घरठाणेमहिन्याभरात टोलप्रश्नी मार्ग काढणार, राज ठाकरेंना सरकारचे लेखी आश्वासन

महिन्याभरात टोलप्रश्नी मार्ग काढणार, राज ठाकरेंना सरकारचे लेखी आश्वासन

Subscribe

टोलसंदर्भातील मुद्दा हा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी काल राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. ज्यानंतर आज काल झालेल्या मुद्द्यांबाबतचे लेखी पत्र राज ठाकरे यांना देण्यात आले.

मुंबई : ठाण्यातील टोलच्या दरात 5 रुपयांनी वाढ केल्यानंतर मनसे नेते अविनाश जाधव हे त्याविरोधात उपोषणाला बसले होते. उपोषणामध्ये त्यांची प्रकृती खालावल्यानंतर रविवारी (ता. 08 ऑक्टोबर) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली. 9 वर्षांपूर्वी राज ठाकरे यांनी टोलच्या वाढत्या दरवाढीविरोधात आंदोलन केले होते. त्यानंतर आता पुन्हा हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी काल (ता. 12 ऑक्टोबर) राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. ज्यानंतर आज काल झालेल्या मुद्द्यांबाबतचे लेखी पत्र राज ठाकरे यांना देण्यात आले. या संदर्भातील आणखी एक बैठक आज राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पार पडली. या बैठकीला मंत्री दादा भुसे आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. (toll issue will be resolved within a month, written assurance of government to Raj Thackeray)

हेही वाचा – …तर रेल्वेच्या दुर्घटना वारंवार का घडतायत? ठाकरे गटाचा थेट सवाल

- Advertisement -

दोन तास राज ठाकरे आणि मंत्री दादा भुसे यांच्यामध्ये चर्चा झाल्यानंतर पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेमध्ये टोल संदर्भातील अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. ज्याकरिता राज्य सरकारला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून महिन्याभराचा कालवधी देण्यात आलेला आहे. या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय झाला तो म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाचे 29 आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे 15 असे 44 जुने टोलनाके बंद करण्यात यावे, अशी मागणी मनसेकडून करण्यात आली होती. त्यामुळे या मागणीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुढील एका महिन्यात निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ज्यामुळे पुढील महिन्याभरात हे जुने टोलनाके बंद होतील, अशी आशा राज ठाकरे यांच्याकजून व्यक्त करण्यात आली आहे.

दादा भुसे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीनुसार, मुंबईच्या एन्ट्री पॉईंटवर उद्यापासूनच कॅमेरे लावले जातील. 15 दिवस या सर्व एन्ट्री पॉईंट्सवर सरकार आणि आमच्या पक्षाच्या कॅमेऱ्यांनी लक्ष ठेवले जाईल, किती गाड्या टोलवरुन जातात, हे कळण्यासाठी ही व्हिडीओग्राफी केली जाणार आहे. त्याचा कंट्रोलरुम मंत्रालयात असणार आहे. या टोलनाक्यावरून किती गाड्यांची ये जा होते हे मोजले जाणार आहे. त्याचबरोबर टोलनाक्यांवर एका दिवसांत किती टोल जमा झाला. अजून किती कर्जाची रक्कम जमा होणे बाकी आहे, यासंदर्भातील माहिती असणारे डिजीटल बोर्ड हे लावण्यात येणार आहेत.

- Advertisement -

त्याचबरोबर, ठाण्यात राहणाऱ्या लोकांना आनंद नगर ते ऐरोली यादरम्यानचा टोल एकदाच भरावा लागणार आहे. तो दोनदा भरण्याची आवश्यकता नाही, एक महिन्यात या निर्णयाची सरकारडून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. ज्याप्रमाणे टोल नाक्यांवर टोल आकारला जातो, त्याप्रमाणे तिथे सुविधा असणे हे नितांत गरजेचे आहे. त्यामुळे स्वच्छतागृह, रुग्णवाहिका, प्रथमोपचारासाठी लागणारी सेवा, क्रेन यांसारख्या गोष्टींची मागणी टोलसंदर्भात असलेल्या करारांमध्ये नमूद करण्यात आलेली आहे. परंतु अद्यापही त्याची कोणतीही अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे येत्या महिन्याभरात याबाबतची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

करारातील नमूद सर्व उड्डाणपूल, भुयारी मार्ग यांचे डिटेल स्ट्रक्चरल ऑडिट करणे. टोल प्लाझापासून 200 ते 300 मीटर अंतरावर पिवळी पट्टी नियम तातडीने लागू करणे. त्या नियमानुसार 4 मिनिटात प्रत्येक वाहन टोल प्लाझा वरून निघाले पाहिजे. टोल नाक्यावर जर फास्टटॅग स्कॅनर चालला नाही तर दुप्पट पैसे वसूल केले जाणार नाहीत. टोल प्लाझा परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सवलत मासिक पास उपलब्ध करुन देणे. आनंदनगर टोल व ऐरोली टोलसाठी एकचं टोल गृहीत धरणे. याबाबतचा निर्णय हा सर्वेक्षण करून घेण्यात येणार आहे, या सर्व गोष्टींची अंमलबजावणी करण्यासाठी एक महिन्याचा वेळ हा देण्यात आलेला आहे. तर येत्या एका महिन्यात सर्व प्रश्न मार्गी लागतील, असा विश्वास राज ठाकरे यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -