Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र राजकारणासाठी पैसा आहे, पण शेतकऱ्यांसाठी नाही..., ठाकरे गटाची राज्य सरकारवर टीका

राजकारणासाठी पैसा आहे, पण शेतकऱ्यांसाठी नाही…, ठाकरे गटाची राज्य सरकारवर टीका

Subscribe

मुंबई : एका बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे आपापल्या गटातील आमदार, खासदारांवर कोट्यवधींच्या निधीची पावसाप्रमाणे बरसात करीत आहेत, पण पाऊसपाण्याअभावी हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांपर्यंत या लुटमार निधीतला रुपयाही पोहोचत नाही. राजकारणासाठी पैसा आहे, पण शेतकऱ्यांसाठी नाही, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.

हेही वाचा – मुख्यमंत्री शिंदेंसह फडणवीस-अजित पवार पंचतारांकित शेतकरी, ठाकरे गटाचा हल्लाबोल

- Advertisement -

यंदाचा पावसाळा हा तसा कोरडा जाताना दिसत आहे. काही भागांत महिनाभराच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा एन्ट्री केली असली तरी मराठवाडा, नगर जिल्ह्यासह राज्याच्या अनेक भागांत ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात पाऊस न झाल्याने पेरण्या वाया गेल्या आहेत. दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले, पण दुबार पेरणीने तरी शेतकऱ्यांना दिलासा मिळेल काय? अनेक तालुक्यांत पिण्याच्या पाण्याचा, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. जमिनीला भेगा पडू लागल्या आहेत, पण राज्यकर्ते त्यांच्या राजकारणात मश्गूल आहेत, असे सामना दैनिकातील अग्रलेखातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने म्हटले आहे.

कधी ओला तर कधी सुका दुष्काळ, कधी हे वादळ तर कधी ते तुफान अशा चक्रात शेतकरी साफ भरडून निघाला आहे. मराठवाडा, नगर, उत्तर महाराष्ट्राची स्थिती भयावह आहे. मराठवाड्यात ऑगस्ट महिन्यात शंभरावर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शासनास पाझर फुटला नाही तर, आणखी लाखभर शेतकरी आत्महत्येचा मार्ग स्वीकारतील. नापिकी, कर्जबाजारीपणातून शेतकऱ्यांनी जीवनाचा त्याग करणे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही, असे या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – धनगर आरक्षण : धनगर आरक्षण कृती समितीच्या कार्यकर्त्याने उधळला विखे पाटलांवर भंडारा!

सध्याचे कृषीमंत्री हे फोडाफोडीत, स्वतःच्या कोर्टकचेऱ्यांत अडकले आहेत. त्यांची शेती, बी-बियाणे वेगळे आहे. अजित पवारांची सभासंमेलने आयोजिण्यात त्यांचा वेळ निघतोय. बीड जिल्ह्यात जेसीबी उभे करून त्यातून ते स्वतःवर फुले उधळून घेताना दिसतात, पण शेतकऱ्यांचे काय? आधीचे शेतीमंत्री दादा भुसेही ठणठणगोपाळच होते. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात एकट्या ऑगस्टमध्ये 30 च्यावर आत्महत्या झाल्या. आता या मृतांवर कृषीमंत्री ‘जेसीबी’ने फुले उधळणार आहेत काय? असा बोचरा सवाल ठाकरे गटाने केला आहे.

वास्तविक, शेतमालाला योग्य भाव, शेतमजुरांना किमान वेतन, ग्रामीण बेरोजगारांना काम या तीन विषयांवर कृषीमंत्र्यांनी झोकून काम करायला हवे, पण ते सत्कार करण्यात आणि हार स्वीकारण्यात मग्न आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट म्हणजे ‘डब्बल’ करू ही पंतप्रधान मोदी यांचीही घोषणा होती, पण शेतकऱ्याला अर्धी भाकरही मिळत नाही, हे वास्तव असल्याचे या अग्रलेखात म्हटले आहे.

- Advertisment -