती देशाच्या बाहेरही सुरू व्हावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे छोट्या शहरांमधून आणि राज्यांमधून ही सेवा आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.
कोल्हापूरची विमानसेवा गेल्या ६ वर्षांपासून बंद होती. मात्र, उडाण योजनेअंतर्गत बंगळुरू आणि हैदराबाद या शहरांशी कोल्हापूरदेखील विमानसेवेने जोडले आहे. शिवाय कोल्हापूर विमानतळावरून मुंबईसाठीही लवकरच सेवा देण्यात येणार असून नाईट लँडिंगची सोयही लवकरच होईल, असेही प्रभू यांनी सांगितले. या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी कोल्हापूर जिल्ह्यातील तिन्ही खासदार म्हणजेच धनंजय महाडिक, राजू शेट्टी आणि संभाजी राजे छत्रपती हे उपस्थित होते.

- Advertisement -

कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे लवकरच
पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणला जोडणार्‍या कोल्हापूर- वैभववाडी रेल्वे मार्गास केंद्राने मान्यता दिली आहे. हे काम निश्चितपणे पूर्णत्वास नेऊ, अशी ग्वाही केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली. मध्य रेल्वेच्या छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर येथे उभारलेल्या नवीन विश्राम कक्षाचे आणि राजारामपूरी दिशेने दुसर्‍या प्रवेशासह सर्व फलाटांना जोडणार्‍या पादचारी पुलाचे उद्घाटन प्रभू यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -