घरमहाराष्ट्रपोटनिवडणुकीत धनुष्यबाणाचा काही ‘नेम’ नाही

पोटनिवडणुकीत धनुष्यबाणाचा काही ‘नेम’ नाही

Subscribe

चिन्ह शिवसेनेला की शिंदे गटाला याबाबतचा पेच कायम

जवळपास महिनाभराच्या अंतराने अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार असली तरी यात धनुष्यबाणाचे चिन्ह नेमके कुणाला मिळणार, हा पेच मात्र कायम आहे.

धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटाला मिळणार की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे जाणार अथवा दोघांनाही न मिळता ते गोठविण्यात येणार, याचा फैसला निवडणूक आयोगाच्या दरबारात होणार आहे. २७ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष घटनापीठाने दिलेल्या आदेशांनंतर निवडणूक आयोगच धनुष्यबाणाबाबतचा फैसला करणार आहे. धनुष्यबाणाबाबतचा निर्णय नेमका केव्हा होईल, हे अद्यापही अधांतरी आहे. या प्रक्रियेत बराच वेळ लागण्याची शक्यता वर्तविण्यात आहे, परंतु पोटनिवडणूक मात्र अवघ्या महिनाभराच्या अवधीतच होणार आहे. या निवडणुकीपर्यंत याचा निर्णय न लागल्यास धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार, याबाबत संभ्रमाचे वातावरण कायम आहे.

- Advertisement -

या पोटनिवडणुकीदरम्यान दोन्ही गटांकडून धनुष्यबाणावर दावा सांगण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ठाकरे गटाकडून आपल्या उमेदवाराला हे चिन्ह मिळावे, यासाठी विविध स्तरावरून प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती आहे. दसरा मेळाव्यानंतर शिवसेनेकडून निवडणूक आयोगाकडे आपल्या अधिकृत उमेदवारालाच धनुष्यबाणाचे चिन्ह देण्यात यावे, यासाठी विनंती अर्ज करण्यात येण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने विनंती मान्य न केल्यास शिवसेनेकडून न्यायालयाचे दार ठोठावण्याची तयारीही झाल्याचे समजते, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या गटाला धनुष्यबाण हे चिन्ह देण्यात येऊ नये, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

यासाठी वेळ पडल्यास थेट न्यायालयातही जाण्याची तयारी शिंदे गटाने ठेवल्याचे समजते. पोटनिवडणुकीची घोषणा झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी ‘वर्षा’ बंगल्यावर शिंदे गटाच्या लीगल टीमची एक गुप्त बैठकदेखील झाल्याचे कळते. उद्धव ठाकरे यांच्या गटाला कोणत्याही परिस्थितीत धनुष्यबाण हे चिन्ह मिळू नये, यासाठी प्रयत्न करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यामुळे एकंदरीत वातावरण पाहता दोन्ही गट धनुष्यबाणासाठी प्रयत्नशील राहणार असून याबाबत निवडणूक आयोग काय निर्णय घेते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

रमेश लटके आणि एकनाथ शिंदे ‘कनेक्शन’
शिवसेनेचे माजी आमदार रमेश लटके हे मूळचे कोल्हापूरचे शाहू वाडीतील होते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष ते आमदार असा प्रवास करणारे लटके हे दांडगा जनसंपर्क असलेल्या शिवसेनेच्या नेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जात. शिवसेनेत असताना एकनाथ शिंदे यांच्या जवळचे म्हणून लटके सर्वत्र परिचित होते. त्यांच्या निधनानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली आहे. एकनाथ शिंदे यांच्याशी जवळीक असणार्‍या नेत्याच्या पत्नीलाच उमेदवारी देण्यात आल्यामुळे या निवडणुकीत काय होणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -