घरमहाराष्ट्रUnseasonal rain : मुख्यमंत्री आणि बोगस महाशक्ती असलेले केंद्र सरकार कुठे आहे?...

Unseasonal rain : मुख्यमंत्री आणि बोगस महाशक्ती असलेले केंद्र सरकार कुठे आहे? ठाकरे गटाचा सवाल

Subscribe

मुंबई : पावसाळ्यातही झाले नाही असे विजांचे तांडव, ढगांचा भयंकर गडगडाट, तुफानी पाऊस आणि गारपिटीच्या तडाख्याने महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांना झोडपून काढले आहे. अनेक जिल्ह्यांतील शेती व शेतमाल उद्ध्वस्त झाला आहे. राज्यातील तमाम शेतकरी वर्ग अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या तडाख्याने आक्रोश करीत असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांची बोगस महाशक्ती असलेले केंद्रीय सरकार कुठे आहे? असा सवाल ठाकरे गटाने केला आहे.

हेही वाचा – 1857 च्या स्वातंत्र्य संग्रामातील शहिदांचे स्मारक वाऱ्यावर; गर्दुल्ले अन् भटक्या कुत्र्यांचा ताबा

- Advertisement -

महाराष्ट्रातील शेती व शेतकरी उद्ध्वस्त झाला असताना या संकटात त्यांचे अश्रू पुसण्यासाठी बांधावर जाण्याचे सोडून मिंधे सरकारचे मुख्यमंत्री तेलंगणात निवडणूक प्रचारात मग्न आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही कायम प्रचारातच गुंतले आहेत, तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोमात आहेत, अशी जोरदार टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातील अग्रलेखात केली आहे.

महाराष्ट्राचा ‘पालक’ असलेला शेतकरी संकटात असताना त्याला भेटण्याचे सौजन्य न दाखवता मुख्यमंत्री आपले ‘मालक’ असलेल्या पक्षाच्या प्रचाराला निघाले आहेत. पालकाची काळजी सोडून मालकाची चाकरी करण्यात धन्यता मानणाऱ्या मिंध्यांना काय म्हणावे? परीट घडीचे पांढरेशुभ्र कपडे घालून तेलंगणात प्रचार करत असताना अवकाळीच्या तडाख्याने संकटात सापडलेला महाराष्ट्राचा शेतकरी आपल्याकडे मदतीसाठी आशेने बघतो आहे याचे भान नसेल तर यांना मुख्यमंत्री तरी कसे म्हणायचे? असा प्रश्नही ठाकरे गटाने केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Photo : ‘आपलं महानगर’चा महागौरव 2023 सोहळा उत्साहात; अभिनेता संदीप पाठकची उपस्थिती

महाराष्ट्रात अवकाळी पाऊस, गारपिटीने कहर केला असून ‘मायबाप’ सरकार राज्यातून पसार झाले आहे. संकटात सापडलेल्या जनतेला आधार देण्यासाठी ‘सरकार’ असते म्हणून त्यास मायबाप म्हणायचे, पण महाराष्ट्रात चित्र उलटेच दिसत आहे. तेलंगणा आणि जयपुरातील निवडणुकीत भाजपा उमेदवारांना खोके पोहोचविण्याचे काम राज्यातील गद्दार हृदयसम्राटांना देण्यात आले होते. निवडणुकांत खोके पोहोचविण्याची कामगिरी चोखपणे बजावणाऱ्या गद्दार हृदयसम्राटांनी अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या तडाख्याने उद्ध्वस्त झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या तोंडाला मात्र पानेच पुसली, असा हल्लाबोल ठाकरे गटाने केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -